जॉन माल्कम
मेजर जनरल जॉन माल्कम | |
![]() | |
जन्म | २ मे, १७६९ |
---|---|
मृत्यू | ३० मे, १८३३ (वय ६४) |
मेजर-जनरल सर जॉन माल्कम जीसीबी, केएलएस (२ मे, १७६९ - ३० मे, १८३३) हे एक स्कॉटिश सैनिक, राजकारणी, ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासक, राजकारणी आणि इतिहासकार होते.
सुरुवातीचे जीवन
[संपादन]माल्कम यांचा जन्म १७६९ मध्ये इंग्लंड-स्कॉटलंडच्या सीमेवरील एस्कडेल गावातील एका गरीब कुणबी शेतकरी जॉर्ज माल्कम आणि त्यांची पत्नी मार्गारेट (बॉनी पेगी) यांच्या घरी झाला. जॉन माल्कम हे १७ मुलांपैकी एक होते. या भावंडांमध्ये सर जेम्स माल्कम, अॅडमिरल सर पुल्टेनी माल्कम आणि सर चार्ल्स माल्कम यांचा समावेश आहे. त्यांच्या आई मार्गारेटचा भाऊ सर थॉमस पास्ली हा रॉयल नेव्हीमध्ये अॅडमिरल पदावर होता. जॉनने वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी घर, शाळा, कुटुंब आणि देश सोडला आणि ईस्ट इंडिया कंपनीत नशीब आजमावयाचे ठरवले. लहान वयामुळे त्यांना बॉय माल्कम असे टोपणनाव मिळाले.
कारकीर्द
[संपादन]माल्कमची ईस्ट इंडिया कंपनी साठीची पहिली कामगिरी मद्रास आर्मीमध्ये एक एनसाइन म्हणून होती. १७८३ मद्रास येथे आल्यावर त्यांनी अकरा वर्षे साथा रेजिमेंटल सैनिक म्हणून काम केले. त्यानंतर आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी ते एक वर्षासाठी परत ब्रिटनला गेले. १७९५ मध्ये ते जनरल सर अल्युरेड क्लार्क यांचे लष्करी सचिव म्हणून भारतात परतले आणि क्लार्कच्या केप ऑफ गुड होप ताब्यात घेण्याच्या मोहिमेत सहभागी झाले. १७९९ च्या अँग्लो-म्हैसूर युद्धात त्यांनी हैदराबाद तुकडीसोबत काम केले आणि नंतर मैसुरुचे नवीन सरकार स्थापन करणाऱ्या शांतता आयोगाचे संयुक्त सचिव म्हणून काम केले. त्याच वर्षी नंतर त्यांना गव्हर्नर-जनरल लॉर्ड मॉर्निंग्टन (नंतर मार्क्वेस वेलेस्ली) यांनी इराणमध्ये राजनैतिक मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी निवडले. १८०१ मध्ये परतल्यानंतर ते कोलकाता येथे वेलेस्लीचे खाजगी सचिव झाले.
१८०३-०५ च्या अँग्लो-मराठा युद्धात त्यांनी सर आर्थर वेलेस्ली (नंतर वेलिंग्टनचे ड्यूक) यांच्यासोबत गव्हर्नर-जनरलचे आणि राजनैतिक प्रतिनिधी म्हणून काम केले. वेलेस्ली आणि माल्कम या दोघे आयुष्यभर मित्र होते. १८०४ मध्ये मैसुरु येथे ब्रिटिश रेसिडेंट म्हणून नियुक्ती झाली, परंतु १८०५-६ मध्ये त्यांनी जनरल लेक बरोबर उत्तर भारतात कंपनीची सेवा केली.
१८०८ च्या सुरुवातीला, गव्हर्नर-जनरल, लॉर्ड मिंटो यांनी माल्कमना पुन्हा एकदा इराणला पाठवले. यावेळी तेहरानमध्ये फ्रेंचांचा प्रभाव प्रबळ होता आणि इराण्यांनी ब्रिटिशांना काही भीक घातली नाही. त्याच वर्षी नंतर सर हार्फोर्ड जोन्स यांच्या नेतृत्वाखाली लंडनहून एक वेगळे मिशन इराणमध्ये आले आणि त्यांना इराण्यांशी संबंध स्थापण्यात यश मिळाले कारण तोपर्यंत इराण सरकार फ्रेंचांवर नाराज झालेले होते. १८१० मध्ये माल्कमला पुन्हा इराणला पाठवण्यात आले, परंतु तोपर्यंत ब्रिटिश सरकारने लंडनमधून थेट इराणशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला होता आणि सर गोर औसेली यांना राजदूत म्हणून नियुक्त केले होते.
१८१२ मध्ये, माल्कम पाच वर्षांच्या सुट्टीसाठी ब्रिटनला परतले. हा सगळा वेळ त्यांनी लेखन करण्यात घालवला. १८१५ मध्ये त्यांनी हिस्टरी ऑफ इरान (इराणी स्त्रोतांच्या आधारे लिहिलेला पहिला इंग्लिश ग्रंथ होय) पूर्ण केला. यासाठी त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून मानद डीसीएल पदवी मिळाली. १८१७ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी तिसऱ्या आंग्ल-मराठा युद्धापूर्वी झालेल्या वाटाघाटींमध्ये गव्हर्नर-जनरलचे प्रतिनिधी म्हणून काम केले. २१ डिसेंबर १८१७ रोजी महिदपूरच्या निर्णायक लढाईत इंदूरच्या मल्हारराव होळकर दुसरा यांच्याविरुद्ध माल्कमनी मोठी कामगिरी केली. जानेवारी १८१८ मध्ये, मार्क्वेस ऑफ हेस्टिंग्सने माल्कमना मध्य भारताचे लष्करी आणि राजकीय प्रभारी म्हणून नियुक्त केले. या चार वर्षांच्या काळात त्यांनी या प्रदेशाच्या भूतकाळातील आणि वर्तमान स्थितीचे चित्रण करण्यासाठीचे साहित्य मोठ्या प्रमाणात गोळा केले. त्यांनी यासंबंधीचा अहवाल कलकत्त्याला पाठवला, जिथे तो सरकारच्या आदेशाने छापण्यात आला. या सुमारास मुंबई आणि मद्रास प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नरपदावर माल्कमना डावलून त्याच्या कनिष्ठांची वर्णी लावण्यात आल्यामुळे माल्कम निराश होऊन १८२२ मध्ये ब्रिटनला निघून गेले. माल्कमचा जन्म जहागिरदार किंवा श्रीमंत कुटुंबात झालेला नसल्याने त्यांचा लंडनमध्ये वशिला नव्हता, म्हणून कदाचित हे झाले असावे. माल्कमने ही पाच वर्षे त्यांनी कुटुंबासह वेळ घालवला तसेच आणखी दोन पुस्तके पूर्ण केली.
१८२७ मध्ये त्यांची बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. या काळात त्यांचा मुंबई सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांशी मोठा वाद झाला. मुंबई सर्वोच्च न्यायालयाने आपले अधिकारक्षेत्र मुंबईबाहेरील कंपनीने पेशव्यांकडून नव्याने जिंकून घेतलेल्या दख्खनमधील प्रदेशावर वाढवण्याचा प्रयत्न केला होता.
माल्कम यांना भारतातील सती (विधवांचे त्यांच्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या चितेवर आत्मदहन) आणि स्त्री भ्रूणहत्या या दोन्ही गोष्टींचा माल्कम यांना अतिशय खेद होता. या प्रथांचा अंत करणे ही आपली ी आपली नैतिक जबाबदारी समजून माल्कम फेब्रुवारी १८३० मध्ये गुजरातमध्ये गेले आणि स्वामीनारायण पंथाचे संस्थापक सहजानंद स्वामी यांना भेटले. सहजानंद स्वामीसुद्धा अशाच प्रकारच्या सुधारणां करण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हापासून माल्कमचा उल्लेख स्वामीनारायण साहित्यात होतो आहे. त्यांच्या आधीचे बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्यासोबत माल्कम भारतात शिक्षणाचा प्रसार करण्यात आणि सरकारी उच्च पदांसाठी भारतीयांना प्रशिक्षण देण्यात अग्रणी होते. त्यांनी बॉम्बे लिटररी सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.
१८३१ मध्ये माल्कम अखेर ब्रिटनला कायमचे परतले. त्यानंतर लगेच त्यांनी आपले मित्र आर्थर वेलेस्ली (वेलिंग्टनचे ड्यूक) यांना पाठिंबा देण्यासाठी लॉन्सेस्टनमधून खासदारकी मिळवली. त्यांनी सुधारणा विधेयकाला ड्यूक ऑफ वेलिंग्टन यांच्याबरोबर विरोध केला. माल्कमने पॅरी कुटुंबाकडून बर्कशायरमधील वॉरफिल्ड हॉल हा महाल विकत घेतला आणि त्याचे नूतनीकरण करण्यात स्वतःला गुंतवून घेतले. एप्रिल १८३३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकांना (भागधारकांना) उद्देशून केलेले भाषण हे त्यांचे शेवटचे सार्वजनिक काम होते. या भाषणात त्यांनी त्यांच्या कंपनीच्या सनदेच्या नूतनीकरणासाठी सरकारने घातलेल्या अटी मान्य करण्यास राजी केले. त्यानंतर लगेचच त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि ३० मे १८३३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना पिकॅडिली येथील सेंट जेम्स चर्चमध्ये दफन करण्यात आले.
वेस्टमिन्स्टर अॅबेच्या उत्तर भागात फ्रांसिस चांत्रे यांनी कोरलेला माल्कमचा संगमरवरी पुतळा आहे. [१] बॉम्बे येथील टाउन हॉलमध्ये त्यांचा एक पुतळा आणि स्कॉटलंडमधील लँगहोम येथील व्हिटा हिलवर त्यांच्या कामगिरीचे स्मरण करणारा १०० फूट उंच ओबेलिस्क देखील आहे.

कुटुंब
[संपादन]१८०७ मध्ये त्यांनी मैसुरुमध्ये जनरल सर अलेक्झांडर कॅम्पबेल यांची दुसरी मुलगी इसाबेला शार्लोटशी लग्न केले. त्यांना पाच मुले झाली, ज्यात जॉर्ज अलेक्झांडर माल्कम यांचा समावेश होता.
त्यांचे समकालीन माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि सर थॉमस मन्रो यांच्यासह, माल्कम हे ब्रिटिश राजवटीच्या तीन सुरुवातीच्या तत्त्वांचे शिल्पकार होते. या तत्त्वांचे शहाणपण खूप लवकर विसरले गेले आणि खूप उशिरा पुन्हा आठवले.
माल्कमने चार प्रकारे भारतातील शासनावर मोठा प्रभाव पाडला -- प्रथम, भारतावर कंपनीच्या फायद्यासाठी राज्य करणे - पण याचबरोबर भारतीयांचाही फायदा करून देणे. फक्त ब्रिटिश वसाहतकारांचा नाही. दुसरे, भारतात थेट शासन न करता अप्रत्यक्ष शासनाला प्राधान्य देणे. जेथे शक्य असेल तिथे विद्यमान भारतीय शासकांना त्यांच्या जागी ठेवायचे आणि पारंपारिक शासन पद्धती, धर्म आणि सामाजिक रचनेत कमीत कमी ढवळाढवळ करणे. तिसरे, माल्कमने जिल्हा अधिकाऱ्याची भूमिका विकसित करण्यास मदत केली. ही शक्तिशाली प्रशासकांचा छोटा गट फारशा सैनिकी बळाशिवाय शासन करीत असत. चौथे, माल्कमने पुढे जाणाऱ्या परराष्ट्र धोरणाला प्रोत्साहन दिले आणि त्यातहत इराण, अफगाणिस्तान आणि मध्य आशियासारख्या शेजारील देश व प्रदेशांशी राजनैतिक संबंध स्थापले.
ते अनेक प्रसिद्ध अँग्लो-इंडियन राजकारण्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. हेन्री पॉटिंगर, चार्ल्स मेटकाफ, अलेक्झांडर बर्न्स आणि हेन्री रॉलिन्सन यांतील काही होते.
लेखन
[संपादन]
- स्केच ऑफ द सिख्स(१८१२) [२]
- स्केच ऑफ द पॉलिटिकल हिस्टरी ऑफ इंडिया (१८११)
- डिस्टर्बन्सेस इन द मद्रास आर्मी इन १८०९ १८१२)
- द हिस्टरी ऑफ पर्शिया (१८१५)
- अ मेम्वा ऑफ सेंट्रल इंडिया (१८२३)
- द पॉलिटिकल हिस्टरी ऑफ इंडिया (१८२६)
- स्केचेस ऑफ पर्शिया (१८२७) - हे पुस्तक माल्कमने लिहिलेले नाही, तर इराणमधील त्याच्या मोहिमेतील त्याच्या एका साथीदाराने लिहिले आहे. याचा लेखक निनावी आहे आणि त्याने स्वतःची ओळख प्रवासी म्हणून करून दिली आहे; त्याने त्याच्या मजकुरात माल्कमला इल्च म्हणजे परदेशी दूत असा पर्शियन शब्दाने संबोधले आहे.
- द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया (१८३३)
- द लाइफ ऑफ रॉबर्ट, लॉर्ड क्लाइव्ह (१८३६; मरणोत्तर)
संदर्भ
[संपादन]- ^ "Sir John Malcolm". Westminster Abbey. 22 October 2022 रोजी पाहिले.
- ^ "Review of Sketch of the Sikhs by Brigadier-General Sir John Malcolm". The Quarterly Review. 9: 472–479. July 1813.