Jump to content

जैवविविधता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जैववैविध्य या पानावरून पुनर्निर्देशित)

जैवविविधता ही पृथ्वीवरील जीवसृष्टीची जैविक विविधता आणि परिवर्तनशीलता आहे. जैवविविधता हे जनुकीय प्रजाती आणि परिसंस्थेच्या पातळीवरील भिन्नतेचे मोजमाप आहे. तलाव, तळे, नदी अश्या परिसंस्थांचा अभ्यास करून तेथे पाहण्यात आलेल्या जैवघटकांची माहिती मिळवल्यानंतर सजीवांमधील विविध जाती, परिसंस्था, बायोम किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता आढळून येते. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ उष्णप्रदेशीय भागामध्ये जैवविविधता अधिक तर ध्रुवीय भागामध्ये विविधता कमी असते.

झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव सामूहिकरित्या लुप्त होतात. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी एक टक्का सजीव लुप्त झाले आहेत. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यत पाच वेळा मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे. फेनेरोझोइक महाकल्पामध्ये (५४ कोटी वर्षांपूर्वी) जैवविविधतेचा महाविकास ‘कॅम्ब्रियनकल्पामधील विविधतेचा स्फोट’ या नावाने ओळखला जातो. ह्यात बहुपेशीय सजीवांमधील सर्व संघांची (फायलम) निर्मिती झालेली होती. त्यापुढील ४० कोटी वर्षांमध्ये जैवविविधतेचा पुन्हा पुन्हा नाश झालेला होता. ‘कार्बोनिफेरस’ युगामध्ये सदाहरित वनांमधील वनस्पती आणि प्राण्यांचा नाश झाला. ‘पर्मियन ट्रायासिक’ युगामध्ये २५ कोटी वर्षांपूर्वी झालेला जैवविविधतेचा नाश सर्वात मोठा होता. तीन कोटी वर्षांपूर्वी पृष्ठवंशी सजीवांनी पुन्हा एकदा आपला जम बसवला. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झालेला ‘क्रिटेशियस –टर्शरी विनाश’ हा नजीकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय. याच काळात डायनोसॉर नष्ट झाले. जैवविविधतेमध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळू हळू नाहीशी होत आहे. यास ‘हॉलोसिन विनाश’ असे म्हणले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा अतोनात नाश होत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने जैवविविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी इसवी सनाचे २०११-२०२० हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे. पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाडे लावली जायची जेणेकरून त्यावर पक्षी फुलपाखर बागडावीत. पण आताच्या सध्याच्या स्थितीत पाहिल्यास सगळीकड काँक्रिटीकरण वाढलेलं आहे. त्यामुळे आजूबाजूला जास्त परिसरच नाहीये व जेवढा आहे तेवढ्यात वेगवेगळी शोची झाडं लावली जातात. त्यामुळे फुलपाखरांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहे.[]

आयुमर्याद

प्राणी | आयुमर्याद

मे फ्लाय | १ - २४ तास.

घरमाशी | १ - ४ महिने.

कुत्रा |. १२ - १८ वर्षे.

शाहमृग |. ५० वर्षे.

हत्ती | ७० - ९० वर्षे.

काही सजीव आणि त्यांचा वेग :-

बहिरा ससाणा (Falcon) = ३२० कि.मी प्रति तास.

चित्ता = ११२ कि.मी प्रति तास.

ब्ल्यू फिश = ४०-४६ कि.मी प्रति तास.

ससा = ५६ कि.मी प्रति तास.

खार = १९ कि.मी प्रति तास.

उंदीर = ११ कि.मी प्रति तास.

माणूस = ४० कि.मी प्रति तास.

कासव = ०.२७ कि.मी प्रति तास.

गोगलगाय (Snail) = ०.०५ कि.मी प्रति तास.

व्युत्पत्ती (शब्दाचा इतिहास)

[संपादन]

इ.स.१९६८ मध्ये रेमंड एफ. दासमान या वन्यजीवांच्या अभ्यासकाने जैवविविधता या शब्दाचा प्रथम प्रयोग केला. हा शब्द त्याने ‘अ डिफरंट काइंड ऑफ कंट्री’ या सामान्य वाचकांसाठी लिहिलेल्या पुस्तकामध्ये विविधता टिकवून ठेवण्याच्या संदर्भात वापरला. सुमारे दहा वर्षांनंतर, म्हणजे १९८०मध्ये विज्ञान आणि पर्यावरण कायद्याचा मसुदा बनवण्याच्या वेळी हा शब्द चांगलाच रूढ झाला होता. थॉमस लव्हजॉय यानी कॉन्झर्व्हेशन बायॉलॉजी या पुस्तकाच्या उपोद्‌घातामध्ये लिहून तो वैज्ञानिकांच्या समोर आणला. यापूर्वी ‘नॅचरल डायव्हर्सिटी-नैसर्गिक विविधता’ अशी संज्ञा १९७५ सालापासून वापरात होती. पण १९८०मध्ये रॉबर्ट ई. जेनिन्स याने अमेरिकेत जैविकविविधता असा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न केला. सध्या अमेरिकेत नॅचरल हेरिटेज असा शब्द वापरला जातो. या शब्दाची व्याप्ती जैवविधतेहून अधिक आहे. यामध्ये भूशास्त्र-जिऑलॉजी आणि भूप्रदेशाचा समावेश केला आहे.[]

व्याख्या

[संपादन]

जैविक विविधता किंवा जैवविविधता व्याख्येचे अनेक अर्थ निघतात. सामान्य व्याख्येप्रमाणे जैवविविधता म्हणजे जातींची विविधता, आणि जातींमधील संपन्नता (जीवशास्त्रीय संपन्नता). जीवशास्त्रज्ञांच्या व्याख्येप्रमाणे “ जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता, जातींमधील विविधता आणि परिसंस्थेमधील विविधता. जीवशास्त्रीय विविधता म्हणजे व्याख्येप्रमाणे (१) जातीमधील विविधता, (२) परिसंस्थेमधील विविधता आणि (३) जनुकीय विविधता म्हणजे जैवविविधता.

इसवी सनाच्या २००४मध्ये कार्डिफ विद्यापीठाने आणि पेंब्रुकशायर मधील डार्विन सेंटरच्या प्राध्यापक अ‍ॅन्थनी कॅंपबेल यांनी या व्याखेमध्ये रेण्वीय विविधतेची भर घातली.

जैवविविधतेचा विस्तार

[संपादन]

जैवविविधता पृथ्वीवर समप्रमाणात पसरलेली नाही. पृथ्वीवरील जैवविविधतेमध्ये विस्ताराची विविधता आढळते. एवढेच नव्हे तर एकाच प्रदेशामध्ये सुद्धा सारखेपणा आढळून येत नाही. सजीवांमधील विविधता ही तापमान, पडणाऱ्या पावसाचे प्रमाण, समुद्रसपाटीपासूनची उंची, भूप्रदेशाचे गुणधर्म आणि सभोवती असलेल्या इतर सजीवांच्या अस्तित्त्वावर अवलंबून असते. सजीवांच्या देशी जाती आणि अप्रिसंस्थेच्या(?) वितरणाच्या अभ्यासास 'जैवभूगोल' असे म्हणतात.

विषुववृत्ताजवळील उष्ण प्रदेशामध्ये विविधता अधिक तर ध्रुवीय प्रदेशामध्ये कमी विविधता आढळते. सन २००६मध्ये आययूसीएन या संस्थेने जाहीर केलेल्या दुर्मीळ किंवा अस्तित्त्व धोक्यात आलेल्या सजीवांची संख्या ४०,१७७ एवढी होती. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार अशा जातींची संख्या दहा लाखांवर पोहोचेल. भूप्रदेशावरील विविधता ही महासागरी विविधतेपेक्षा पंचवीस पटींनी अधिक आहे.

अक्षवृत्तीय प्रवणता

[संपादन]

सामान्यपणे ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत जैवविविधता वाढत जाते. शून्य अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये समुद्रसपाटीजवळ ती सर्वाधिक असते. विषुववृत्तीय प्रदेशात समुद्रसपाटीपासून उंचावर जैवविधता कमी असते. या प्रकारास जाति विविधतेमधील अक्षवृत्तीय प्रवणता असे म्हणतात. पर्यावरणातील अनेक घटकांचा विविधतेवर परिणाम होतो. पण सर्वाधिक परिणामकारक घटक तापमान हा आहे. कमीतकमी आणि सर्वाधिक तापमानातील फरक जेवढा अधिक तेवढी जैवविधता कमी.

जैवविविधता समृद्ध क्षेत्र (हॉटस्पॉट)

[संपादन]

जैवविविधता समृद्ध क्षेत्र अशा ठिकाणांना "हॉट स्पॉट" म्हणावे ही कल्पना डॉ. सबिना विर्क यांनी १९८८मध्ये मांडली. म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थानिक जातींचे वस्तीस्थान आहे त्यास जैवविविधता समृद्ध क्षेत्र म्हणता येते. बहुतेक समृद्धक्षेत्रे ही मानवी वस्त्यांजवळ आहेत. समृद्धक्षेत्रे जगभर विखुरलेली असली तरी उष्ण कटिबंधातील वनांत आणि सदाहरित जंगलांत त्यांची संख्या सर्वाधिक आहे.
ब्राझीलमधील अटलांटिक पर्जन्य-वन हे त्यांपैकी एक आहे. या वनामध्ये २०,००० प्रकारच्या वनस्पती, १३५० पृष्ठवंशी प्राणी आणि लक्षावधी कीटक आहेत. यातील निम्म्याहून अधिक असे आहेत, की ते इतरत्र कोठेही आढळत नाहीत. मादागास्कर बेटावर एकमेव अरण्य, मादागास्कर शुष्क वन आणि सपाटीवरील पर्जन्यवन आहे. मादागास्कर मूळ आफ्रिकन भूमीपासून साडेसहा कोटी वर्षांपूवी वेगळे झाल्याने या वनातील सजीवांमध्ये प्रदेशनिष्ठता दिसते. मादागास्करच्या भूमीवर अनेक जाती आणि परिसंस्था स्वतंत्रपणे विकसित झालेल्या आहेत. इंडोनेशियामधील १७००० बेटांनी १९,०४,५६० चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे. या प्रदेशामध्ये जगातील १० टक्के सपुष्प वनस्पती, १२ टक्के पृष्ठवंशी प्राणी, १७ टक्के सरपटणारे प्राणी, पक्षी आणि उभयचर प्राणी असे २४ कोटी माणसांच्या वस्त्यांच्या सहवासात आहेत. समृद्ध जैवविविधता असलेले काही भाग वैशिष्ट्यपूर्ण प्रदेशनिष्ठ भागांपासून उगम पावलेले असल्याने त्यांच्यामध्ये नेहमीच्या बदलाहून वेगळे बदल घडून आलेले आहेत. उदाहरणार्थ उंच पर्वतावर असलेला आल्पीय प्रदेश किंवा उत्तर अमेरिकेतील दलदल (पिट बॉग).
जैवविधतेचा अचूक अभ्यास हा असा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो असे ध्यानात आले आहे.

जैवविविधता विकास (उत्क्रांती)

[संपादन]

आज अस्तित्त्वात असलेल्या जैवविविधतेमागे ३५० कोटी वर्षांचा इतिहास आहे. सजीवांची नक्की निर्मिती केव्हा झाली हे जरी वैज्ञानिकांना सांगता आले नाही तरी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर वीस ते तीस कोटी वर्षानंतर प्राथमिक रचना असलेले सजीव अस्तित्त्वात आले यावर वैज्ञानिक ठाम आहेत. साठ कोटी वर्षापूर्वी अस्तित्त्वात असलेले सजीव आदिजीव, जीवाणू असे एकपेशीय रचनेचे होते. चौपन्न कोटी वर्षांपूवी फॅनरोझोइक कल्पामध्ये झालेल्या कॅंब्रियन युगामध्ये जैवविधतेमध्ये प्रचंड वाढ झाली. या प्रकारास कॅंब्रियन एक्स्प्लोजन असे म्हणण्याची पद्धत आहे. कॅंब्रियन युगामध्ये बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली. पुढील ४० कोटी वर्षांमध्ये विविधतेमध्ये बहुतांशी अपृष्ठवंशी सजीव अधिक संख्येने होते. याच कालखंडात पृष्ठवंशी सजीव घातीय श्रेणीने वाढत गेले. या वाढीबरोबर अनेक पर्यावरणीय कारणाने जैवविविधतेचा नाश होत होता. समूह विलोपन क्रियेमुळे जैवविविधतेमध्ये घट आणि वृद्धी हे प्रकार सजीवांच्या निर्मितीपासून चाललेले आहेत. कार्बनिफेरस युगामध्ये झालेल्या विलोपनामध्ये पर्जन्यवने भूपृष्ठाखाली गाडली गेली. या काळात गाडल्या गेलेल्या जीवाश्मांवर उच्च दाब आणि कार्बन वेगळा होण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले दगडी कोळसा आणि क्रूड ऑइल आजच्या आपल्या इंधनाची ९०% गरज भागवत आहे. पंचवीस कोटी वर्षापूर्वी पर्मियन-ट्रायसिक युगाच्या संधिकालात झालेल्या विघटनाने जैवविविधतेची सर्वाधिक हानी झाली.(या काळात डायनोसॉर नष्ट झाले). या धक्क्यातून सावरण्यास पृष्ठवंशी सजीवाना तीन कोटी वर्षे लागली. गेल्या दोन-तीन कोटी वर्षांच्या जीवाश्मांच्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे की आजच्या एवढी जैवविविधता कधीही अस्तित्त्वात नव्हती. सर्व वैज्ञानिकांना हे म्हणणे पूर्णपणे मान्य नाही. जीवाश्मीकरण हे सर्व सजीवांचे कधीही प्रातिनिधित्व करू शकत नाही हा त्यांचा आक्षेप आहे. काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार तीस कोटी वर्षांपूर्वीच्या आणि आजच्या जैवविविधतेमध्ये फारसा फरक नसावा. सध्याच्या सजीव जातींची संख्या दोन दशलक्ष ते शंभर दशलक्ष एवढी असावी. सर्व पर्यायांचा विचार करून सजीवांची संख्या १३० ते १४० लाखांपर्यंत पोहोचते. यांमधील संधिपाद प्राण्यांची संख्या सर्वाधिक आहे. ज्या ठिकाणी सजीवामध्ये संघर्ष कमी आहे म्हणजे निसर्ग निवडीच्या “फिटनेस”ला (डार्विंनचा सिद्धान्त) सामोरे जावे लागत नाही अशा ठिकाणी जैवविविधता वृद्धिंगत होते.

अधिकतम सजीव संख्या

[संपादन]

पृथ्वीवर एका वेळी सर्वाधिक किती सजीव राहू शकतील ही पृथ्वी ग्रहाची "सजीव धारण क्षमता" झाली. उदा. एका हेक्टरमध्ये अधिकतम किती गव्हाचे उत्पादन घेता येईल याची जीवशास्त्रीय मर्यादा गणिताने काढता येते. जाती-विविधता किती असू शकेल याचा अंदाज काढता येतो. सागरी सजीवांची विविधता वृद्धिवक्र पद्धतीने तर भूमीवरील सजीवांची विविधता घातश्रेणीने वाढते. एका वैज्ञानिकाच्या म्हणण्याप्रमाणे चतुष्पाद प्राणी आजच्या घटकेला भूप्रदेशावरील ६४% प्रदेशातसुद्धा पोहोचलेले नाहीत. मानवी हस्तक्षेपाशिवाय चतुष्पाद सजीवांची वाढ अशा पद्धतीने होण्याची शक्यता आहे की सर्व प्रकारच्या परिसंस्थेमेध्ये चतुष्पाद पोहोचतील.
याउलट फेनेरोझोइक कालखंडामध्ये जैवविविधतेच्या वाढीचा आलेख अपास्ताकार (हायपरबोलिक) आकाराचा दिसतो. पहिल्या स्तरातील धन पुनःप्रदाय पद्धतीने (पॉझिटिव्ह फीडबॅक) होतो. जेवढी पूर्वजांची संख्या अधिक तेवढी त्यापासून निर्माण होणाऱ्या पिढ्यांची संख्या अधिक. वृद्धीसाठी आवश्यक घटकांचा तुटवडा असल्यास सजीवांची विविधता ऋण पुनःप्रदाय पद्धतीने कमी होते. अपास्ताकार वाढीचे आणखी एक उदाहरण म्हणजे मानवी लोकसंख्येमधील वाढ. तंत्रज्ञानाच्या वाढीबरोबर आणि कृषी क्षेत्रामधील सुधारणामुळे अजून मानवी लोकसंख्या चरम वृद्धी संख्येपर्यंत पोहोचली नाही.
मानवाच्या उदयाबरोबर आणखी एक विलोपन क्रिया चालू झाली आहे यावर बहुतेक वैज्ञानिकांचे एकमत होत आहे. यास होलोसीन मास एक्स्टिन्शन असे म्हणण्याची पद्धत आहे. होलोसीन या ग्रीक शब्दाचा अर्थ “आधुनिक” असा आहे. प्लाइस्टोसीन कालखंडाचा अस्त झाल्यानंतर होलोसीन युगाचा सुमारे ११,००० वर्षापूर्वी प्रारंभ झाला. इ.स.पू. १०,००० मध्ये कृषी व्यवस्थेचा प्रारंभ झाला. परिसरामध्ये तंत्रज्ञान आणि अवजारांच्या मदतीने बदल करून नैसर्गिक अधिवास मानवास राहण्यायोग्य बनवणे हे होलोसीन युगाचे वैशिष्ट्य. मानवी हस्तक्षेपामुळे सध्या विलोपन क्रिया एवढी झपाट्याने चालली आहे की फक्त १०० वर्षामध्ये इतर सजीवांचा नाश होण्याची शक्यता आहे.

जैवविविधतेचा शाश्वत वापर

[संपादन]

जैवविविधता परिसंस्था टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते.

कृषि

[संपादन]

पिकांमधील विविधतेमुळे नेहमीचे पीक रोग किंवा किडीमुळे नष्ट झाल्यास पिकामध्ये हवे ते बदल घडवून आणण्यासाठी पिकांच्या वन्य जातींमधून इनब्रीडिंग करता येते.

  • १८४६मध्ये आयरिश पोटॅटो ब्लाइट नावाच्या कवक जन्य बटाट्यावरील रोगाने ऐंशी टक्के बटाट्याचे पीक नष्ट झाले. आयरिश लोक अन्नासाठी केवळ बटाट्यावर अवलंबून असल्याने १८४४ मध्ये असलेल्या बटाट्याच्या उत्पन्नापेक्षा १९४६ मधील पीक केवळ वीस टक्के होते. दहा लाख लोक यानंतरच्या दुष्काळात मरण पावले आणि तेवढेच स्थलांतरित झाले. १९४६ पर्यंत बटाट्याच्या पिकासाठी केवळ दोन जातींचे बियाणे वापरात होते. हे बटाट्याचे दोन्ही वाण Phytophthora infestans या कवकास बळी पडणारे होते.
  • १९६६मध्ये इंडिनेशियामधील भाताचे पीक ‘ राइस ग्रासी स्टंट व्हायरस’ या रोगामुळे नष्ट झाले. एका तपकिरी रंगाच्या तुडतुड्यापासून विषाणूचा प्रसार होतो. इंडोनेशियाचे प्रमुख अन्न भात असल्याने या विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी १९७० मध्ये ६२७३ या भारतीय भाताचे वाण तपासण्यात आले. त्यातील केवळ एका भाताचे वाण विषाणूचा प्रतिकार करणारे निघाले. या एका भाताच्या वाणाचा इतर भातांशी संकर करून इंडोनेशिया, फिलिपाइन्स, चीन, जपान मधील भाताचे पीक यशस्वीपणे वाचविण्यात आले.
  • १९७०मध्ये श्रीलंकेमध्ये पडलेल्या कॉफीवरील तांबेऱ्यामुळे तेथील सर्व कॉफीचे मळे नष्ट झाले. याचा परिणाम एवढा भयंकर होता की एकेकाळी कॉफी निर्यात करणाऱ्या श्रीलंकेचे राष्ट्रीय उत्पन्न चाळीस टक्क्यानी कमी झाले. त्यानंतर श्रीलंका हा केवळ चहा निर्यात करणारा देश अशी ओळख या देशाची झाली.

शेतीमध्ये अधिक उत्पादन मिळावे यासाठी एकच पीक विस्तृत क्षेत्रावर घेण्याची पद्धत आहे. कृषि व्यवसायातील बहुतेक अरिष्टे एकाच वाणाची निपज विस्तृत क्षेत्रावर केल्याने झालेले आहेत. यातील प्रमुख म्हणजे युरोपमध्ये १९व्या शतकातील मद्य उद्योगावरील संकट आणि अमेरिकेतील मक्यावरील रोगामुळे पडलेला १९७०चा दुष्काळ.
मानवी वापरासाठी असलेले ८०% अन्न फक्त वीस प्रकारच्या वनस्पतीपासून मिळविण्यात येते.पण त्याच्या ४०,००० जाती प्रत्यक्ष मानवी वापरात आहेत. यामध्ये निवारा, अन्न, फळे, औषधे, आणि वस्त्रप्रावरणे यांचा समावेश होतो. पृथ्वीवरील जैवविविधता वाढत्या लोकसंख्येची गरज अजून भागवत आहे यात शंका नाही पण मानवी वापराच्या जातींमधील विविधता झपाट्याने कमी होत आहे. याचा विचार करण्याची पाळी आली आहे.

मानवी आरोग्य

[संपादन]

जैवविविधता आणि मानवी आरोग्य हे सध्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचे कारण होत आहे. जैवविविधतेच्या नाशामुळे पृथ्वीच्या आरोग्यावर परिणाम होत आहे यावर शास्त्रीय संशोधन झाले आहे. जागतिक हवामान बदलाचे कारण हे मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या अनेक कारणापैकी एक. रोगाचे वाहक आणि कारक असणाऱ्या सजीवांचा प्रसार, गोड्या पाण्याची कमतरता, कृषि उत्पादनामधील घट, कृषि उत्पादनामधील तोच तोच पणा वगैरे. एखादी जाति नष्ट झाल्यानंतर निसर्गत: त्यास पर्याय उपलब्ध असायचा. पण आता असे पर्याय कमी उपलब्ध होत आहेत. ज्या जाति टिकून राहत आहेत त्या नवीन पोषितामध्ये संक्रमित होत आहेत. जुनेच आजार नव्या दाद न देणाऱ्या आजारांत बदलले जात आहेत. बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू आणि इन्‍फ्लुएंझा हे एकाच विषाणूचे बदललेले स्वरूप आहे. वेस्ट नाइल व्हायरस, लाइम आजार, हांटाव्हायरस असे नवीन विषाणू माणसामध्ये येण्यामध्ये त्यांच्या मूळ पोषितामध्ये झालेले परिवर्तन कारणीभूत आहे.
पाण्याची वाढती मागणी आणि पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नसणे हा मानवी आरोग्याशी निगडित महत्त्वाचा प्रश्न बनलेला आहे. स्वच्छ पाण्याचे वितरण वाढले असले तरी अनेक देशामध्ये पाण्याचे स्रोत नाहीसे होत आहेत. २००८ च्या जागतिक लोकसंख्येच्या अभ्यासावरून निघालेल्या माहितीनुसार अविकसित राष्ट्रामधील फक्त ६२% व्यक्तीना स्वच्छ पिण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे.
जैवविविधतेशी संबंधित आणखी काहीं प्रश्न म्हणजे अन्न सुरक्षा आणि सकस अन्नाची उपलब्धता, संसर्गजन्य आजार, आरोग्य विज्ञान , औषधांची उपलब्धता , सामाजिक आणि मानसिक आरोग्य. जैवविविधतेमधून औषध निर्मिती, आणि नव्या औषधांचा स्रोत सतत उपलब्ध आहे. आजच्या घटकेस अमेरिकन औषध उद्योगातील ५०% औषधामध्ये वनस्पति , प्राणी किंवा जीवाणू, कवके यांचा प्रक्रियेमध्ये कोठेतरी वापर केलेला आहे. जगातील ८०% लोकसंख्या प्राथमिक आरोग्यसेवेसाठी नैसर्गिक उपचारपद्धति किंवा नैसर्गिक औषधावर अवलंबून आहे. आजपर्यंत फार थोड्या जातींचा त्यांच्या औषधी गुणधर्मांचा अभ्यास झालेला आहे. जैवविविधतेचा नव्या इलेक्ट्रॉनिक्स आणि बायालॉजी यांच्यापासून निघालेली संयुक्त शाखा ‘बायॉनिक्स’ मध्ये झपाट्याने वापर चालू आहे. १९८०नंतर औषध उद्योगामध्ये नव्या औषधांची निर्मिती कमी झाल्यासारखे वाटत होते. पण जनुकीय शास्त्र आणि मानवी जनुक प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नव्या रासायनिक औषधांच्या निर्मितीवर भर पडत आहे. सागरी जैवविविधतेवर आधारित औषध निर्मिती नव्याने तपासून पाहण्याची गरज उत्पन्न झाली आहे.

औद्योगिक वापर

[संपादन]

अनेक उद्योगामध्ये सजीवापासून मोठ्या प्रमाणात मिळवलेल्या वस्तूंचा वापर होतो. घरे, कपडा, रंग, रबर आणि इंधन सर्वस्वी सजीवापासून मिळवले जातात. जैवविविधता पाणी, इमारती, लाकूड, कागद, तंतू आणि अन्न यांच्या पुनः पुनः निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जैवविविधतेचा ऱ्हास म्हणजे आर्थिक नुकसान.

छंद, संस्कृती आणि सौंदर्यदृष्टी

[संपादन]

जैवविविधता आस्तित्वात असण्याने पक्षी निरीक्षण, फुलपाखरे निरीक्षण, वनस्पति आणि प्राण्यांमधील सहसंबंध यांचा अभ्यास असे छंद जोपासता येतात. जंगलातील आडवाटा तुडवणे, फुलांचे ताटवे न्याहाळणे अशा निसर्ग सहलीनी जो आनंद मिळतो तो जैवविविधता नष्ट करण्याने हिरावून घेतला जातो. शंभर वर्षापूर्वी फक्त पुस्तकांमध्ये वर्णन केलेला एखादा पक्षी किंवा फुलपाखरू किंवा एखादी औषधी वनस्पति आणि त्याची फुले परत एकदा पहावयास मिळावी याचा आनंद अवर्णनीय आहे. सध्या जंगलामधून केवळ वाघ पहायला किंवा हत्तीवरून जंगल तुडवणे यासाठी सफारी आयोजित केल्या जात आहेत. केन्यासारखा देश सिंह,झेब्रा,आणि, पाणघोडे पहाण्यासाठी जगभरातील पर्यटकाना आकर्षित करतो आहे.
जैवविविधतेमुळे अनेल संगीतकार, चित्रकार, शिल्पी, लेखक आणि कलावंतामध्ये सौंदर्यदृष्टी आलेली आहे. अनेक संस्कृतीमध्ये जैवविविधता टिकवून राहणे म्हणजेच संस्कृति असा दृष्टिकोन उत्पन्न झाला आहे. राजस्थानसारख्या कमी पावसाच्या प्रदेशामध्ये खेजडी झुडूप आणि कृष्णमृग यांच्या रक्षणासाठी बिष्णोई जमातीनी प्राण गमावले आहेत. महराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधील अनेक देवस्थानांच्या आश्रयाने वाढलेल्या देवरायामध्ये झाडाचे पानसुद्धा तोडायचे नाही अशा अलिखित नियमामुळे अनेक प्रजाति टिकून राहिलेल्या आहेत.
बागामध्ये शोभेच्या वनस्पति लावणे, वाढवणे, औषधी वनस्पति उद्यान, घरगुति मत्स्यपालन, प्राणिसंग्रहालये, मत्स्यालये, अशा अनेक व्यबसासायांचा उगम जैवविविधतेमध्ये आहे. सर्वसामान्य व्यक्ती अशा छंदाना मनापासून प्रतिसाद देते. व्यावसायिकपणे दुर्मीळ प्राणी जोपासणे, त्यांना वाढवणे, दुर्मीळ पक्षी सांभाळणे त्याना परत निसर्गामध्ये सोडणे, त्यांचे संवर्धन अशा छंदांचे नेमके मूल्यमापन करणे हे कठीण काम आहे. पण केवळ निसर्गाच्या प्रेमापोटी काहीं संस्था हे काम पदरमोड करून करत आहेत. राजकीय दृष्ट्या ग्रीन पार्टी नावाचा पक्ष १९७०पासून जर्मनी, बेल्जियम, स्वीडन यांमध्ये पर्यावरणरक्षण या अजेंड्यावर काम करतो आहे. आज ही लाट युरोप आणि उत्तर अमेरिकमध्ये एक प्रभावी पक्ष बनली आहे.

पर्यावरण सेवा

[संपादन]

जैवविविधतेमुळे अनेक पर्यावरण सेवा उपलब्ध झाल्या आहेत. या सेवा प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्षपणे मानवी जीवन सुसह्य बनवतात. हवेच्या घटकांचे संतुलन, गोड्या पिण्याच्या पाण्याचे चक्र, यांचे मूल्यमापन अशक्य आहे. यामधील जैवविविधतेच्या मदतीची रुपयात किंवा डॉलरमध्ये किंमत केल्यास कोणत्याही प्रगत राष्ट्राला ती चुकवता येणार नाही. मृदेमधील अन्नघघटक चक्र, सुपीक जमीन तयार करणे, अशी कामे मानवी प्रयत्‍नांनी करायची ठरवली तर ते अशक्य आहे. केवळ संतुलितपणे ज्या सेवा जैवविविधतेमुळे मिळतात त्या अमूल्य आहेत.एकच उदाहरण द्यायचे तर ते कीटकाद्वारे करण्यात येणाऱ्या परागीभवनाचे द्यावे लागेल. कीटकांनी मानवास दिलेली ही देणगी पैसे खर्च करून करवून घ्यायची तर किती रक्कम द्यावी लागेल याचा विचारच केलेला बरा.

सजीव जातींची संख्या

[संपादन]

जागतिक सजीव वर्गीकरण विभागाने आणि युरोपियन डिस्ट्रिब्यूटेड इंस्टिट्यूट ऑफ टॅक्सॉनॉमी या संस्थानी सजीवांच्या प्रत्येक वर्गातील (फायला) एकूण जातींचा २०१०मधील केलेला अंदाज प्रत्यक्षात असलेल्या जातीहून कितीकरी कमी असावा असे म्हणले आहे.

  • १ ते कोटी कीटक
  • अर्धा ते १ कोटी जिवाणू
  • १५ लाख कवके
  • १० लाख अष्टपाद
  • सूक्ष्म जीवांची नक्की संख्या किती याचा अंदाज अजून आलेला नाही. जागतिक सागरी पाण्यातील सूक्ष्म जीवांची पाहणी केल्यानंतर असे आढळून आले की प्लवंगामधील सूक्ष्म जीवांमध्ये अधिक विविधता आहे. २००४-२००६मध्ये केलेल्या सूक्ष्म जीवांच्या अभ्यासानंतर सध्या ‘जाति’ या व्याख्येमध्ये ओळखले जाणाऱ्या सजीवांना काही मर्यादा आहेत.

सध्याचा जाति विलोपनाचा वेग वाढला आहे. हा वाढलेला वेग ध्यानात घेतला तर कित्येक जाति ओळखण्याआधी विलुप्त होण्याची शक्यता अधिक आहे.

जाति विलोपनाचा वेग

[संपादन]

गेल्या शतकात जैवविविधतेमधील घट मोठ्याप्रमाणात लक्षात आली. २००७मध्ये जर्मन फेडरल प्रशासनातील एक मंत्री सिग्मार गॅब्रिएल यानी सध्या अस्तित्त्वात असलेल्या प्रजातीमधील ३०% प्रजाति २०५०पर्यंत नष्ट होतील असे विधान केले. यापैकी ठाऊक असलेल्या वनस्पतींपैकी एक अष्टमांश विलोपनाच्या मार्गावर आहेत. हा विलोपनाचा वेग दरसाल १,४०,००० जाती एवढा प्रचंड आहे. हा धोका मुख्यत्वेकरून पर्यावरणातील असंतुलित बदलांमुळे आहे. आजपर्यंत कधी नव्हे एवढ्या वेगाने विलोपनाचा वेग वाढला आहे यावर बहुतेक वैज्ञानिकांचे एकमत झाले आहे.

जैवविविधतेस असणारे धोके

[संपादन]

अधिवास नाहिसा होणे, अतिशिकार, नव्या अधिवासात नव्या जातींचा प्रवेश, आणि द्वितीय विलोपन यामुळे जैवविविधतेस धोका उत्पन्न होतो असे जेअर्ड डायमंड या निसर्गतज्‍ज्ञाने वर्णन केले आहे. एडवर्ड ओ विल्सन यानी जैवविविधतेच्या घोक्याचे संक्षिप्त रूप हिप्पो असे केले आहे. हॅबिटॅट डिस्ट्र्क्शन(अधिवास नाश), इन्व्हॅझिव स्पिशीज(नव्या ठिकाणी नको त्या जातीचा प्रवेश), ह्यूमन ओव्हर पॉप्युलेशन(मानवी लोकसंख्येची वाढ) आणि ओव्हर हार्वेस्टिंग(कृषि क्षेत्राची अनिर्बंध वाढ) असे केले आहे. “इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉंझरव्हेशन ऑफ नेचर”(आययूसीएन) या आंतरराष्ट्रीय संघटनेनुसार हे सर्व जैवविविधतेचे प्रत्यक्ष धोके आहेत.

अधिवास बदल

[संपादन]

जैवविविधता विलोपनामध्ये अधिवास बदल किंवा अधिवास नाहीसा होण्याचा मोठा धोका उद्भवतो. सहाहरित जंगलामध्ये होत असलेली वृक्षतोड, लोकसंख्या वाढ, जंगलाच्या जमिनीमध्ये खाणकाम, हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण आणि जलप्रदूषण याशिवाय जागतिक हवामान वाढ या सर्वाचा अधिवास बदलाशी संबंध येतो. अधिवासाचे क्षेत्रफळ आणि त्या अधिवासामध्ये असणाऱ्या जातींची संख्या परस्परांवर अवलंबून आहेत. त्यांतल्या त्यात आकाराने मोठ्या जाति व समुद्रसपाटीलगत असणाऱ्या जंगलातील जाति-अधिवासबदलास संवेदनक्षम आहेत. दक्षिण भारतातील सलग जंगलांचे पट्टे नष्ट झाल्याने पश्चिम घाट जंगलामधील हत्ती उन्हाळ्यात पीक क्षेत्रामध्ये घुसतात. ऊस हे त्याना त्यांचे नैसर्गिक खाद्य वाटल्याने ते तेथेच राहतात. त्याना हुसकून लावण्याचा प्रयत्न केल्यास ते परत परत तेथेच येत राहतात. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यानंतर पुनर्वनीकरणामध्ये अस्तित्त्वात असलेल्या सर्व वनस्पति परत कधीच लावता येत नाहीत. एकाच प्रकारच्या वृक्षांचे पट्टे लावण्याने त्या परिसरामध्ये असलेली विविधता नष्ट होते. नॅशनल सायन्स फाउंडेशन यानी केलेल्या २००७मधील अभ्यासामधून असे समजले की जैवविविधता आणि जनुकीय विविधता यांचा परस्पर संबंध आहे. जातींमधील विविधतेसाठी जातींमध्ये जनुकीय विविधता असणे आवश्यक आहे. एका घटकाचा अभाव म्हणजे दोन्हीमधील संतुलन संपणे. अशा वेळी परिसरामध्ये एकच जाति प्रबळ ठरते. पाळीव प्राण्यांच्या बाबतील हे सहज समजून येते. पशुपालनासाठी राखीव कुरणे म्हणजे फक्त दूध किंवा मांसासाठी जनावरे पाळणे. हाच प्रकार कृषिव्यवस्थेमध्ये घडतो. उत्पादन घटण्याच्या भीतीने दुसरी वनस्पति म्हणजे तण शेतामध्ये वाढू दिले जात नाही.

जैवविविधता उद्दिष्टे

[संपादन]

पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता संवर्धन कायदा १९९९ वाणाचा ऱ्हास

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Gaston, K. J. (2000-05-11). "Global patterns in biodiversity". Nature. 405 (6783): 220–227. doi:10.1038/35012228. ISSN 0028-0836. PMID 10821282.
  2. ^ Dasmann, Raymond Fredric (1968). A Different Kind of Country (इंग्रजी भाषेत). Collier Books.