जे. आर. जयवर्धने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ज्यूनियस रिचर्ड जयवर्धने

ज्यूनियस रिचर्ड जयवर्धने (१७ सप्टेंबर १९०६ – १ नोव्हेंबर १९९६), हे श्रीलंकेत जेआर म्हणून ओळखले जाणारे एक राजकारणी होते. त्यांनी प्रथम १९७७ ते १९७८ या काळात पंतप्रधानपद भूषविले. त्यानंतर १९७८ ते १९८९ या दीर्घ काळात राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केले. ते पूर्वीच्या सीलोन (आताचे श्रीलंका) मधील राष्ट्रवादी चळवळीचे नेते होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर विविध मंत्रिमंडळात अनेक खाती सांभाळली. युनायटेड नॅशनल पार्टीचे दीर्घकाळ सदस्य असलेले जेआर यांनी १९७७ मध्ये सर्व विरोधकांना पराभूत करून विजय मिळविला आणि संविधानातील दुरुस्तीनुसार देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान मिळविला.[१]

जन्म आणि शिक्षण[संपादन]

कायद्याच्या क्षेत्रात प्रतिष्ठित असणाऱ्या कुटुंबात जेआर यांचा जन्म झाला. सिलोनचे मुख्य न्यायाधीश यूजेन विल्फ्रेड जयवर्धने के.सी. यांच्या ११ मुलांपैकी जेआर हे सर्वात मोठे होते. त्यांनी कोलंबोच्या बिशप कॉलेज येथे प्राथमिक शिक्षण घेतले आणि माध्यमिक शिक्षणासाठी रॉयल कॉलेज, कोलंबो येथे प्रवेश घेतला. रॉयल कॉलेज येथे ते १९२५ मध्ये रॉयल-थॉमियन मालिकेत क्रिकेट संघासाठी खेळले. १९२१ मध्ये रॉयल कॉलेज सोशल सर्व्हिसेस लीगचे ते प्रथम अध्यक्ष व सचिव होते. त्यांनी फुटबॉलमुष्टीयुद्ध स्पर्धेतही शाळेचे प्रतिनिधित्व केले. ते कॅडेट कॉर्प्सचे सदस्यही होते.

सन १९२६ मध्ये इंग्रजी, लॅटिन, तर्कशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचा अभ्यास करण्यासाठी जयवर्धने यांनी विद्यापीठ कॉलेज, कोलंबो (लंडन विद्यापीठ) येथे प्रवेश केला. येथेही त्यांनी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविले. १९२८ मध्ये त्यांनी कोलंबो लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेवून कायद्याची पदवी प्राप्त केली. वकिलीची सनद मिळाल्यानंतर थोड्या काळासाठी त्यांनी व्यवसाय सुरु केला.[२]

राजकारण प्रवेश[संपादन]

जयवर्धने यांनी थोड्याच काळात वकिली सोडली आणि १९३८ मध्ये ते सिलोन नॅशनल काँग्रेस (सीएनसी) मध्ये सक्रीय झाले. या पक्षाने सिलोनच्या राष्ट्रवादी चळवळीचे (ज्यामुळे १९७२ मध्ये अधिकृतपणे श्रीलंकेचे नाव बदलले) नेतृत्व केले. १९३९ मध्ये ते संयुक्त सचिव झाले आणि १९४० मध्ये ते न्यू बझार वार्ड येथून कोलंबो नगरपरिषदेत निवडून आले. १९४३ मध्ये त्यांनी राज्य विधानमंडळात प्रवेश केला.

१९४७ मध्ये ते द्वीपाच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये अर्थमंत्री झाले. जयवर्धने यांची तीव्र बुद्धिमत्ता आणि आक्रमक राजकीय कौशल्यांमुळे त्यांनी १९४७-१९५६ व १९६५-१९७० या काळात सरकारात असताना आणि विरोधी पक्षातही १९५६-१९६५ आणि १९७०-१९७७ या दरम्यान महत्वाची भूमिका बजावली. १९५१ मध्ये सर एडविन विजयरत्ने यांच्या अध्यक्षतेखाली श्रीलंकेचे राष्ट्रगीत निवडण्यासाठी तयार केलेल्या समितीचे जयवर्धने सदस्य होते. पुढील वर्षी ते बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन सिलोनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.[३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "J.R. Jayewardene PRESIDENT OF SRI LANKA". britannica.com. २८ ऑक्टोबर २०१८. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. 
  2. ^ "JR's 10th death anniversary today". dailynews.com. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. 
  3. ^ "J. R. Jayewardene of Sri Lanka Dies at 90; Modernized Nation He Led for 11 Years". nytimes.com. २ नोव्हेंबर १९९६. ३० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.