जेजुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जेजुरी ग्रामीण गाव या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?जेजुरी

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१८° १६′ २०.३८″ N, ७४° ०९′ ३७.४४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पुणे
तालुका/के पुरंदर
लोकसंख्या ४०,००० (२०१0)
कोड
पिन कोड

• ४१२३०३
जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर
हळदीची होळी ,खंडोबा मंदिर ,जेजुरी

पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे.[१]खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे.

देवस्थानचे स्वरूप[संपादन]

पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (नऊ लाख पायऱ्या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणाऱ्याा व्यक्तीला बक्षिस देण्याची पद्धत आहे. दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते. तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.[२]

ऐतिहासिक महत्व[संपादन]

उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे (इ.स.१७१२ सालचे) देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. परंतु, औरंगजेबाने १,२५,००० चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो. देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत. जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. मराठा, कुणबी, धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले. सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले. तुकोजी होळकरांच्या काळात जेजुरीपासून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या श्री भुलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम झाले. काही जुन्या पत्रात जेजुरीच्या ओवऱ्याच्या कामासाठी तयार केलेला चुनखडीचा चुना भुलेश्वरला नेला होता. भुलेश्वर मंदिर अकराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी बांधले.काही काम नंतरच्या काळातही झाले. ब्रम्हेंद्रस्वामी यांनी, भुलेश्वरचा मंडप, माळशिरस गावातील बारव, यासाठी खर्च केला हाेता. साहित्यिक व इतिहासाचे अभ्यासक दशरथ यादव यांच्या यादवकालीन भुलेश्वर या ऐतिहासिक संशोधनपर पुस्तकात कऱ्हा पठाराचाही (कडेपठाराचाही) इतिहास उलगडला आहे. खंडोबा हे भुलेश्वराचे भक्त होते. बळीराज्याच्या काळात खंडोबा हे एका खंडाचे मुख्य होते. लोकदेव खंडोबा व लोकदेव विठोबा हे महाराष्ट्राच्या घराघरात रुजलेली दैवत आहेत.

निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक वाटणाऱ्या वास्तुकलेचे जेजुरीचच्या खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.

गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.

देऊळ व परिसर[संपादन]

भंडारा उधळणे

जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता. दुर्दैवाने शिखर-शिंगणापूर तीर्थक्षेत्राप्रमाणेच येथेही दाक्षिणात्य शैलीचे या वास्तूशी पूर्ण विशोभित शिखर नव्याने बांधण्यात आले आहे. देवळाच्या ओवऱ्या व समोरचा ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत. गडावर जाताना वाटेत नगर पालिकेने सुंदर उद्यान तयार केले आहे.

देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांगभले खंडोबांचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते. तळी भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावयाचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधळण करावयाची.

खंडोबा ही सकाम देवता आहे. नाना फडणवीस यांनी नवसाप्रीत्यर्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते. पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या, दगडी मंडपी रुप्याने मढवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे वगैरे सामग्री वाहिली. मंदिरात चांदी-पितळेचे तीन मूर्ति-जोड होते. एक सोन्याचा जोड इ.स. १९४२ च्या सुमारास चोरीला गेला; बाकी शिल्लक आहेत.

खंडोबाची यात्रा व जत्रा[संपादन]

खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात. देवास वाहिलेल्या मुला-मुलींचे वाघ्या-मुरळींत रूपांतर होते. कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे, वाघ्या-मुरळींकडून जागरण किंवा तळी भरणे-उचलणे, बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हाळावरून (विस्तवारून) चालणे अशा अनेक प्रकारे नवसपूर्ती करण्यात येते. पौषी व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वऱ्हाड, खानदेश, कोकण इत्यादी भागांतून उपासक येतात. खैरे, होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळक मिरवणुकीने वद्य द्वितीयेस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात. नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो. जेजुरीस अनेक भक्तगण महाराष्ट्रातून नियमाने येतात व खंडोबाच्या कृपेने यात्रेत संतुष्ट होऊन परत फिरतात.

गाढवांचा बाजार[संपादन]

पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत वर्षानुवर्षे गाढवांचा बाजार भरत आला आहे. विशेष म्हणजे यंत्रांच्या युगात जनावरांचा वापर कमी झाला असला तरी जेजुरीतल्या या गाढवांच्या बाजारात दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असते.


खंडोबाची स्थाने[संपादन]

  • अणदूर (नळदुर्ग) (धाराशिव)
  • जेजुरी (पुणे)
  • देवरगुड्डा (राणीबेन्नूर)
  • निमगाव धावडी (पुणे)
  • पाली (सातारा)
  • मंगसुळी (बेळगाव)
  • माळेगाव (नांदेड)
  • आदि मैलार (बिदर)
  • मैलारपूर (यादगीर) (गुलबर्गा)
  • मैलार लिंगप्पा (खानापूर) (बेल्लारी)
  • शेगुड ( ता कर्जत जि अहमदनगर)
  • सातारे (छत्रपती संभाजीनगर)
  • शेलवली-खंडोबाची (शहापूर ठाणे)
  • काकनबर्डी (ओझर ता. पाचोरा जि. जळगाव)
  • देवदैठण (ता.जामखेड, जि.अहमदनगर)
  • वाकडी (ता.राहता जि.अहमदनगर)
  • चंदनपुरी (ता.मालेगाव जि.नाशिक)
  • बाळे (सोलापूर जवळ)
  • ममुराबाद (तालुका,जिल्हा जळगाव)

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Pattanaik, Devdutt (2021-05-11). Bharat varsh ke 32 Tirth Sthal (हिंदी भाषेत). Manjul Publishing. ISBN 978-93-91242-67-1.
  2. ^ "जेजुरीच्या सोमवती यात्रेत घुमला 'सदानंदाचा येळकोट' गजर! भंडाऱ्याची उधळण करत खंडोबा आणि म्हाळसा मूर्तींना स्नान| Jejuri Gad Sadanandacha Yelkot Gajar Somvati Amvasya Yatra of Khandoba". Loksatta. 2023-11-13. 2024-02-05 रोजी पाहिले.