जेंडरिंग कास्ट (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेंडरिंग कास्ट : थ्रू अ फेमिनिस्ट लेन्स हे भारतीय स्त्रीवादी इतिहासशास्त्रज्ञ उमा चक्रवर्ती यांनी लिहिलेले पुस्तक आहे. हे पुस्तक २००३ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित होऊन २००६ मध्ये पुनःप्रकाशित झाले. 'जेंडरिंग कास्ट : थ्रू अ फेमिनिस्ट लेन्स' हे मैत्रेयी कृष्णराजन यांनी संपादित केलेल्या 'थियरायझिंग फेमिनिझम; या शृंखलेतले एक पुस्तक आहे.[१]

ठळक मुद्दे[संपादन]

हे पुस्तक जात व लिंगभाव या मधील आंतरसंबंध स्पष्ट करते. जातीच्या निर्मितीत लिंगभाव हा अत्यंत महत्त्वाचा घटक राहिला आहे हे लेखिकेने विविध ऐतिहासिक स्रोत, धार्मिक ग्रंथ आणि मानववंशशास्त्रातील व समाजशास्त्रातील साहित्याच्या आधारावर दाखवून दिले आहे. स्त्रीवादी अध्यापनात जातीचा समावेश मंडल विरोधी आंदोलनानंतरच्या दशकात झाला असे पुस्तकाच्या प्रस्तावनेत उमा चक्रवर्ती यांनी मांडले आहे. या पुस्तकामुळे 'ब्राम्हणी पितृसत्ता (Brahmanical Patriarchy)' ही संकल्पना पुढे आली.[२]

सारांश[संपादन]

पुस्तकातील पहिले प्रकरण हे भारतातील जाती व्यवस्थेचे तत्त्वज्ञान व व्यवहाराचे परीक्षण करते.[३] येथे विरोधाभासी मांडणी असेलेले ड्यूमॉन्टबाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तसेच जातीवर्ण यासंदर्भातील समाजशास्त्रीय व्याख्या पुढे आणतात. त्या जातवर्ग यांमधील संबंध दाखवून देतात व धार्मिक ग्रंथांच्या आधारावर कशा पद्धतीनी जात ही ज्ञानाची एकाधिकारशाहीचे किंवा ज्ञान क्षेत्रातून काहींना वगळण्याचे समर्थन करते हे दाखवून देतात.

दुसऱ्या प्रकरणात लेखिका जातलिंगभाव यांच्या संबंधावर लक्ष वेधतात व ह्या दोन्ही संस्था कशा पद्धतीने एक दुसऱ्यांना कामगारांच्या व लग्नाच्या क्षेत्रात घडवतात हे विशेषतः दाखवून देतात. स्त्रियांचे शरीर हे जाती व्यवस्थेचे प्रवेशद्वार कसे ठरवण्यात आले हे सुद्धा त्या मांडतात.

तिसऱ्या प्रकरणात ब्राम्हणी पितृसत्तेच्या काळात कशा रीतीने कट्टर जातीवर आधारित पितृसत्ताक नियम घडवले गेले, त्यांचा संबंध उत्पादनाशी कसा जोडण्यात आला व राज्यसंस्थेचा त्याला पाठिंबाही कसा मिळाला या ऐतिहासिक पाळ्यामुळ्यांचा उमा चक्रवर्ती आढावा घेतात..

प्रकरण ४ दाखवते की भारतात जातीची शुद्धता टिकवण्यासाठी कशा पद्धतीने स्त्रियांच्या लैंगिकतेवरील नियंत्रण हे अत्यावश्यक होते व या गरजेतून भारतातील पितृसत्ता कशी निर्माण केली गेली. जातलिंगभावावर आधारित ही सामाजिक रचना भारतात फ़क़्त हिंसेच्या बळावर नाही तर स्त्रियांची संमती मिळवून कशी प्रस्थापित केली गेली हे या प्रकरणात लेखिका दाखवून देतात.

५व्या प्रकरणात लेखिका दाखवून देतात की भारतात कशा पद्धतीने पितृसत्ताक व्यवहारातील वैविध्यांना परवानगी देऊन, त्यांना सहन करून व लादून हिंदू समाजातील जातिव्यवस्था टिकवली जाते.जातींजातींतील भिन्न भिन्न व्यवहार एका उतरंडीत आहेत व यामुळे पितृसत्तेचे व्यवहार हे प्रत्येक जातीत कसे वेगळे असतात व जातीय उच्चनीचता सिद्ध करण्यास कसे महत्त्वाचे ठरतात हे चक्रवर्ती या प्रकरणातून दाखवून देतात.

सहाव्या प्रकरणात लेखिकेने भारतामध्ये जातिव्यवस्थेला इतिहासात झालेले विरोध वर्णिले आहेत. या विरोधांमध्ये बौद्ध परंपरा, भक्ति-परंपरा व शैव पंथ यांचा महत्त्वाचा हात होता असे त्या दाखवून देतात.

आजची समाजव्यवस्था व आजच्या अभिव्यक्तीचे स्वरूप हे ब्रिटिश काळादरम्यान तयार होत गेले आहे व त्या आधीची जातिव्यवस्था कधीच इतकी शोषण करणारी नव्हती, असे मागील दशकापासून झालेले बरेच अभ्यास मांडतात. या मांडणीला उत्तर देत ७व्या प्रकरणात उमा चक्रवर्ती १८व्या शतकातील विविध उदाहरणांद्वारे दाखवून देतात की ब्रिटिश येण्याच्या आधीसुद्धा जात ही शोषण करण्याची यंत्रणा म्हणून काम करत होती.

पुस्तकातील ८व्या प्रकरणात लेखिकेने ब्रिटिश भारतात जातीचे स्वरूप कसे होते ते सांगितले आहे. जनगणनेसारखे प्रशासकीय साधन, ख्रिस्ती धर्मात केलेले धर्मांतर, कायद्याचा हस्तक्षेप व वासाहतिक काळात झालेल्या सुधारणा व त्यांच्या मर्यादा यांमुळे जातींच्या स्थानात कसे बदल झाले यावर त्या विशेष भर देतात.

९व्या प्रकरणात लेखिका स्वतंत्र भारतातातील जातिव्यवस्थेबाबत चर्चा करतात. दलितांची ठाम अभिव्यक्ती, जातिव्यवस्था टिकवून ठेवण्यास स्त्रियांचा सहभाग व काही महत्त्वाचे जातीय लढे यांचे जाती व लिंगभाव या चर्चाविश्वावर काय परिणाम झाले हे लेखिका काही स्वतंत्र उदाहरणे देऊन स्पष्ट करतात.

संदर्भ सूची[संपादन]

  1. ^ Chakraborty, Uma (2003). Gendering Caste Through a Feminist Lens (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 9788185604541.
  2. ^ "Conceptualising Brahmanical Patriarchy in-Early India-Gender, Caste, Class and State". Economic and Political Weekly (इंग्रजी भाषेत). 28 (14). 2015-06-05.
  3. ^ "Uma Chakravarti - 1984 Living History". 1984 Living History (इंग्रजी भाषेत). 2014-11-04. 2018-03-25 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]