जाबालदर्शन उपनिषद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे उपनिषद सामवेदीय आहे. यालाच ‘दर्शन उपनिषद’ असेही म्हणतात. या उपनिषदात एकूण दहा खंड आहेत. भगवान दत्तात्रेय आणि त्यांचे शिष्य सांकृती या दोघांमध्ये ‘अष्टांगयोग’ या विषयावर झालेल्या विस्तृत प्रश्नोत्तरांचे वर्णन या उपनिषदात आलेले आहे. पहिल्या खंडात योगाच्या आठ अंगांचा आणि दहा यमांचा उल्लेख आहे. दुसऱ्या खंडात दहा नियमांचे वर्णन आहे. तिसऱ्या खंडात नऊ प्रकारची योगिक आसने सांगितलेली आहेत. चौथ्या खंडात नाडीपरिचय आणि आत्मतीर्थ व आत्मज्ञानाचे श्रेष्ठत्व वर्णन केलेले आहे. पाचव्या खंडात नाडीशोधनाची प्रक्रिया तसेच आत्मशोधनाच्या विधींचे वर्णन आहे. सहाव्या खंडात प्राणायामाचा विधी, त्याचे प्रकार आणि प्रयोगांचा उल्लेख आहे. सातव्या खंडात प्रत्याहाराच्या विविध प्रकारांचे आणि त्याच्या फलांचे विवरण आहे. आठव्या आणि नवव्या खंडात धारणेचे तसेच ध्यानाचे वर्णन आहे. दोन्हींच्या दोन-दोन प्रकारांचा उल्लेख केलेला आहे. अंतिम दहाव्या खंडात समाधी अवस्थेचे वर्णन आलेले आहे. त्यासोबतच तिच्या फळाचेही वर्णन दिलेले आहे. याप्रकारे ह्या उपनिषदास पूर्णतः ‘योगपरक’ म्हटले जाऊ शकते.