जय संतोषी मा
| प्रकाशन तारीख | 1975 |
|---|---|
| मूळ देश | भारत |
| मूळ भाषा | हिंदी |
| दिग्दर्शक | Vijay Sharma |
| प्रमुख कलाकार | कानन कौशल, भारत भूषण, आशिष कुमार, अनिता गुहा |
| चित्रीकरण दिग्दर्शक | सुधेंदु रॉय |
जय संतोषी मा हा १९७५ चा एक भारतीय हिंदी भाषेतील भक्तीपट आहे, ज्याचे दिग्दर्शन विजय शर्मा यांनी केले असून लेखन आर. प्रियदर्शी यांनी केले आहे. संतोषी माता ही समाधानाची देवी आहे. या चित्रपटाची गाणी उषा मंगेशकर, महेेंद्र कपूर, मन्ना डे आणि प्रसिद्ध कवी कवी प्रदीप, यांनी गायले असून कवी प्रदीप यांनी गाण्यांचे बोल लिहिले होते. कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला आणि त्या काळी ६७ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.[१]
कथानक
[संपादन]चित्रपटाची सुरुवात देवलोकापासून होते, जिथे आपण संतोषी मातेचा "जन्म" पाहतो. त्या गणपतीच्या कन्या आहेत. गणेशाच्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धी ("समृद्धी" आणि "आध्यात्मिक शक्ती") या संतोषी मातेच्या आई असून क्षेम व लाभ ("सुरक्षा" आणि "नफा") हे मातेचे भाऊ आहेत.
विष्णू भक्त नारद यात महत्त्वाची भूमिका बजावतो, जो नियमितपणे चित्रपटातील मानवी आणि दैवी अशा दोन्ही समांतर कथानकांना पुढे नेण्यासाठी हस्तक्षेप करतो.
आता कथानक १८ व्या शतकातील कन्या सत्यवती शर्मा (काणन कौशल) हिच्या जवळ येऊन ठेपते. सत्यवती ही संतोषी मातेची सर्वात मोठी भक्त आहे. मातेच्या कृपेने, सत्यवती लवकरच बिरजू (बृजमोहन) याच्या प्रेमात पडते. बिरजू हा एका समृद्ध व्यास ब्राह्मण शेतकरी कुटुंबातील सात भावांपैकी सर्वात लहान, कलासक्त आणि गाण्याची आवड असलेला तरुण आहे. बिरजूच्या सहा भावजयींपैकी दुर्गा आणि माया या बिरजू आणि सत्यवतीचा द्वेष करतात. परिस्थिती तेव्हा अधिक बिघडते जेव्हा, नारद मुनी तीन प्रमुख देवी, लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती यांच्या मनात संतोषी मातेविरुद्ध "मत्सर" निर्माण करतात. या देवी संतोषी मातेच्या मुख्य भक्ताचे जीवन दुःखी करून तिची श्रद्धा (परीक्षा) घेण्याचे ठरवतात. अर्थात, हे सर्व एक नाटक असते आणि त्या त्रिदेवी केवळ सत्यवतीच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी संतोषी मातेबद्दल मत्सर असल्याचे ढोंग करत असतात.
आपल्या नातेवाईकांशी भांडण झाल्यानंतर, बिरजू आपले नशीब आजमावण्यासाठी घर सोडतो. वाटेत, पत्नीच्या संतोषी मातेवरील भक्तीमुळे तो मृत्यूच्या सापळ्यातून थोडक्यात वाचतो. परंतु बिरजूच्या कुटुंबाला तो मेला असल्याचे वाटते. सत्यवतीची नणंद आणि भावजयी तिला गुलामसारखी वागणूक देतात, मारहाण करतात, उपाशी ठेवतात आणि एक स्थानिक गुंड तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो. परंतु संतोषी माता मात्र नेहमी तिचे रक्षण करते. शेवटी जेव्हा सत्यवती आत्महत्येचा प्रयत्न करते, तेव्हा नारद तिला थांबवतात आणि संतोषी मातेच्या १६ शुक्रवारच्या व्रताबद्दल सांगतात. सत्यवती महत्प्रयासाने हे व्रत पूर्ण करते. स्मृती गेलेल्या बिरजूला संतोषी मातेच्या कृपेने, पुन्हा गतस्मृती प्राप्त होते आणि तो धनसंपत्ती घेऊन घरी परततो. वापस आल्यावर त्याला आपल्या पत्नीला मिळालेल्या वाईट वागणुकीबद्दल समजते. तो स्वतःसाठी एक आलिशान घर बांधतो, ज्यामध्ये आईच्या मंदिराचाही समावेश असतो. सत्यवती व्रत पूर्ण झाल्यावर या घरात एका मोठ्या समारंभाचे आयोजन करते आणि सासरच्या मंडळींना आमंत्रित करते. परंतु, स्वर्गातील देवी आणि दुष्ट भावजयी तिचा अपमान करण्याचा शेवटचा प्रयत्न करतात आणि अन्नामध्ये लिंबाचा रस पिळतात (संतोषी मातेच्या व्रताच्या नियमांनुसार कोणतेही आंबट किंवा कडू पदार्थ खाणे किंवा देणे निषिद्ध असते). सर्वत्र गोंधळ उडतो, परंतु शेवटी पृथ्वी आणि स्वर्गात शांतता प्रस्थापित होते आणि संतोषी मातेला देवकुलमध्ये मानाचे स्थान मिळते, कारण लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती या तिघींनाही सत्यवतीच्या भक्तीची खात्री पटते.
कलाकार
[संपादन]- कानन कौशल - सत्यवती व्यास (माहेरचे आडनाव शर्मा)
- आशिष कुमार - बृजमोहन ("बिरजू") व्यास
- अनिता गुहा - श्री संतोषी माता
- भारत भूषण - पंडित देवीदत्त शर्मा, सत्यवतीचे वडील
- रजनी बाला - गीता
- त्रिलोक कपूर - भगवान शिव
- बेला बोस - दुर्गा व्यास
- बृज मोहन व्यास - गीताचे वडील आणि दागिने व्यापारी
- राजन हक्सर - भैरव "भैरवराम" व्यास
- मनोहर देसाई - दयाकर ("दयाराम") व्यास
- दिलीप दत्ता
- महिपाल - देवर्षी नारद
- पद्माराणी - देवी माता ब्रह्माणी
- लीला मिश्रा
- सुशीला देवी
ध्वनीमुद्रण
[संपादन]- गीतकार: कवी प्रदीप
- संगीतकार: सी अर्जुन
| गाणे | गायक |
|---|---|
| "करती हूं तुम्हारा व्रत मै" | उषा मंगेशकर |
| "यहां वहां जहां तहां मत पूछो कहां" – १ | कवी प्रदीप |
| "मैं तो आरती उतारु रे" | उषा मंगेशकर |
| "मदद करो संतोषी माता" | उषा मंगेशकर |
| "जय संतोषी मां" | कवी प्रदीप |
| "मत रो मत रो आज राधिके" | मन्ना डे |
| "यहां वहां जहां तहां मत पूछो कहां" – २ | महेंद्र कपूर |
संदर्भ
[संपादन]- ↑ "BoxOffice India.com". 17 March 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 February 2008 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील जय संतोषी मा चे पान (इंग्लिश मजकूर)