जयंत करंदीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. जयंत करंदीकर ( - डिसेंबर २०१७) हे अहमदनगरमधील एक वैद्यक व्यावसायिक होते. हे ओंकार रुगणोपचार पद्धतीचे जनक म्हणून ओळखले जात.

पूर्वजीवन[संपादन]

डॉ. करंदीकर यांच्या आजी म्हणजे आईची आई- जानकीबाई आपटे यांनी १९४३ मध्ये दलित मुलींच्या शिक्षणासाठी अहमदनगरला बालिकाश्रम वसतिगृह सुरू केले. पुढे त्यांच्या कन्या म्हणजे डॉक्टरांच्या आई- स्वातंत्र्यसैनिक माणिकताई करंदीकर यांनी या वसतिगृहाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर तब्बल ३०-३२ वर्षे डॉक्टर जयंत करंदीकर या संस्थेचे विश्वस्त होते. आयुर्वेदाचे शिक्षण घेतलेले त्यांचे वडील म्हणजे- करंदीकर गुरुजींनी आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी वाहून घेतले होते. तेही स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांच्या स्मृति जपण्यासाठी डॉक्टरांनी १९७९ मध्ये कुष्ठरोग्यांच्या निरोगी मुलांसाठी बालसदन उभारले. ते २०१७ सालीही चालू होते.

ओंकाराचा शोध[संपादन]

संगीत विशारद व पुणे आकाशवाणीचा ‘अ’ श्रेणीचा गायक असा लौकिक मिळवलेल्या डॉ. करंदीकरांचे विश्व वयाच्या पन्नाशीपर्यंत हॉस्पिटल व गायन यातच व्यग्र होते. ज्ञानेश्वरीतील ओव्यांना संगीत देण्याच्या इच्छेतून ‘ज्ञानेश्वरी अमृतगंगा’ कार्यक्रमाची रचना त्यांनी केली. ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या निरूपणासह ते सादर करीत. पुढे ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्याचे वर्णन असणाऱ्या संत नामदेवांच्या १४४ अभंगांतील १६ अभंगांवर आधारित ‘संजीवन समाधी ज्ञानेशाची’ हा नवा कार्यक्रम निरूपणासह त्यांनी सुरू केला. त्याला रसिकांकडून दाद मिळाल्यावर व कॅसेट करण्याचा आग्रह झाल्य़ावर त्यांनी रेकॉर्डिंग करण्यासाठी स्टुडिओ गाठला. पण दुर्दैवाने त्यांना गळा साथ देईना. गायकाच्यादृष्टीने आभाळ कोसळण्याचीच ही घटना. स्वतः डॉक्टर असून घसा खराब होण्याचा अंतर्मुख होऊन विचार करतानाच त्यांना ज्ञानेश्वरीतील ‘कष्टले संसार शीणे। जे देवो येती गाऱ्हाणे तया ओ नावे देणे। तो संकेतु...’ हा श्लोक आठवला. त्याचा अर्थ म्हणजे- ‘या विश्वात जे दुःखी, कष्टी, पीडित आहेत, त्यांच्या हाकेला जो ओ देतो तो ओंकार...’ असे लक्षात आल्यावर त्यांनी ओंकाराचा शोध सुरू केला.