Jump to content

जमाअत ए इस्लामी हिंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जमाअ त ए इस्लामी हिंदच्या मुख्यालयात १९९० पूर्वी उभारलेली 'मस्जिद ए ईशाअत ए इस्लाम'

विषमतावादी व्यवस्थेत आमुलाग्र परिवर्तन आणून इमान, न्याय, समता, बंधुता यावर आधारित एका व्यवस्थेची स्थापना करणे (अ़कामत-ए-दीन) या उद्देशाने १६ एप्रिल १९४८ रोजी जमाअत ए इस्लामी हिंदची स्थापना करण्यात आली आहे. त्यापूर्वी १९४१ मध्ये अखंड भारतात जमाअत ए इस्लामीची स्थापना औरंगाबादचे मराठी माणुस मौलाना अबुल आला मौदुदी यांनी केली होती. परंतु स्वातंत्र्यानंतर भारतासाठी विशेष करून जमाअत ए इस्लामी हिंदची नव्याने स्थापना करण्यात आली, ज्याचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अबू लैस इस्लाही होते. व्यक्ती विकास, आदर्श समाजाची उभारणी आणि त्यातून आदर्श व्यवस्था कायम करणे असे तीन टप्पे उद्दीष्टापर्यंत पोहोचण्याचे जमाअतने निश्चित केले आहे.[]

कार्यप्रणाली

[संपादन]

जमाअत ए इस्लामी हिंदच्या घटनेत ही गोष्ट नमूद केलेली आहे की, जमाअत ही सकारात्मक व शांततेच्या मार्गानेच कार्य करत आपल्या उद्दीष्टाप्रत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतांना कोणत्याही गैरकायदेशीर किंवा नकारात्मक, अप्रामाणिक, विध्वंसक, हिंसात्मक मार्गाचा अवलंब अजिबात करणार नाही. जातीय किंवा वर्गिय संघर्ष निर्माण होईल अशा कोणत्याही कारवायात जमाअत भाग घेणार नाही, असे जमाअतचे धोरण आहे. भारतीय राज्य घटनेच्या चौकटीतच व्यवस्था परिवर्तनासाठी जनजागरण, संस्कार, समाज सेवा व संघटनात्मक बांधणीद्वारेच जमाअत आपले कार्य करत असते. []

प्रबोधन कार्य

[संपादन]

कुरआन ग्रंथाचे सर्व भारतीय भाषांत भाषांतरे जमाअतने मोठ्या प्रमाणात केले आहे. तसेच सर्व भारतीय भाषांत इतर इस्लामी साहित्त्य मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केले आहे. तसेच दैनिक माध्यमम् (केरळमध्ये दुस-या क्रमांकाचे मल्याळी दैनिक), साप्ताहिक प्रबोधनम् (मल्याळी), मीडिया वन टि.व्ही. चैनल (मल्याळी), साप्ताहिक शोधन (मराठी), समरसम (तामिळ), सन्मार्ग (कन्नड), मि़जान (बंगाली), मुजाहिद (असामी), शाहिन (गुजराती), पौ फटाला (पंजाबी), दावत (उर्दू), कांती (हिंदी), रेडियन्स (इंग्रजी), अन-नशरा (अरबी), अनुपमा (महिलांसाठी कन्नड मासिक), जिंदगी ए नव (उर्दू मासिक), तहेकिकात ए इस्लामी (उर्दू त्रैमासिक) इतकी देशभरात वृत्तपत्रे व मासिके जमाअतने प्रसिद्ध केली आहेत. याव्यतिरिक्त साप्ताहिक प्रबोधन कार्यक्रम, मासिक संस्कार शिबीर, आंतरधर्मिय चर्चासत्र, जाहिर सभा, ईद मिलन कार्यक्रम, प्रेषित परिचय सम्मेलन अशा कार्यक्रमाद्वारे प्रबोधन करण्यात येते. समाजातील विविध अंदश्रद्धा निर्मुलन, अनिष्ट प्रथा-रूढींचं उच्चाटन हे सर्व धर्माच्या शिकवणीचं प्रबोधन जमाअतने केलं आहे.[]

कार्य

[संपादन]

जमाअतने त्याच्या प्रत्येक सदस्यावर रक्तदान करणे, बिमार लोकांची शुश्रुषा करणे, गरजवंतांना मदत करणे, अत्याचारपिडीतांना कायदेशीर सल्ला देणे, वृक्षारोपण करणे, कौटुंबिक वितंडवादाचे निरसन करणे, गरजू नातेवाईकांची मदत करणे तसेच देशाच्या विकासात योगदान करणे हे अनिवार्य करून टाकले आहे. जमाअत आणि जमाअतचे लोकं यांच्या सहभागाने इतर विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात ३०० व्याजविरहित पतसंस्था (बँका) सुरळीत चालत आहेत. अनेक राज्यांमध्ये मोफत किंवा कमी दरात उपचार करणारे दवाखाने आहेत. औरंगाबदमध्येच असे दोन सेवाभावी दवाखाने सुरू आहेत. विविध ठिकाणी मुलं व मुलींच्या शाळा आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या चार ठिकाणी मोफत वैद्यकीय सेवा केंद्र सुरू आहेत. उत्तराखंड नैसर्गिक आपत्ती असो की चेन्नई त्सुनामी आपत्ती असो, या सारख्या संकटांत सर्वसामान्यपणे सर्वात पहिले पोहोचणारी संघटना म्हणजे जमाअत ए इस्लामी हिंद.

संघटनात्मक बांधणी

[संपादन]

स्थानिक, प्रादेशिक व केंद्रिय अशा तीन पातळीवर जमाअतची संघटनात्मक संरचना आहे. देशभरातील सदस्य प्रतिनीधी सभेच्या प्रतिनिधींची निवड करतात आणि हे प्रतिनीधी राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय सल्लागार मंडळाची निवड करतात. ही फारच आगळी वेगळी निवडणुक असते. निवड झालेला नेता पदाच्या जबादारीच्या ओझ्याची जाणीव असल्यामुळे पद सहज स्वीकारण्यास सहसा तयान नसतो. महिन्याला प्रत्येक सदस्याचे कार्य व आध्यात्मिक स्थितीचा आढावा स्थानिक अध्यक्ष घेत असतो. महापापांपासून मूक्त व कर्तव्याची पूर्ती करणे, पुरेसे साहित्य वाचन, नितीमत्ता व कार्यक्षमतेच्या आधारावर ‘रूक्न (सदस्य)’ म्हणून त्याला स्वीकारलं जाते. प्रतिनिधी सभेत महिलांकरिता ३ जागांचे आरक्षणदेखील आहे. महिला आघाडी, जी.आय.ओ. (गल्फ इस्लामिक ऑर्गनायजेशन ऑफ इंडिया), युथ विंग, आयडियल रिलीफ विंग, संस्कार विभाग, प्रचार विभाग, प्रबोधन विभाग, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकरण विभाग इत्यादी पोट विभाग आहेत, तर स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायजेशन ऑफ इंडिया (एस आय ओ) या विद्यार्थी संघटनचे जमाअत मातृ संघटना आहे.

इंजिनीअर सआदतुल्लाह हुसैनी – राष्ट्रीय अध्यक्ष, इंजिनिअर मुहम्मद सलीम, एस. अमीन उल हसन आणि मौलाना वलिउल्लाह सईदी – राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. टी. आरिफ अली - महासचिव, मौलाना इलियास फलाही – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Home - Jamaat-e-Islami Hind" (इंग्रजी भाषेत). 2025-01-29 रोजी पाहिले.
  2. ^ "Home". Islamdarshan (इंग्रजी भाषेत). 2025-01-29 रोजी पाहिले.
  3. ^ "islamvision.org". ww38.islamvision.org. 2025-01-29 रोजी पाहिले.
  4. ^ "Meet Ameer Jamaat-e-Islami Hind Syed Sadatullah Husaini". Radiance Weekly (इंग्रजी भाषेत). 2025-01-29 रोजी पाहिले.