Jump to content

सोव्हिएत संघ-जपान तटस्थता करार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जपान-सोव्हिएत संघ अनाक्रमण करार या पानावरून पुनर्निर्देशित)

सोव्हिएत संघ-जपान तटस्थता करार (निस्सो चुरित्सु जोयाकु) तथा जपान-सोव्हिएत संघ अनाक्रमण करार (निस्ज्यासो फुकाशिन जोयाकु) हा जपान आणि सोव्हिएत संघामध्ये १३ एप्रिल, १९४१ रोजी झालेला करार होता. सोव्हिएत-जपानी सीमा युद्धाच्या समाप्तीच्या दोन वर्षांनी हा करार केला गेला. सोव्हिएत संघ आणि जपानच्या साम्राज्याने स्वाक्षरी केलेल्या या करारामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या जवळजवळ पूर्ण अवधीमध्ये हे देश एकमेकांच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध लढले परंतु त्यांनी एकमेकांवर हल्ले केले नाही. युद्ध संपत येताना सोव्हिएत संघाने हा करार रद्द केला आणि जपानविरुद्धच्या मित्र राष्ट्रांसोबत युद्ध पुकारले.

या करारावर जपानचे परराष्ट्र मंत्री योसुके मात्सुओका आणि राजदूत योशित्सुगु तातेकावा आणि सोव्हिएत संघाचे परराष्ट्र मंत्री व्याचेस्लाव मोलोटोव्ह यांनी मॉस्को येथे स्वाक्षरी केली.

सोव्हिएत-जपानी तटस्थता करार, १३ एप्रिल १९४१

त्याच दिवशी यांनी मंगोलिया आणि मांचुकुओ बाबतच्या घोषणेवरही स्वाक्षरी केली. या घोषणेनुसार सोव्हिएत संघाने मांचुकुओच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि अभेद्यतेचा आदर करण्याचे वचन दिले आणि जपानने मंगोलियासाठीही तेच केले.

या करारातील तिसऱ्या कलमानुसार हा करार पाच वर्षांसाठी अबाधित होता परंतु कोणताही पक्ष त्याचा निषेध करून तो रद्द करू शकणार होता. जर कोणीही निषेध केला नाहीत तर पुढील पाच वर्षे हा करार आपोआप पुढे गेला असता. दुसऱ्या महायुद्धात जपानची पडती होत असल्याचे पाहून ५ एप्रिल १९४५ रोजी, सोव्हिएत संघानेने या कराराचा निषेध केला आणि यातून अंग काढून घेतले.