जपानचे पंधरावे सैन्यदल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जपानचे पंधरावे सैन्यदल (जपानी:第15軍; दै-ज्युगो गन) ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान उभारलेले जपानचे सैन्यदल होते.

याची उभारणी ९ नोव्हेंबर, १९४१ रोजी इंडो-चायनामध्ये झाली. ब्रिटिश आधिपत्याखालील म्यानमारवर आक्रमण करणे हे या सैन्यदलाचे एकमेव उद्दिष्ट होते. यासाठी त्यांना थायलंडमधून मार्ग काढणे आवश्यक होते. ८ डिसेंबर, १९४१ रोजी आताच्या कंबोडियामधून हे सैन्य थायलंडवर चाल करून गेले. त्याच वेळी जपानी सैन्याची १४३वी रेजिमेंट बॅंगकॉकच्या दक्षिणेस उतरली. या कचाट्यात सापडलेल्या थायलंडच्या सरकारने काही तासांच्या लढाईनंतर जपानला म्यानमारचा मार्ग मोकळा करून दिला. शोजिरो लिदाच्या नेतृत्वाखाली या सैन्यदलाचा एक भाग म्यानमारच्या दक्षिणेतील तेनासरीम येथे दाखल झाला तर दुसऱ्या भागाने थायलंडच्या उत्तर भागातून हल्ला केला. येथून पुढे म्यानमारमधील ब्रिटिश आणि भारतीय सैन्याचा प्रतिकार मोडून काढत १५व्या सैन्यदलाने झपाट्याने रंगूनकडे चाल केली व ७ मार्च, १९४२ रोजी हे शहर काबीज केले. सिंगापूरचा पाडाव झाल्यावर तेथून सुटका झालेले जपानी सैनिक आणि आझाद हिंद फौजेत दाखल झालेले पूर्वीचे ब्रिटिश भारतीय सैनिक १५व्या सैन्यदलात तैनात झाले. या नवीन कुमकीच्या मदतीने देशाच्या मध्य भागात धडक मारली. काही दिवस तेथे तळ मांडल्यावर हे सैन्य पुन्हा उत्तर व पश्चिमेकडे चालून गेले व म्यानमारमधून ब्रिटिशांना त्यांनी हाकलून दिले. पुढील वर्षभर हे सैन्यदल म्यानमारमध्ये ठाण मांडून होते. १९४४मध्ये या सैन्याचा बर्मा प्रादेशिक सैन्यात समावेश करण्यात आला. नवीन सेनापती रेन्या मुतागुचीने म्यानमारमधून ब्रिटिश भारतावर हल्ला करण्याचे ठरविले आणि उ गो मोहीम सुरू केली. या मोहीमेंतर्गत कोहिमाच्या लढाईत आणि इम्फालच्या लढाईत जपानच्या पंधराव्या सैन्याला ब्रिटिश भारतीय लष्कराने कडवा प्रतिकार केला व हे सैन्यदल जवळजवळ नेस्तनाबूद झाले. मुतागुची आणि त्याचा अधिकाऱ्यांची कमान काढून घेउन सिंगापूरला परत पाठविले गेले आणि सैन्याचे नेतृत्व शिहाची कातामुराला दिले गेले. पावसाळा संपताना कातामुराने पंधरावे सैन्य इरावती नदीपलीकडे नेले व तेथून ब्रिटिशांचे प्रतिआक्रमण रोखण्याचा असफल प्रयत्न केला. मंडाले पडल्यावर पंधराव्या सैन्याने रीतसर माघार घेतली व पेगु योमास येथे जपानच्या तेहतीसाव्या सैन्यदलाशी संधान साधले. दोस्त सैन्याने घातलेला वेढा फोडून काढीत दक्षिणेकडे पलायन करताना पंधराव्या सैन्यदलाचा सर्वनाश झाला. उरलेसुरले सैनिक जपानच्या १८व्या प्रादेशिक सैन्यात दाखल झाले.

जपानने दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्करल्यावर थायलंडच्या लांपांग प्रांतात जपानच्या पंधराव्या सैन्यदलाचे विसर्जन करण्यात आले.

सेनापती[संपादन]

नाव पासून पर्यंत
लेफ्टनंट जनरल शोजिरो लिदा ५ नोव्हेंबर, १९४१ १८ मार्च, १९४३
लेफ्टनंट जनरल रेन्या मुतागुची १८ मार्च, १९४३ ३० ऑगस्ट, १९४४
लेफ्टनंट जनरल शिहाची कातामुरा ३० ऑगस्ट, १९४४ १५ ऑगस्ट, १९४५