जनिना स्ट्रोका
जनिना स्ट्रोका - (जन्म - १८ जुलै १९०९, पोलंड, मृत्यू - १७ जुलै १९६४ पाँडिचेरी) पोलिश गूढवादी आणि चित्रकार, कवयित्री, पूर्णयोगाच्या साधिका म्हणून जनिना यांचा परिचय आहे.[१] त्या श्रीअरविंद आश्रमाच्या सदस्य होत्या.[२]
जीवन व कार्य
[संपादन]त्यांचे वडील जॅन स्ट्रोका अभियंता होते, तर आई जाडविगा क्रॅसुस्का शिक्षिका होती. झाकोपेनमधील माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतर जनिना यांनी क्राको विद्यापीठात प्रवेश घेतला आणि १९३३ मध्ये अध्यापनशास्त्र आणि मानसशास्त्रात एम.ए. पदवी प्राप्त केली. पुढील सहा वर्षांत त्यांनी शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयात शिक्षिका म्हणून काम केले. [३]
१९३९ मध्ये, जेव्हा नाझींनी पोलंडवर आक्रमण केले, तेव्हा बुद्धिजीवी वर्गाला देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला. या निर्गमनात सामील झालेल्यांमध्ये जनिना यांचा देखील समावेश होता. तीस किंवा त्याहून अधिक लोकांच्या गटासह जनिना यांचा प्रवास सुरू झाला, पुढे दिवस जसे जसे जात होते तसतसे अतिकष्टामुळे अनेक सहप्रवासी मागे राहिले. जेव्हा ते टाट्रीमध्ये स्लोव्हाकिया सीमेजवळ आले तेव्हा जनिना यांच्या बरोबर फक्त एकच साथीदार उरला होता. तो सुद्धा डोंगरावर चढत असताना अचानक कोसळला. कालांतराने जनिना एकट्याच सीमा ओलांडून पार जाऊ शकल्या. [३]
जानेवारी १९४१ मध्ये इतर पोलिश निर्वासितांसह जनिना या स्लोव्हाकियाहून हंगेरी - नंतर युगोस्लाव्हिया आणि तुर्कीमार्गे पॅलेस्टाईनला गेल्या. निर्वासितांना जेरुसलेमजवळील एका छावणीत आश्रय देण्यात आला. पण एक दिवस असा आला जेव्हा जनिनाला छावणीतील जीवनातील अत्याचार सहन झाला नाही आणि त्या ती वस्ती सोडून कामाच्या शोधात बाहेर पडल्या. शेवटी त्या राम अल्लाह येथे पोहोचल्या. तिथे अरब मुलींसाठी असलेल्या बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल झाल्या. एक डच स्त्री तेथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होती. तिने जनिनाला आश्रय दिला. कालांतराने दोघींमध्ये मैत्री निर्माण झाली. जनिना तेथे अरब मुलींना शिकवणे, बागकाम करणे, मुख्याध्यापिकेस साहाय्य करणे इत्यादी कामे करू लागल्या. [३]
फेब्रुवारी १९४८ मध्ये जनिना पुन्हा पोलंडला गेल्या. तेथे त्यांनी एका शिक्षणसंस्थेत नऊ वर्षे काम केले. पुढे मतिमंद मुलांच्या शाळेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. १९५६ मध्ये त्या जर्मनीला गेल्या.
श्रीअरविंद शिकवणुकीचा परिचय
[संपादन]एकदा, जेरुसलेममध्ये, हेन्झ कॅपर्स नावाच्या एका जर्मन पाद्रीचे (हेन्झ कॅपर्स, यांनी श्रीअरविंदांच्या निवडक साहित्याचे जर्मनमध्ये भाषांतर केले.) श्रीअरविंद यांच्यावर व्याख्यान झाले. ते ऐकून जनिना यांच्या जीवनास कलाटणी मिळाली. श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या साहित्याच्या अभ्यासाला आणि योगाभ्यासाला त्यांनी सुरुवात केली. त्याच वेळी चित्रकला शिकण्यास सुरुवात केली. पॅलेस्टाईनमध्ये, त्यांनी जलरंगातील लँडस्केप्स रंगवायला सुरुवात केली.[३] श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांना अभिप्रेत असलेल्या भविष्यकालीन कार्यात जनिना यांचा सहभाग होता, अशी ग्वाही श्रीमाताजी यांनी दिली होती. [४] १९५७ ते जीवनाच्या अखेरीपर्यंत म्हणजे १९६४ पर्यंत त्या आश्रमात राहत होत्या. [५] श्रीमाताजी जेव्हा श्रीअरविंद यांच्या सिंथेसिस ऑफ योगचे फ्रेंच भाषेत भाषांतर करत असत त्या वर्गास उपस्थित राहण्याची परवानगी जनिना यांना मिळाली होती. [६]
चित्रकलेचा विकास
[संपादन]१७ डिसेंबर १९५७ मध्ये त्या पाँडिचेरी येथे आल्या. श्रीमाताजी यांनी त्यांना नर्सिंग विभागाच्या प्रमुख म्हणून नियुक्त केले. येथे फावल्या वेळात त्यांनी चित्रे काढायला सुरुवात केली. त्यांच्या आंतरिक जीवनाचे प्रतिबिंब त्या चित्रांमध्ये उमटलेले दिसत असे. त्यांनी चित्रकलेतील स्टीप्लिंग हे तंत्र आत्मसात केले. अध्यात्मजीवनातील वेगवेगळ्या संकल्पना घेऊन त्यावर त्यांनी चित्रे काढली. आत्म्याचे साहस, दिव्य लीला, निर्मितीची कहाणी अशा काही संकल्पना वानगीदाखल सांगता येतील. साडेसहा वर्षांच्या कालावधीत त्यांनी तीनशेहून अधिक पेंटिंग्ज केली. १९६१ पासून त्यांनी सिमेंटच्या आधारे काही शिल्पकामास सुरुवात केली. [३]
प्रकाशित लेखन
[संपादन]अ कॅप्टिव ऑफ हर लव (१९९८) - जनिना यांच्या पत्रांचा, पेंटिंग्जचा आणि कवितांचा समावेश या पुस्तकात आहे.
पूरक
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "Janina Stroka". www.wikidata.org (इंग्रजी भाषेत). 2025-03-03 रोजी पाहिले.
- ↑ Stroka, Janina (1998). A captive of her love: letters and paintings of Janina Stroka (1. publ ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 978-81-7058-520-6.
- 1 2 3 4 5 "A Captive of Her Love - Book on Janina Stroka : Read online". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-03 रोजी पाहिले.
- ↑ Mother's Agenda, 11 August 1964 (translated from recorded conversations with Satprem in French)
- ↑ "A Captive of Her Love - Book on Janina Stroka : Read online". The Mother & Sri Aurobindo : e-library (इंग्रजी भाषेत). 2025-03-03 रोजी पाहिले.
- ↑ "Janina Stroka - Auroville Wiki". wiki.auroville.org.in. 2025-03-03 रोजी पाहिले.
