चिकाटीचे फळ (लोककथा)
चिकाटीपुढे जगातील कोणत्याच गोष्टीचा पाडाव लागू शकत नाही. आणि अनेकदा मोठमोठ्या गोष्टीसुद्धा अनेक छोट्या आणि अथक प्रयत्नांचे एकत्रित फळ असते, हा संदेश देणारी ही कथा आहे.
कथेचा आशय
[संपादन]बर्नार्ड पालिसी नावाचा एक फ्रेंच प्रसिद्ध कुंभार होता. चिनी मातीच्या भांड्यावर जो सुंदर रंगीत चकचकीत मुलामा दिलेला असतो त्याचे रहस्य शोधून काढावे अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी तो अहोरात्र प्रयत्न करत असे. कित्येक महिने आणि वर्षं उलटली, त्याने अथकपणे प्रयोग चालूच ठेवले. चकाकी शोधण्याची त्याचे सारे प्रयत्न आजवर फोलच ठरले. त्याच्यापाशी जे काही होते ते त्याने त्याच्या शोधासाठीच खर्च केले; दिवसरात्र तो त्याने तयार केलेल्या त्या भट्टीकडे तो पाहत बसे, मडकी तयार करण्याच्या आणि भाजण्याच्या नवनवीन पद्धतींचा वापर करून पाहणे हे त्याचे काम न थकता, अखंडपणे चालूच असे. त्याला मदत करणे किंवा प्रोत्साहन देणे तर सोडाच पण त्याचे सगळे शेजारी, त्याची मित्रमंडळी आता त्याला वेड्यात काढू लागली. त्याची बायकोसुद्धा तो जे करत आहे त्याविषयी त्याला बोल लावू लागली.

साधनसामग्री अभावी त्याला त्याचे प्रयत्न बरेचवेळा लांबणीवर टाकावे लागले; पण साधनसामग्री उपलब्ध झाल्याझाल्या तो परत एकदा नव्या दमाने कामाला लागत असे. शेवटी एक दिवस तर असा आला की भट्टी पेटविण्यासाठी लागणारे इंधनही, लाकूडही त्याच्यापाशी नव्हते तेव्हा घरच्यांच्या आदळआपटीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत, घरात होते नव्हते ते सारे लाकडी सामानसुमान त्याने भट्टीत टाकून दिले. आणि जेव्हा सर्वकाही जळून गेले तेव्हा त्याने भट्टी उघडून पाहिली, तो त्याला काय आढळले ? ज्यासाठी त्याने त्याच्या आयुष्याची इतकी वर्षं खर्ची घातली होती ती झगझगीत, चकचकीत भांडी त्याच्या पुढ्यात होती. या शोधामुळेच तो पुढे सुविख्यात झाला.
तात्पर्य
[संपादन]बर्नार्डच्या मित्रांकडे आणि त्याच्या पत्नीकडे चिकाटीचा अभाव होता आणि त्यामुळे ते कटकट न करता त्याच्या यशप्राप्तीच्या क्षणापर्यंत ते थांबू शकत नव्हते. आणि बर्नार्डकडे मात्र चिकाटीची अपरंपार शक्ती होती. छोट्याछोट्या, वारंवार केलेल्या प्रयत्नांमुळे, धडपडीतून मोठ्यामोठ्या गोष्टी साध्य होऊ शकतात.[१]
अधिक माहितीसाठी
[संपादन]बर्नार्ड पालिसी (इंग्रजी माहिती)
संदर्भ
[संपादन]- ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.