चांग ताछ्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


हे चिनी नाव असून, आडनाव चांग असे आहे.

चांग ताछ्यान (देवनागरी लेखनभेद: चांग दाछ्यान; सोपी चिनी लिपी: 张大千 ; पारंपरिक चिनी लिपी: 張大千 ; फीन्यिन: Zhāng Dàqiān ; वेड-जाइल्स: Chang Ta-Chien ;) (मे १०, इ.स. १८९९ - एप्रिल २, इ.स. १९८३) हा जागतिक स्तरावर लोकप्रियता कमवलेला चिनी चित्रकार होता. आरंभीच्या काळात पारंपरिक चिनी चित्रशैलीतील चित्रांसाठी ख्याती असलेला चांग इ.स. १९६० च्या दशकापासून दृक प्रत्ययवादी व अभिव्यक्तिवादी चित्रशैलींकडे वळला. पुरातन कलाकॄती म्हणून गणल्या गेलेली काही पारंपरिक चिनी चित्रे त्याची निर्मिती असल्यामुळे तो इ.स.च्या विसाव्या शतकातल्या तरबेज चित्रकारांपैकी एक मानला जातो [१].

जीवन[संपादन]

चांग ताछ्यानाचा जन्म चिनातील सिच्वान प्रांतातल्या नैच्यांग या गावी मे १०, इ.स. १८९९ रोजी झाला. पुढे जपानातील क्योतो येथे कापड रंगवण्याचे तंत्र शिकून तो मायदेशी परतला. परतल्यावर व्यावसायिक चित्रनिर्मिती करत त्याने षांघाय येथे आपला जम बसवला. कुओमिंतांग पक्षाचा कट्टर समर्थक असलेला चांग इ.स. १९४८ साली चीन सोडून काही काळ ब्राझिल व त्यानंतर अमेरिकेतील कॅलिफोर्नियात राहिला. अखेरीस ताइवानातील तायपै येथे त्याने आपले बस्तान हलवले.

बनावट चित्रनिर्मिती[संपादन]

पारंपरिक चिनी चित्रांसाठी वापरले जाणारे कागद, शाया, रंग, कुंचले, शिक्के इत्यादी साधनांचा त्याने बारकाईने अभ्यास केला होता. त्यामुळे प्राचीन काळातील चिनी चित्रकारांच्या कलाकॄतींसारखी दिसणारी चित्रे रंगवण्यात त्याचा हातखंडा होता. अमेरिकेतल्या बोस्टन येथील म्यूझियम ऑफ फाइन आर्ट्स या नामवंत कलासंग्रहालयाने त्याने रंगवलेली अशी काही बनावट चित्रे अस्सल प्राचीन कलाकृती म्हणून विकत घेतली. इ.स.च्या दहाव्या शतकातील चिनी चित्रकार क्वान थाँग याने चितारलेले अस्सल चित्र समजून त्या संग्रहालयाने इ.स. १९५७ साली खरीदलेले चित्र वस्तुतः चांगाने रंगवले होते [२]. न्यूयॉर्क मेट्रोपॉलिटन म्यूझियम ऑफ आर्ट्स येथील दक्षिण तांग साम्राज्याच्या कालखंडातील इ.स.च्या १० व्या शतकातील नदीकाठ हे चित्र काही तज्ज्ञांच्या मते त्याचीच बनावट कलाकृती आहे [३].

संदर्भ[संपादन]

  1. चांग ताछ्यान - मास्टर पेंटर / मास्टर फोर्जर[मृत दुवा]. आर्ट नॉलेज न्यूज. आर्ट अप्रीसिएशन फाउंडेशन (इ.स. २००६). २४ मार्च, इ.स. २०१० रोजी पाहिले.
  2. चांग ताछ्यान - मास्टर पेंटर / मास्टर फोर्जर[मृत दुवा]. आर्ट नॉलेज न्यूज. आर्ट अप्रीसिएशन फाउंडेशन (इ.स. २००६). २४ मार्च, इ.स. २०१० रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
  3. पाँफ्रेट, जॉन (१७ जानेवारी इ.स. १९९९). "द मास्टर फोर्जर" (इंग्लिश मजकूर). द वॉशिंग्टन पोस्ट मॅगझीन. 

बाह्य दुवे[संपादन]