चर्चा:राजदत्त

  विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  सुप्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांचे दत्तात्रय अंबादास मायाळू हे पूर्ण नाव. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शालेय व कॉलेज जीवनाचा त्यांचा काळ वर्धा येथे व्यतीत झाला.

  राजदत्त अर्थात दत्ताजी मायाळू हे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजा परांजपे यांचे शिष्य. तरुण वयात नोकरीच्या शोधात दत्ताजी मद्रासला गेले होते. तिथे त्यांना 'चांदोबा' या मुलांच्या मासिकाच्या संपादकाची नोकरी मिळाली. राजा परांजपे यांना मदासच्या चित्रपटाची ऑफर आल्यामुळे ते तिकडे गेले तेव्हा मराठी समजणारा असिस्टंट हवा म्हणून त्यांनी दत्ताजींना सहायक दिग्दर्शक म्हणून घेतले. राजदत्त यांच्यावर विषय निवडीपासून ते काम करण्याच्या पद्धतीपर्यंत राजा परांजपे यांचा प्रभाव पडलेला दिसतो.

  मधुचंद्र या राजदत्त यांच्या पहिल्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. वेगवेगळ्या विषयांवरचे, वेगवेगळ्या प्रकृतींचे चित्रपट त्यांनी केले. 'गोट्या' ही सुंदर टीव्ही मालिका त्यांनी बनवली. त्यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील मालिकाही उत्तम होती. महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ओळीने सात वर्षे ते सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचे पारितोषिक जिंकले. संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी मित्र फाउंडेशनचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे (फेब्रुवारी २०१५). राजदत्त यांना गदिमा पुरस्कार, २०१४सालचा वाग्‌यज्ञे कला गौरव पुरस्कार, संस्कृती कलादर्पण सर्वश्रेष्ठ कलागौरव सन्मान आदींनीही सन्मानित करण्यात आले आहे.

  राजदत्त यांचे त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना असलेली चित्रपट कथेबद्दलची विलक्षण समज. आपला मुद्दा ते आग्रही राहून शांतपणे आणि प्रभावीरीत्या समजावून देत. त्यांच्या साधेपणाचेही अनेकांवर दडपण येत असे. दुसरी त्यांची खासीयत म्हणजे सामाजिक प्रश्नांविषयी त्यांना असलेली कमालीची आस्था. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कार भारतीचे ते अध्यक्ष होते.. मात्र त्यांच्या ठायी अभिनिवेश कधीच नसे. वनवासी कल्याण आश्रमशाळांसाठी ते ज्या तळमळीने फिरत, मुलांमध्ये काम करत ते पाहून यांना चित्रपटक्षेत्र अधिक प्यारे आहे की समाजसेवा असा प्रश्न पडे. त्यांना गदिमा पुरस्कार मिळणे म्हणजे योग्य माणसाकडे योग्य पुरस्कार जाणे आहे.

  गाजलेले चित्रपट
  • अपराध
  • अरे संसार संसार
  • अर्धांगी
  • अष्टविनायक
  • आज झाले मुक्त मी
  • घरची राणी
  • देवकीनंदन गोपाला
  • पुढचं पाऊल
  • भोळीभाबडी
  • मधुचंद्र
  • माझं घर माझा संसार
  • मुंबईचा फौजदार
  • राघूमैना
  • शापित
  • सर्जा
  • हेच माझं माहेर

  राजदत्त यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • ’मधुचंद्र’ला उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार
  • महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात ओळीने सात वर्षे मिळालेले सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकाचे पारितोषिक
  • मित्र फाउंडेशनचा पुरस्कार
  • वाग्‌यज्ञे कला गौरव पुरस्कार
  • संस्कृती कलादर्पणचा सर्वश्रेष्ठ कलागौरव सन्मान