चर्चा:मोहिनीअट्टम

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इतरत्र सापडलेला मजकूर योग्य बदल करुन येथे समाविष्ट करावा. -- अभय नातू (चर्चा) ०१:४६, १३ मार्च २०२२ (IST)[reply]


मोहिनीआट्टम्‌ हा एक केरळमधील पारंपारिक शास्त्रीय नृत्यप्रकार आहे. थकळि नृत्यदेखील केरळमधीलच आहे पण तो केवळ पुरुषांनीच नाचायचा, तांडव (उद्धत प्रणाली) युक्त नृत्यनाट्यप्रकार आहे तर मोहिनीआट्टम्‌ म्हणजे केवळ स्त्रियांनीच करायचा लास्य (सुकुमार प्रणाली) युक्त नर्तनप्रकार आहे. पुराणांमध्ये अमृतमंथन व भस्मासुर वध या कथांमध्ये विष्णूने मोहिनीचे- अतिशय लावण्यवती स्त्रीचे-रूप घेतल्याचा उल्लेख आहे. या कथांच्या संदर्भात या शैलीकडे पाहिले असता, मोहिनीआट्टम्‌ या शब्दातील मोहिनी हा शब्द मोहकतेचा द्योतक वाटतो. आट किंवा ‘आट्टम्‌’ म्हणजे नृत्य. या नृत्यशैलीस ही मोहकता, त्यामधील अंगाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गोलाकार व अर्धगोलाकार हालचालींमुळे प्राप्त होते. चेहऱ्यामध्येही ‘उत्क्षिप्त शिर’ (किंचित एका बाजूस झुकलेले डोके) व ‘साची दृष्टी’ (तिरका कटाक्ष) यांमुळे हाच परिणाम साधला जातो.

त्रावणकोरच्या स्वाती तिरुनल महाराजांचा काळ (१८१३–४६) हा या नृत्यशैलीचा उत्कर्षकाल मानला जातो. राजाश्रय संपुष्टात आल्यानंतरच्या काळात म्हणजे गेल्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र या मोहक नृत्यशैलीतील कलात्मक भाग लोप पावून तिने उत्तान शृंगारिक, बेगडी रूप धारण केले होते. तिच्या या अधोगतीच्या काळात तिचे बरेचसे मूळ शास्त्रीय रूप परंपरेतून नष्टप्राय झाले. परंतु विसाव्या शतकात सुप्रसिद्ध केरळीय कवी वळ्ळ्‌त्तोळ नारायण मेनन यांनी या कलेचे पुनरज्जीवन केले. त्यांनी चेरुपतुरुत्ती येथे ‘केरल कलामंडलम्‌’ ही संस्था स्थापन करून ज्या लुप्त कलांना पुन्हा प्रकाशात आणले, त्यांपैकी मोहिनीआट्टम्‌ हे एक होय. जवळजवळ नाहीशी झालेली मूळ शास्त्रीय शैली ज्यांना थोडीफार अवगत आहे, अशा कल्याणी अम्मा, चिन्नम्मू अम्मा यांसारख्या स्त्रिया शोधून आणून त्यांच्याकरवी चांगल्या घराण्यातील नवीन मुलींना मोहिनीआट्टम्‌चे शास्त्रीय शिक्षण देण्याची व्यवस्था त्यांनी करविली. या शैलीस पुनर्प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात कवी वळ्ळ्‌त्तोळ यांचा वाटा मोठा आहे.

मोहिनीआट्टम् ची शैली[संपादन]

आज या शैलीत भरतनाट्यम्‌ नृत्याप्रमाणेच ‘नृत्त’(शुद्ध नर्तन) व ‘नृत्य’(अभिनयासहित नर्तन) यांचा सुंदर समन्वय आढळतो. अभिनयात हस्तांचा वापर सर्वसाधारणपणे भरतनाट्यम्‌सारखाच असला, तरी त्यात कथकळीमधील हस्तमुद्रांचा प्रभाव दिसतो. त्याचप्रमाणे फक्त या शैलीतच वापरले जाणारे जाणारे हस्तही बरेच आहेत. नृत्तामध्ये मोहिनीआट्टम्‌चे खास स्वतःचे अंगचलन, चारी, व अडवू (प्रारंभिक हालचाली व पदन्यास) आहेत. कमरेच्या वरील अंगाची सातत्याने होणारी आकर्षक गोलाकार हालचाल हा या शैलीचा विशेष म्हणता येईल. बलरामभरतम्‌सारख्या केरळीय ‘देशी’ ग्रंथात या हालचालींविषयी बरीच माहिती उपलब्ध आहे. ‘चोलकट’, ‘गणपती’, ‘पंदडी’, ‘मुखचालम्‌’, ‘कर्कला’, ‘दंडकम्‌’, ‘अष्टपदी’या मोहिनीआट्टम्‌मधील काही वैशिष्ट्यपूर्ण पारंपारिक नृत्यरचना होत. यांशिवाय भरतनाट्यम्‌मध्ये केल्या जाणाऱ्या ‘वर्णम्‌’, ‘पदम्‌’, ‘जावळी’, ‘तिल्लाना’इ. सर्व कर्नाटक संगीतनृत्यरचनादेखील मोहिनीआट्टम्‌मध्ये हल्ली नाचल्या जातात. सर्वसाधारणपणे या शैलीत कर्नाटक संगीताचा वापर होत असला, तरी ‘सोपानम्’ ह्या केरळीय संगीतबाजाचा प्रभाव परंपरागत मोहिनीआट्टम्‌च्या संगीतावर अधिक असावा. मलयाळम्‌प्रमाणेच संस्कृत भाषेतील रचनाही मोहिनीआट्टम्‌मध्ये बऱ्याच प्रमाणात वापरल्या जातात.

मोहिनीआट्टम् नर्तकीचा पोषाख[संपादन]

मोहिनीआट्टम् नर्तकीचा पोषाखही खास केरळी पद्धतीचा असतो. कमरेभोवती पांढऱ्या तलम कापडाचे, कांजी केलेले, पुढील बाजूस बऱ्याच चुण्या असलेले घोळदार वस्त्र साडीप्रमाणे गोल गुंडाळलेले असते. गडद लाल अथवा हिरव्या रंगाची चोळी व त्यावर अनेक प्रकारची कंठभूषणे रुळत असतात. कानात मोठमोठी कर्णफुले, केसांचा डोक्याच्या एका बाजूस गोल अंबाडा, त्यावर पांढऱ्या शुभ्र फुलांचा गजरा असा साधाच पण आकर्षक पोषाख या नर्तकीचा असतो.

मोहिनीआट्टम् मधील वाद्यवृंद[संपादन]

वाद्यवृंदात भरतनाट्यम्‌प्रमाणेच तालम् वाजविणारा नटुवन्‌ (‘नटुवनार’ अथवा सूत्रधार) व गायिकेचा समावेश असतो. पूर्वी ‘येडक्कै’ (काठीने वाजवाण्याचे चर्मवाद्य), ‘मुखवीणा’ (सुंद्रीप्रमाणे फुंकून वाजविण्याचे वाद्ये) इ. साथीच्या वाद्यांचा समावेश असे. अलीकडे मृदुंग, वीणा, व्हायोलिन इ. वाद्ये असतात.


चिन्न कुटी अम्मा, चिन्नमू अम्मा या जुन्या काळातील नर्तकींप्रमाणेच ‘कलामंडलम्’ कल्याणी अम्मा ह्या सुप्रसिद्ध मोहिनीआट्टम् नर्तकी होत. भारताच्या अन्य प्रदेशांत तसेच परदेशातही ही शैली नावारूपास आणण्याचे श्रेय शांता राव, रागिणी देवी, इंद्राणी रेहमान इ. नर्तकींना आहे. अलीकडच्या काळात कनक रेळे ह्या सुप्रसिद्ध मोहिनीआट्टम् नर्तकी होत. या शैलीबाबत त्यांनी बरेच मौलिक संशोधन करून, त्यावर लिखाण केले आहे.

केरळमधील ‘कलामंडलम्’ खेरीज, त्रिवेंद्रम येथील ‘सोपानम्’ ही संस्थादेखील मोहिनीआट्टम् शैलीची योग्य वाढ आणि प्रसार होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. मुंबई येथील ‘नालंदा नृत्यकला महाविद्यालया’तही मोहिनीआट्टम्‌चे शास्त्रीय शिक्षण दिले जाते, तसेच मुंबई विद्यापिठाच्या नृत्यविषयक पदवी परीक्षेस बसण्याचीही सोय उपलब्ध आहे.