चर्चा:कळसूबाई शिखर
अकोले तालुका लेखातून १४ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी हलवलेला मजकूर
[संपादन]“ | * कळसूबाई शिखर- १६४८ मीटर उंचीचे महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर आहे.महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई.
हे शिखर एकदा तरी सर करायचे असे प्रत्येक भटक्याचे स्वप्न असते. जसे वर्णन, तसाच हा ट्रेक, दमछाक करणारा. कळसूबाईला पोचायचे तर पुण्या-मुंबईहून आदल्या दिवशी रात्रीच निघावे लागते. रात्री उशिराच्या एसटी बसने पुण्याहून निघावे. साधारण चार वाजता बस संगमनेरला पोचते. संगमनेरहून पहिली बस कसारा बस सहा वाजता असते. तोपर्यंत एसटी स्टॅंडवरच उरली-सुरली रात्र काढावी लागते. स्टॅंडवर साडेचार-पाचला कोलाहल सुरु होतोच. तेव्हा एक चहा मारला की आपण ताजेतवाने. अन्य काही वेळापत्रक आखायचे असेल तर एसटीच्या वेबसाईटचा उपय्प्ग होईल (होय, एसटी, ज्याला तुम्ही-आम्ही लाल डब्बा म्हणतो, हाय-टेक झालाय आता). सहा वाजता बस लागली की ‘बारी’ तिकीट मागताच कंडक्टर ‘हे आले आणखी काही वेडे’ अशा नजरेने पाहतच तिकीट फाडतो. संगमनेरच्या बाहेर पडले की कृषिसंपन्न प्रदेशात आल्याची खात्री पटते. रस्त्याच्या दोहोबाजूंना ऊसाची शेती. हिरव्या शेतांच्या मधून जाणाऱ्या भन्नाट रस्त्याने लाल डब्बा धावू लागला की आपण भान हरपून पाहतच राहतो. अशाच प्रवासात हळूहळू अकोले, राजूर अशी गावे मागे टाकत आपण भंडारदरा धरणाच्या परिसरात पोचतो. जसजसा रस्ता मागे पडत जातो तशी सह्याद्रीची ऊंची वाढत जाते आणि ऊसाची शिवारे जाऊन भातखाचरे दिसू लागतात. भंडारदरा धरणाच्या आसपासच्या सृष्टिसौंदर्याचा आस्वाद घेत घेत, धरणाच्या भिंतीशी लगट करुन जाणार्या रस्त्याने गाडी निघाली की आपण एका वेगळ्याच विश्वात हरवून जातो. त्याच परिसरात एक गाव आहे, अगदी सह्याद्रीच्या कुशीत्च. त्याचे नाव दर्याची वाडी. तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेलं, पायथ्याला ग्रीन कार्पेटवाली भाताची खाचरं, कड्यांवरुन कोसळणारे पाच-पंचवीस धबधबे पाहून आपला कायमचा पत्ता मु.पो. दर्याची वाडी असावा असे मनोमन वाटून जाते. अशीच स्वप्नवत दृश्ये पाहत आपण बारीला पोचतो. सर्वत्र सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर जरीचा हिरवा शालू नेसवावा तसा भास होतो. अवखळ लहान निर्झर आणि मोठे धबधबे यांनी जणू त्यावर वेलबुट्टी काढली आहे असे वाटते. मन अगदी प्रसन्न झालं की गावाकडे जाणार्या डांबरी सडकेने वाटचाल सुरु करायची. गावात पोचले की जरा चौकशी करुन नाश्त्याची सोय करावी. आणि तिथेच दुपारच्या जेवणाची पण तजवीज करण्यास सांगावे. पुढील वाट तशी रुळलेली आहे. गावातून बाहेर पडताच एक अवखळ ओढा आहे. त्या गुढगाभर पाण्यातून ओलांडून चढाला लागले की उजव्या हाताला एक मंदिर आहे हेच ते कळसूबाईचे मंदिर. सामान्य (की आळशी?) भक्तांसाठीच जणू ती खाली येऊन राहिली असावी. तिथे दर्शन घेऊन दमछाक करणारी वाटचाल सुरु करुन पुढची सगळी भिस्त आपल्या पायांवर. एक चढण संपली की लहानसे पठार आहे. तिथे थोडा दम खाऊन निघावे. पुढल्या वाटचालीत कळसूबाई स्पेशल शिडी सिलसिला सुरू होतो. इथे थोडी जपूनच चढाई करावी. कारण थोडा पाय सटकला तर संकटच. किमान दोन दातांची तर आहुती नक्कीच. काही शिड्या दगडी पायऱ्या लोखंडी रेलिंग अशा आहेत तर काही पूर्ण लोखंदी २ इंची लोखंडी ऍंगलच्या बनवलेल्या. काही ठिकाणी पायऱ्यावरुन पाणी वाहत असते. आणखी दोन वेळा पठारं आणि चढण असे केले की असे वाटते बास आत पोचलोच. पण अजूनही मोठी चढाई बाकी असते. थकलेला जीव आता मात्र मेटाकुटीला आलय. मग मात्र एक क्षणभर विश्रांती घेउन पाणी पिउन ताजेतवाने व्हावे. अशा वेळी कुठलेही वाहते स्वच्छ पाणी अम्रुतासमान लागते. नव्या जोमाने चढाई सुरु करायची आता. बास आता थोडेच बाकी, आलेच असे म्हणत शेवटच्या कस काढणाऱ्या शिडीला आपण भिडतो. साधारण ५० पायर्यांची आणि ७० फूट लांब ही शिडी कळसूबाई म्हणजे खायचे काम नाही याचेच प्रत्यंतर देते. ती एकदा पार केली कि हुर्रे, फत्ते, जय हो, हर हर महादेव, शिवाजी महाराज की जय काहीही म्हणा. शब्दशः स्वर्ग चार पावलांवर येतो. नेहमी फोटोमध्ये पाहिलेले, ब्लॉगवर वाचलेले कळसूबाईचे मंदिर प्रत्यक्षात दिसते. तिथेच नतमस्तक व्हायचे आणि जरा आजूबाजूला पाहिले की साक्षात स्वर्ग की. पावसाळ्यात हा पूर्ण परिसर ढगांच्या चादरीखाली लपलेला असतो. मध्येच कधीतरी ढगांची चादर हटते तेव्हा चौफेर नजर भिरभिरते. स्वच्छ असेल तर रतनगड, त्याचा खुटा, हरिश्चंद्रगड, धाकडी कळसूबाई, मागचे कात्राबाईचे जंगल, अलंग-मदन-कुलंग असा सगळा परिसर कवेत आल्याचा भास होतो. आपल्या सह्यलंकृत महाराष्ट्रातल्या अत्त्युच्च शिखरावर आपण आहोत आणि बाकी सगळे खाली ही भावनाच अंगावर मूठभर मांस चढवते. चला बरोबरचा शिधा खाऊन घ्यायचा आणि परतीच्या प्रवासाला लागायचे. पुढल्या भटकंतीचे बेत आखत. महाराष्ट्र्रातील सर्वात जास्त उंचीचे शिखर कळसूबाई आहे. यांची उंची १६४६ मी. आहे. इगतपुरी, भंडारदरा रस्त्यावरुन 'बारी' या गावाजवळून जाणे सोयीचे पडते. सुमारे ९०० मीटरची अनेक टप्प्याची चढाओढ करावी लागते. कळसूबाईवर जायला जरा लांबून दक्षिणेकडून गुरांची वाट, पूर्वेकडून नेहमीची साखळदंडाची वाट तसेच शिखराच्या उत्तरेकडून इंदौर गावातून येणारी वाट अशा अनेक वाटा आहेत. सकाळच्या स्वच्छ वातावरणात कळसूबाईवरुन अनेक शिखरे पाहावयास मिळतात. उत्तरेस रामसेज, देहेर यांच्या मागील रांगेत सप्तश्रृंग, मर्कंडा, रावळया -जावळया, धोडप, राजदेहेर, कोळधैर, चांदवड ही सातमाळयाची दुर्गसाखळी पाहावयास मिळते. ईशान्येला बितनगड, औंढा, आड, विश्रामगड आढळतात. पूर्वेकडे अंकाई - टंकाई हे जुळे गड, पूर्वेला विस्तीर्ण मुलुख नजरेत न सामावणारा, दक्षिणेला भंडारदरा धरणाच्या अवतीभोवती पाबर, रतनगड, हरिशचंद्रगड पाहावयास मिळतात तर पश्चिमेला अलंग, मदन, कुलंग हे दुर्गम दुर्ग आणि दूरवर कोकणात असणारे माहुली, माथेरान, विकटगड हे गड आहेत. हवा जर अगदी स्वच्छ असेल तर भीमाशंकरचा डोंगर, क्वचित प्रसंगी खंडाळयाचे नागफणी टोक दिसू शकेल असे वाटते. या शिखरांच्या नावासंबंधी अशी दंत कथा आहे की, फार पूर्वी कळसू नावाची एक कोळयाची पोर या प्रदेशात राहत होती. तिच्याच स्मरणार्थ 'कळसूबाई' हे नाव दिले. या ठिकाणी किल्ला बांधला गेलेला नाही. शिखर माथ्याच्या खालच्या टप्प्यावर एक छोटीशी विहीर आहे. महाराष्ट्र्रातले सर्वात उंच परंतु ते असे पर्यटनदृष्टया दुर्लक्षितच राहिलेले आहे. |
” |
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४१, २१ ऑक्टोबर २०११ (UTC)