Jump to content

चतुर मुले आणि ऑलिव्हची फळे (लोककथा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

थोडा वेगळ्या पद्धतीने विचार केला तर समस्येवर तोडगा कसा निघू शकतो हे सांगणारी ही कथा.

कथेचा आशय

[संपादन]

इटलीमधील एका व्यापाऱ्याची ही गोष्ट आहे. तो आपल्या शेजाऱ्याला म्हणाला, "मी प्रवासाला निघालो आहे. मी कधी परत येईन हे मला माहीत नाही. माझी ही मोठी बरणी तू तुझ्याकडे सांभाळून ठेव; मी परत आल्यावर ती तुझ्याकडून परत घेईन." काही काळ लोटल्यानंतर, त्या शेजाऱ्याला ती बरणी उघडून पाहण्याचा मोह झाला. त्याने ती उघडली आणि धुळीच्या एका जाड थराखाली त्याला काही सोन्याची नाणी आढळली!

हा त्याच्यासाठी एक मोठा मोह होता आणि तो विचार करू लागला, "इतक्या वर्षांत परतला नाही त्याअर्थी कदाचित माझ्या मित्राचे निधन झाले असेल, कदाचित तो आता परत येणार नाही. हे सर्व पैसे या बरणीत असेच ठेवून काय उपयोग? आणि मला तर पैशांची नितांत गरज आहे!" म्हणून त्याने काही नाणी घेतली, उरलेली परत होती तशीच ठेवून दिली. पुन्हा काही दिवस गेले. पुन्हा एकदा त्याला पैशाची निकड निर्माण झाली. परत त्याला आठवण झाली त्या बरणीतील नाण्यांची. या वेळी त्याने फारसा विचार न करताच काही नाणी काढली. जेव्हा जेव्हा त्याला आता निकड निर्माण होत असे तेव्हा तो सरळ बरणी काढायचा आणि त्यातील नाणी काढून वापरायला लागायचा. असे करता करता बरणीतील सर्व सोने संपून गेले. सोने दिसू नये म्हणून त्याच्यावर जी ऑलिव्हची फळे ठेवली होती ती आता कुजायला लागली होती, म्हणून त्याने ती फेकून दिली.

एक दिवस तो व्यापारी परत आला आणि आपल्या शेजाऱ्याला म्हणाला, "माझी बरणी मला परत दे." काही दिवसांनंतर, त्या शेजाऱ्याने ती बरणी परत केली; ती पुन्हा धुळीने माखलेली होती, अगदी आधी होती तशीच. व्यापाऱ्याने ती बरणी उघडली, तेव्हा त्याला आत केवळ काही ताजी ऑलिव्हची फळेच आढळली. सर्व सोने गायब झाले होते. तो न्यायाधीशांकडे गेला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला.

पण न्यायाधीश म्हणाले, "तू खरे बोलत आहेस याची मला खात्री कशी पटेल? कदाचित तुझा शेजारीच खरे बोलत असेल." त्यांच्यात वाद झाला, पण त्यांना काहीच तोडगा सापडला नाही. विचार करकरून डोके भणाणले पण काय करावे ते व्यापाऱ्याला सुचेना. काय केले म्हणजे न्यायाधीश महोदयांची खात्री पटेल ते त्याला कळेना. शेवटी मोकळ्या हवेवर फिरायला जाऊ या असा विचार त्याने केला. मग तो शहरात हिंडू लागला.

अचानक त्याला काही मुले खेळताना दिसली. त्यांच्याकडे एक बरणी होती आणि त्या खेळात एक व्यापारी, एक शेजारी आणि एक न्यायाधीशही होता! तो न्यायाधीश त्या शेजाऱ्याला म्हणाला, "ही बरणी उघड. पण मला तर यात केवळ ताजी ऑलिव्हची फळेच दिसत आहेत! त्या व्यापाऱ्याला जाऊन आता किती काळ लोटला आहे?" "अडीच वर्षे." "खरोखर? मग तू ही ऑलिव्हची फळे इतक्या दीर्घकाळापर्यंत ताजी कशी काय ठेवू शकलास? असे तर झाले नाही ना, की तू बरणीतील जुनी फळे काढून त्या जागी काही ताजी फळे भरली असशील?" हे ऐकताच तो शेजारी खजील झाला आणि लबाडी मान्य केली.

व्यापाऱ्याने मनात विचार केला, "अरे व्वा! ही मुले माझ्यापेक्षा कितीतरी अधिक हुशार आहेत; त्यांनी तर या समस्येवर लगेचच तोडगा शोधून काढला." असे म्हणून तो आपल्या शेजाऱ्याकडे परत गेला आणि त्याने त्याला तेच प्रश्न विचारले; आणि साहजिकच त्या शेजाऱ्याकडे सांगण्यासारखे आणखी काहीच नव्हते आणि त्याला झालेल्या गोष्टीची कबुली देणे भागच पडले.

तात्पर्य

[संपादन]

सद्भावना असेल आणि मार्ग काढण्याची प्रामाणिक इच्छा असेल तर मार्ग सापडतोच, हे या कथेमधून लक्षात येते.[१]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ The Mother (2004). Words of the Mother – III. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 15 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.