Jump to content

चक्रीवादळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेरिकेच्या ओक्लाहोमा राज्यात झालेला एक (टोर्नेडो)

चक्रीवादळ ( इंग्लिश: Cyclonic storm) हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये होणाऱ्यालाहरिकेन, आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला टायफून ह्या नावाने ओळखले जाते. सर्वसाधारणपणे, चक्रीवादळाचा पुढे सरकण्याचा वेग ताशी २० किलोमीटरपेक्षा बराच कमी असतो.

गडगडाटी वादळाशी निगडीत असलेल्या गर्जन्मेघाच्या (ऊर्ध्व दिशेने वाढणाऱ्या व तसे करताना भिन्न प्रकारचे विद्युत् भार निर्माण झाल्यामुळे गर्जना करणाऱ्या मेघाच्या) विशेष प्रकारच्या शुंडायुक्त (सोंड असलेल्या) भागात अतिद्रुतगतीने परिभ्रमण करणाऱ्या वाऱ्यांमुळे निर्माण होणारे उग्र स्वरूपाचे वादळ. घूर्णवाती वादळात गर्जन्मेघाच्या तळाचा काही भाग काही वेळा एखाद्या मत्त गजाच्या शुंडेसारखा खाली लोंबकळू लागतो. क्वचित प्रसंगी तो जमिनीपर्यंतही पोहोचतो. या मेघशुंडेत (सोंड असलेल्या मेघ विभागात) मेघवस्तूचे अतिप्रचंड वेगाने घूर्णन (परिभ्रमण) चालू असते व त्यामुळे मेघशुंडेत हवेचे जोरदार ऊर्ध्व प्रवाह निर्माण होतात. घूर्णनाची दिशा सव्य किंवा अपसव्य (घड्याळातील काट्यांप्रमाणे वा त्याउलट) अशी कोणतीही असते. हे ऊर्ध्व प्रवाह इतके सामर्थ्यशाली असतात की, त्यामुळे भूपृष्ठावरील अवजड पदार्थही वर उचलले जातात. मेघशुंडा ३००—४०० मी. व्यासाहून मोठी असत नाही. शुंडामेघ (सोंड असलेला गर्जन्मेघ) सामान्यपणे ताशी १५ ते ५० किमी. वेगाने जातो. परंतु त्याच्या शुंडेमध्ये जे जोरदार ऊर्ध्व प्रवाह असतात व मेघवस्तूचे आणि हवेचे जे उग्र प्रमाणावर घूर्णन चालू असते त्यामुळे मोठमोठे वृक्ष उन्मळून पडतात, घरातील अवजड वस्तू इतस्ततः उधळल्या जातात, एखाद्या स्फोटाने कोसळाव्यात तशा इमारतीही कोसळून पडतात. इतकेच काय परंतु ट्रॅम, आगगाड्यांचे डबे, मोटारगाड्या यांसारख्या वाहनांवरून शुंडामेघ गेल्यास त्यांनाही शुंडेत अलगद वर उचलून भिरकावून दिले जाते. कित्येक वेळा या विनाशात चमत्कृतीही आढळते. प्रचंड वेगामुळे गवताच्या काड्यांसारखे हलके पदार्थ धातवीय खांबांसारख्या कठीण पदार्थांचा भेद करून त्यांमध्ये रुतून बसलेले दिसतात. मेघशुंडेच्या आतील हवेचा दाब बाहेरील हवेच्या दाबापेक्षा १००-२०० मिलिबारने किंवा त्याहूनही कमी असतो (बार हे दाबाचे एकक आहे, १ बार = १०६ डाइन प्रती चौ. सेंमी., १ मिलिबार = १०-३ बार). थोड्या क्षेत्रात एवढी दाब-भिन्नता निर्माण झाल्यावर तीमुळे फार मोठी गति-उत्पादक (वाऱ्याचा वेग वाढविणारी) प्रेरणा निर्माण होते. विस्तृत प्रमाणावर मनुष्यहानी व वित्तहानी घडून येते ती या अतिविध्वंसक तीव्रतम प्रेरणेमुळेच.

शुंडामेघाची व्याप्ती आणि आकार लहान असल्यामुळे हवामान कार्यालयात जे दैनंदिन हवामाननिदर्शक नकाशे तयार केले जातात त्यांवर घूर्णवाती वादळ किंवा शुंडामेघ निर्माण होण्यापूर्वीची काहीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्याचप्रमाणे घूर्णवाती वादळ घडून ते निघून गेल्यावरही हवामाननिदर्शक नकाशावर काहीही सांकेतिक चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे घूर्णवाती वादळांच्या निर्मितीची व संभाव्य आक्रमणाची आगाऊ सूचना देता येत नाही. घूर्णवाती वादळ येण्यापूर्वी आणि ते निवून गेल्यानंतर काही काळ गारा व पर्जन्यवृष्टी होते. घूर्णवाती वादळांचा आवाज ३०–३५ किमी. पर्यंतच्या परिसरात ऐकू येतो. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत, विशेषतः पूर्व विभागात, अशा उग्र वादळांपासून अनेक वेळा उपद्रव होतो. त्या संकटाची पूर्वसूचना देता यावी यासाठी तेथे रडार यंत्रणेचे जाळे योजिण्यात आले आहे. घूर्णवाती वादळांचे मार्ग सामान्यपणे वेडेवाकडे व काही थोड्या किमी. पासून ते २५–३० किमी. लांबीचे असतात. क्वचित प्रसंगी ते ५०० किमी. लांबीचे आढळलेले आहेत. मार्ग-लांबीचे माध्य (सरासरी) मूल्य ८–१० किमी. असते. शुंडामेघात होणाऱ्या वायुघूर्णनाचा वेग मोजला गेलेला नसला, तरी त्यांची उत्पत्ती व त्यांमुळे घडणारा विनाश विचारात घेता हा वेग ताशी १६० ते ५०० किमी. इतका असावा असा अंदाज केला गेला आहे. शुंडामेघात ऊर्ध्व प्रवाहांची गती ताशी २४० किमी. एवढी असू शकते. हवामानाच्या अनेक विध्वंसक आविष्कारांत घूर्णवाती वादळांचा प्रथमांक लागतो. साधारणपणे ६ ते ८ किमी, लांबी व १-२ किमी. रुंदी असलेल्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात विध्वंस झालेला दिसून येतो.

वातावरणाची जी परिस्थिती गडगडाटी वादळाचा मेघ निर्माण होण्यास आवश्यक असते तीच परिस्थिती घूर्णवाती वादळांचे मेघ निर्माण होण्यास हवी असते [⟶ गडगडाटी वादळ]. हवेमध्ये तीव्र ऊर्ध्व प्रवाह निर्माण होण्यास योग्य असे ऊष्मागतिक अस्थैर्य (निरनिराळ्या ठिकाणी दाब, तापमान इत्यादींत फरक असणे) वातावरणात उपस्थित असणे, वातावरणाच्या तळाच्या थरांत मुबलक प्रमाणात जलबाष्प असणे व त्या हवेचे संनयन (उष्ण हवेचा प्रवाह थंड भागाकडे वाहणे, अभिसरण) होत राहणे ह्या गोष्टी गर्जन्मेघाच्या निर्मितीस आवश्यक असतात. उच्च क्षोभावरणात (वातावरणाच्या सर्वांत खालच्या संक्षोभयुक्त थरात) द्रुतगतिमान वाऱ्यांचे अस्तित्त्व असणे हेही शुंडामेघनिर्मितीसाठी आवश्यक असते. परंतु एखाद्या ऊर्ध्व दिशेने वाढणाऱ्या राशिमेघापासून (ऊर्ध्व दिशेने राशीप्रमाणे वाढणाऱ्या मेघापासून) घूर्णवाती शुंडामेघाचा जन्म नेमका कसा होतो याचे नीटसे आकलन अद्याप झालेले नाही.

भारतामध्ये घूर्णवाती वादळे बहुतेक आढळत नाहीत. परंतु भारताच्या ईशान्येकडील राज्यांत क्वचित प्रसंगी ती उन्हाळ्यामध्ये निर्माण होत असावीत असे दिसून आले आहे. ब्रिटिश बेटांत मुख्यत्वेकरून दक्षिणेकडे व मध्यभागात एकदोन वर्षांनी एखादे घूर्णवाती वादळ होते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत अशा घूर्णवाती वादळांचे उग्र स्वरूप आणि संख्याधिक्य विशेष आढळते. तेेथे ती रॉकी पर्वताच्या पूर्वेस, मिसिसिपी नदीच्या आसमंतातील मध्यवर्ती प्रदेशात, सर्व ऋतूंत व वैशिष्ट्याने वसंत आणि ग्रीष्म ऋतूंत, मुख्यत्वेकरून दुपारी आढळतात. अमेरिकेप्रमाणेच दक्षिण व मध्य रशियात व दक्षिण ऑस्ट्रेलियात घूर्णवाती वादळांचा आविष्कार दिसून येतो. अमेरिकेच्या आयोवा व पूर्व कॅनझस राज्यांत प्रतिवर्षी प्रतिचौरस किमी. क्षेत्रात सु. १२ घूर्णवाती वादळे झालेली आढळतात.

तीव्रता मापन

[संपादन]

चक्रीवादळाची तीव्रता खालील प्रकारांनी मोजण्यात येते:

  • वातावरणशास्त्र(क्लायमॅटॉलॉजी)
  • सामान्य सरासरीचे अवलोकन
  • उपग्रहाची मदत घेऊन
  • रडार वापरून

श्रेणी

[संपादन]

चक्रीवादळाची श्रेणी खालीलप्रमाणे ठरते :

श्रेणी चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग संभाव्य नुकसान
ताशी ९० ते १२४ किमी घर पिके व झाडे यांचे नाममात्र नुकसान होते.
ताशी १२५ ते १६४ किमी लक्षात येण्यापत नुकसान.
ताशी १६५ ते २२४ किमी छपरे उडणे व वीजपुरवठ्यास धोका.
ताशी २२५ ते २७९ किमी जबर नुकसान,मालमत्तेचे नुकसान वीज पुरवठा खंडित.
ताशी २८० किमी किंवा त्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान, विस्तारित क्षेत्रात प्रभाव.

चक्रीवादळाचे नामकरण

[संपादन]

सध्या चक्रीवादळाला नाव देण्याची पद्धत आहे.हवामानतज्ज्ञ व त्याविषयी काम करणाऱ्या सर्वांना संवाद करण्यास सोपे जावे म्हणून त्याचे नामकरण करतात. या पद्धतीचे जनक ऑस्ट्रेलियातील हवामानतज्ज्ञ आहेत.

  • ते आपल्याला न आवडणाऱ्या राजकारणी लोकांचे नाव देत असत.
  • अमेरिकन सैनिक आपल्या पत्नीचे किंवा मैत्रिणीचे नाव देत असत.
  • १९७९ मध्ये जागतिक हवामान संघटनेने स्त्री पुरुषांच्या नावाने ती देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यासाठी एक यादीच बनविली.
  • सन २००० पासून एका वेगळ्या पद्धतीने नावे देण्यात येतात.निसर्गाशी संबंधीत/खाद्यपदार्थाची ती नावे आहेत. जेथे चक्रीवादळे येतात त्या देशांची यादीही तयार करण्यात आलेली आहे.साधारणतः ६ वर्षांनी या यादीतील नावे वापरणे प्रथमपासून सुरू करतात.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ तरुण भारत, नागपूर- ई-पेपर दि. १२/१०/२०१३ पान १ व २ दि. १२/१०/२०१३ रोजी १६.४६ वाजता जसे दिसले तसे.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत