घाईगडबड (लोककथा)
बैल गेला आणि झोपा केला अशी एक म्हण आहे. तशाच आशयाची ही एक लोककथा आहे.
कथेचा आशय
[संपादन]खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. त्या काळी लोकं अगदी प्राथमिक जीवन जगत होते. आधुनिक सोयीसुविधांचा उदय व्हायचा होता, असा तो काळ होता. गारगोट्या एकमेकांवर घासून अग्नी प्रज्वलित करायचा आणि मग तो जतन करून ठेवायचा. तो विझू नये म्हणून डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागायचे. या काळातील अरेबिया प्रांतातली ही कहाणी आहे.
स्वयंपाक करायला सुरुवात करणार एवढ्यात एका अरब महिलेच्या लक्षात आले की, तिच्या घरातील विस्तव विझला आहे. तिने तातडीने आपल्या नोकराला सांगितले, “जा, पटकन शेजारच्या घरातून निखारे घेऊन ये. पळत जा आणि धावत ये. मला आधीच खूप उशीर झाला आहे.”
शेजारचे घरसुद्धा अगदी काही जवळ नव्हते. नोकर निघाला. गाणं गुणगुणत, शीळ घालत तो निघाला. तेवढ्यात त्याला दूरवरून एक काफिला येताना दिसला. हे कोण लोकं आहेत? इतके सामानसुमान घेऊन ते कुठे चालले आहेत? बायका-मुलं, चिल्ली-पिल्ली, लहानथोर सारेच निघाले होते. नोकराच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याच नादात तो पुढे जाऊ लागला.
तेवढ्यात त्या काफियातल्या एका माणसाने या नोकराला इजिप्तला जायचा मार्ग विचारला. नोकराने त्याला मार्ग सांगितला. पण त्याच्या मनातले कुतूहल त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने चौकशी करायला सुरुवात केली. तुम्ही कोण? कुठे चालला आहात? कशासाठी चालला आहात? त्या माणसानेही सारी इत्तंभूत माहिती दिली. इजिप्तमध्ये काही व्यापार करण्याच्या निमित्ताने हे सारी मंडळी तिकडे निघाली असल्याचे त्याला कळले. त्यांचे वाडवडील तिथे व्यापार करत असत. तिथल्या पुष्कळ गोष्टी ते ऐकून होते. तेव्हा आता स्वतःचे नशीब अजमवावे म्हणून ती मंडळीही इजिप्तला निघाली होती.
गप्पागोष्टींच्या नादात वेळ कसा निघून गेला ते कोणालाच काही कळले नाही. जणू दोघं अनंत काळचे मित्र असावेत अशा त्यांच्या गप्पा रंगल्या. नोकर बोलत बोलत त्या काफिल्यासोबतच जाऊ लागला. मजल-दरमजल करत तो त्यांच्याबरोबर इजिप्तला जाऊन पोहोचला. या साऱ्या नादात सुमारे एक वर्षभरचा काळ लोटला. आणि मग कधीतरी एकदम तो भानावर आला. त्याला आठवले की, मालकीण बाईंनी आपल्याला निखारे आणायला पाठविले होते.
आता मात्र तो घाईगडबडीने आपल्या गावी परतला. आणि परतल्यावर, शेजारच्या घरी निखारे आणायला गेला. उशीर व्हायला नको म्हणून अगदी घाईगडबडीने जवळजवळ पळतच तो निघाला. पण वाटेत दगडावर अडखळून पडला. त्याच्याबरोबर जळणारे निखारेसुद्धा खाली पडले आणि मातीत पडल्यामुळे ते चटकन विझले. मग तो मनाशी म्हणू लागला: “छे, घाईगडबड करता कामा नये. घाईत असणे किती त्रासदायक आहे!“
तात्पर्य
[संपादन]वेळेचे महत्त्व न ओळखणाऱ्या एका माणसाची ही कहाणी. घडलेल्या घटनेमधून अपेक्षित तो बोध न घेता काहीतरी तिसराच अर्थ काढायचा अशीही काही माणसे असतात. गप्पागोष्टींच्या नादात महत्त्वाचे काम करायचे राहून जाते आणि मग दोष दुसऱ्याच गोष्टीला दिला जातो, हे सांगणारी ही कथा वाचकाला अंतर्मुख करते. [१]
संदर्भ
[संपादन]- ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.