गोविंद देव गिरि महाराज
स्वामी गोविंद देव गिरि महाराज उर्फ आचार्य किशोरजी व्यास हे भारतातील एक आध्यात्मिक गुरू आहेत. अनुयायांमध्ये ते स्वामीजी म्हणूनही ओळखले जातात. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव किशोर मदनगोपाल व्यास असे आहे.[१][२] अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामासाठी जबाबदार असलेल्या श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे ते कोषाध्यक्ष आणि मथुरा कृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.[३][४][५] स्वामी गोविंददेवगिरि महाराज हे हिंदू धर्मग्रंथांचे अभ्यासक तसेच रामायण, भगवदगीता आणि इतर प्राचीन ग्रंथांवरील त्यांच्या प्रवचनांसाठी ओळखले जातात.
स्वामी श्री गोविंद देव गिरि | |
![]() | |
जन्म | २५ जानेवारी, १९४९ बेलापूर, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र |
कार्यक्षेत्र | अखंड भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, संस्कृत व अन्य अनेक भाषा |
प्रमुख विषय | वेद, रामायण, भगवदगीता |
संकेतस्थळ | www |
जीवन
[संपादन]स्वामी गोविंददेवगिरिजी महाराज यांचा जन्म २५ जानेवारी, १९४९ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर या गावात एका धार्मिक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव किशोर मदनगोपाल व्यास उर्फ आचार्य किशोरजी व्यास असे होते. स्वामीजींना धार्मिकता आणि अध्यात्माचा वारसा त्यांच्या दीर्घ कौटुंबिक परंपरेतून मिळाला.[१]
शिक्षण
[संपादन]स्वामीजींनी त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांचे मूळ गाव बेलापूर या ठिकाणी पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी स्वाध्याय परिवाराचे श्री पांडुरंगशास्त्री आठवले यांनी स्थापन केलेल्या तत्वज्ञान विद्यापीठात प्रवेश घेतला. स्वामीजींनी श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली तत्वज्ञानात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर स्वामीजी वेद, उपनिषद आणि प्राचीन भारतातील इतर धर्मग्रंथांच्या पुढील अभ्यासासाठी वाराणसी येथे गेले आणि प्रसिद्ध वैदिक विद्वान, वेदमूर्ती डॉ. विश्वनाथजी देव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 'दर्शनाचार्य' ही पदवी प्राप्त केली.[१][२]
आध्यात्मिक प्रवास
[संपादन]वयाच्या १७ व्या वर्षी स्वामी गोविंद देव गिरि महाराजांनी श्रीमद्भगवद्गीतावर आपले पहिले प्रवचन त्यांच्या मूळ गावी बेलापूर येथे दिले. तेव्हापासून स्वामीजी मागील ६० वर्षांपासून श्रीमद्भागवत, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, दासबोध, योग वसिष्ठ, श्री देवी भागवत, शिवपुराण, हनुमान कथा, बुद्ध कथा इत्यादींवर देश विदेशात प्रवचन देत आहेत. रामायण भागवत सोबतच भगवान बुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी उपदेश करणारे ते एकमेव संत आहेत.[६] अशा प्रकारे ते समाजाला जोडण्याचे आणि देशभक्तीची भावना जागृत करण्याचे काम करतात म्हणूनच त्यांना ‘राष्ट्रसंत’ असेही म्हणतात.
अयोध्येतील श्री राम मंदिरात प्रभू श्रीरामांची मूर्ती 'प्राण प्रतिष्ठा' वेळी देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचा ११ दिवस सुरू असलेला उपवास त्यांनी स्वामी श्री गोविंद देव गिरि महाराजांच्या हस्ते सोडला.[७]
दीक्षा
[संपादन]तामिळनाडूतील कांची कामकोटी पीठाचे प्रमुख परमपूज्य स्वामी श्री जयेंद्र सरस्वती यांच्या आशीर्वादाने स्वामीजींना हरिद्वार या पवित्र ठिकाणी ३० एप्रिल २००६ या दिवशी गंगा नदीच्या काठावर परमहंस सन्यास मध्ये दीक्षा देण्यात आली. संन्यास दीक्षा घेण्यापूर्वी स्वामीजींना आचार्य किशोरजी व्यास या नावाने ओळखले जात होते. दीक्षेनंतर त्यांना औपचारिकपणे श्री स्वामी गोविंददेवगिरि महाराज म्हणतात.[८]
स्थापन केलेल्या संस्था
[संपादन]महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान
वेदांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्याच्या एकमेव उद्देशाने, स्वामीजींनी २१ फेब्रुवारी १९९० रोजी आळंदी येथे महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान ची स्थापना केली.[९]
वैदिक शाळा
[संपादन]- श्री सद्गुरू निजानंद महाराज वेद विद्यालय, आळंदी, पुणे (महाराष्ट्र)
- श्री समर्थ संत महात्माजी वेद विद्यालय, ढालेगाव (महाराष्ट्र)
- श्री चतुर्वेदेश्वर धाम, सावरगाव (महाराष्ट्र)
- ऋग्वेद पौरोहित्य वेद विद्यालय, जिंतूर, परभणी (महाराष्ट्र)
- महर्षी दधिची वेद विद्यालय, गोडमंगलोड, नागौर (राजस्थान)
- श्री जय जगदंबा वेद विद्यालय, खामगाव (महाराष्ट्र)
- ब्रम्हा सावित्री वेद विद्यालय, पुष्कर (राजस्थान)
- श्रीराम वेद विद्यालय, धुळे (महाराष्ट्र)
- श्री संत गुलाबराव महाराज वेद विद्यालय, चांगापूर, अमरावती (महाराष्ट्र)
- श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य वैदिक विद्यापीठम, हावडा (कोलकाता)
- समन्वय वेद विद्यालय (हरिद्वार)
- महाराजा प्रताप सिंह वेद विद्यालय, जम्मू, (जम्मू आणि काश्मीर)
- संत गुलाबराव महाराज वैदिक महाविद्यालय, आळंदी, पुणे (महाराष्ट्र)
- श्री सत्यमित्रानंद गिरि वेद विद्या केंद्र, सुरत (गुजरात)
- शुभकरनतिवेनीवेद विद्यालय, लखीसराय (बिहार)
- वेदार्थ बोध विद्यालय, पुणे (महाराष्ट्र)
- मणिपूर वेद विद्यापीठ, इंफाळ (मणिपूर)
- योगेश्वर याज्ञवल्क्य वेद विद्या प्रतिष्ठान, सराई (महाराष्ट्र)
- संत ज्ञानेश्वर वेद विद्यालय, वृंदावन (उत्तर प्रदेश)
- व्ही.एम. विश्वनाथ देव गुरुकुल, वाराणसी (उत्तर प्रदेश)
- गायत्री वेद विद्यालय, ऋषिकेश (उत्तराखंड)
- श्री. जयेंद्र सरस्वती गुरुकुलम, सुदी, गदग (कर्नाटक)
संघटना
[संपादन]- श्री कृष्ण सेवा निधी - श्री कृष्ण सेवा निधी ही स्वामीजींनी १९८६ मध्ये स्थापन केलेली पहिली ट्रस्ट आहे आणि ही ट्रस्ट गरजूंना लोकांना विविध प्रकारची मदत करते.[१०]
- संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल - संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल २००० मध्ये स्थापन केले गेले.[११]
- गीता परिवार - स्वामीजींनी १९८६ मध्ये महाराष्ट्रातील संगमनेर (जिल्हा - अहिल्यानगर) येथे गीता परिवाराची स्थापना केली. गीता परिवाराच्या माध्यमातून लहान मुलांसाठी 'बाल संस्कार केंद्र' (मुलांसाठी सांस्कृतिक केंद्र) आणि प्रामुख्याने 'बाल संस्कार शिबिर' (मुलांमध्ये भारतीय संस्कृती आत्मसात करण्यासाठी कार्यशाळा) संपूर्ण भारतभर राबविले जातात.[१२] कोविड काळात स्वामीजींच्या प्रेरणेने गीता परिवाराने ऑनलाइन गीता पाठांतराचे काम सुरू केले जे आज जगातील सर्वात मोठे गीता शिक्षण संस्था म्हणून स्थापित झाले आहे. लर्नगीता या नावाने चालवल्या जाणाऱ्या या उपक्रमात लाखो लोकांना इंग्रजीसह १२ भारतीय भाषांमध्ये गीता शिकवली जाते आणि प्रत्येक अध्याय लक्षात ठेवल्यानंतर त्याची परीक्षा घेतली जाते त्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. संपूर्ण गीता तोंडपाठ करणाऱ्या व्यक्तीला "गीताव्रती" ही पदवी आणि पदक देऊन सन्मानित केले जाते. जगातील १८० देशांमधील लाखो लोक याचा लाभ घेत आहेत.[१३]
पुरस्कार
[संपादन]- परमपूज्य चंद्रशेखरेंद्र सरस्वती महाराज पुरस्कार - स्वामीजींना कांची कामकोटी पीठमचे परमपूज्य शंकराचार्य यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.[१४]
- दधीच समाजरत्न पुरस्कार - अखिल भारतीय दधीच ब्राह्मण महासभेतर्फे स्वामीजींना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजस्थानमधील गोडमंगलोड (नागौर) येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला.
- भृंग ऋषी पुरस्कार - संत ज्ञानेश्वर मंदिरात ऋषीपंचमीच्या पवित्र प्रसंगी भिंगार (अहिल्यानगर) महाराष्ट्राच्या ब्राह्मण सभेने स्वामीजींना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केले.
- ऋग्वेद भूषण पुरस्कार - पुण्यातील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेने स्वामीजींना हा पुरस्कार प्रदान केला.
- संतश्रेष्ठ पुरस्कार - सॅनहोसे अमेरिका येथे डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.[१५]
- रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार - श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्यावतीने पहिल्या रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार[१६]
- सूर्य रत्न पुरस्कार - आळंदी येथे गीता भक्ती अमृत महोत्सवात हा पुरस्कार देण्यात आला.[१७]
संदर्भ
[संपादन]- ^ a b c गोमाणे, प्रशांत (2024-01-22). "Govind Giri Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास सांगणारे गोविंदगिरी महाराज कोण?". Mumbaitak. 2025-01-28 रोजी पाहिले.
- ^ a b Khane), अंकिता खाणे (Ankita (2024-01-22). "Ayodhya Pran Pratishtha: PM मोदींनी उपवास ज्यांच्या हातून सोडला ते स्वामीजी कोण? महाराष्ट्रातील नगरमध्ये झालाय जन्म". Marathi News Esakal. 2025-01-28 रोजी पाहिले.
- ^ टीम, एबीपी माझा वेब (2021-01-23). "माझा कट्टा | संपूर्ण राम मंदिर निर्मितीसाठी जवळपास 1100 कोटींचा खर्च येण्याची शक्यता : गोविंद देव गिरी महाराज". marathi.abplive.com. 2025-01-28 रोजी पाहिले.
- ^ ""After Pran Partishtha of Lord Ram, festival of lights has begun": Swami Govind Dev Giri". 2024-01-22. ISSN 0013-0389.
- ^ "Maha Kumbh 2025: Swami Govind Dev Giri Maharaj's 76th Birthday to Be Celebrated At Mela Shivir". Republic World (इंग्रजी भाषेत). 2025-01-25. 2025-01-28 रोजी पाहिले.
- ^ डेस्क, एबीपी न्यूज़ (2024-01-23). "रामलला प्राण-प्रतिष्ठा के दिन पीएम मोदी का व्रत खुलवाने वाले कौन हैं स्वामी गोविंद देव गिरीजी". www.abplive.com (हिंदी भाषेत). 2025-01-28 रोजी पाहिले.
- ^ ""Felt like I was helping a son, who is the nation's hero break his fast": Govind Devgiri Ji Maharaj". 2024-01-23. ISSN 0013-0389.
- ^ "अयोध्या: राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये नगरच्या स्वामी गिरींचा समावेश". Maharashtra Times. 2025-01-28 रोजी पाहिले.
- ^ Bharat, E. T. V. (2024-02-05). "अयोध्या, काशी, मथुरा ही तीन मंदिरं महत्वाची; बाकी सगळं विसरुन जाऊ - गोविंद देव गिरी महाराज". ETV Bharat News. 2025-01-28 रोजी पाहिले.
- ^ "Shri Krishna Seva Nidhi – Dharmashree". dharmashree.org. 2025-01-28 रोजी पाहिले.
- ^ "Swami Govinddev Giri". Bhishma IKS (इंग्रजी भाषेत). 2025-01-28 रोजी पाहिले.
- ^ "Geeta pariwar | About Us". Geeta pariwar (इंग्रजी भाषेत). 2025-01-28 रोजी पाहिले.
- ^ "Free Geeta Class | Online Gita Class | Learn Geeta | Learn gita". Learngeeta (इंग्रजी भाषेत). 2025-01-28 रोजी पाहिले.
- ^ "Pujya Swamiji – Dharmashree". dharmashree.org. 2025-01-28 रोजी पाहिले.
- ^ "गोविंद गिरी महाराजांना संतश्रेष्ठ पुरस्कार:अमेरिकेत डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या हस्ते झाला गौरव". divyamarathi.
- ^ "स्वामी गोविंददेवगिरी महाराजांना रामतीर्थ गोदा राष्ट्र जीवन पुरस्कार; नाशिकमध्ये नागरी सत्कार, गंगा गोदावरीची महाआरती". Loksatta. 2024-05-08. 2025-01-28 रोजी पाहिले.
- ^ "Pune: Govind Dev Giri Maharaj Receives Surya Ratna Award At Gita Bhakti Amrit Mahotsav 2024 In Alandi". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2025-01-28 रोजी पाहिले.