गोकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोकर्णीचे पान
गोकर्णीचे फुल

गोकर्णी किंवा गोकर्ण ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीची फुले गायीच्या कानासारखी असतात म्हणून ही या नावाने ओळखली जाते. ही वनस्पती पारदबंधनासाठी वापरण्यात येणाऱ्या ६४ वनस्पतींपैकी एक आहे.

अन्य भाषांतील नावे[संपादन]

  • वनस्पतीचे नाव गोकर्ण, वेलाचे नाव गोकर्णी (मराठी).
  • अपराजिता (संस्कृत)
  • सुपली, हिंदी व मराठी दोन्ही (सुपली म्हणजे छोटे सूप)
  • Butterfly pea, Blue pea, Cordofan pea and Asian pigeonwings (इंग्रजी)
  • Clitoria ternitea (शास्त्रीय नाव)

गोकर्णी ही भारतीय वंशाची वेलवर्गीय सदाहरित वनस्पती आहे. गोकर्णीच्या फुलांचा रंग सामान्यत: गडद निळा किंवा पांढरा सफेद असतो. परंतु फिकट निळा, फिकट गुलाबी या रंगांची फुले असलेली गोकर्णीदेखील आढळते. रंग कोणताही असो; गर्द हिरव्या पानांत ही फुले अगदी उठून दिसतात.

गोकर्णाची वेल आधार घेत वर वर चढते. बाल्कनीमधील ग्रिलवर किंवा कुंपणावर सहज आपला जम बसवते.

गोकर्णीची पाने गर्द हिरव्या रंगाची असून ती संयुक्त प्रकारची असतात. सदाहरित वेल असल्याने बारा महिने तेरा काळ वेलीवर पाने असतात. पानांची विशिष्ट रचना आणि आकार यामुळे शोभेची वेल म्हणून उद्यानात गोकर्णीची लागवड केली जाते. गोकर्णाची वेल बहुवर्षांयू आहे. पानांचा वापर औषधात केला जातो. पंचकर्मात या वेलीचा वापर शरीरातील त्रिदोषांना संतुलित करण्यासाठी, तसेच शरीरातील नको असणारे विषारी घटक बाहेर काढण्यासाठी केला जातो.

गोकर्णीच्या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो. पाच पाकळ्यांनी बनलेल्या या फुलात एक पाकळी मोठी असते. तिचाच आकार गायीच्या कानासारखा असतो. गोकर्णाच्या वेलीला पावसाळ्यात फुलांचा बहर येतो. ही फुले सुकून गेली की शेंगा येतात. शेंगा साधारण श्रावण घेवड्याच्या शेंगेच्या आकाराच्या; परंतु चपट्य़ा असतात. कोवळ्या शेंगांची भाजी करता येते.

गोकर्णीच्या फुलांचे असंख्य औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळेच अनेक रोग, व्याधी निवारण्यासाठी या फुलांचा वापर करतात. गोकर्णाच्या निळ्या फुलांपासून नैसर्गिक रंगदेखील तयार होतो. गोकर्णाची फुले सावलीत वाळवून त्यांची पावडर करतात. या पावडरचा चहा करता येतो. गोकर्णाच्या फुलांचा चहा अत्यंत औषधी असून, तो मध किंवा गूळ घालून घेतात.

गोकर्णाची फुले, शेंगा, पाने, साल, मुळ्या या प्रत्येक भागाचा औषधांमध्ये वापर केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा या सगळ्या विकारांवर गोकर्ण औषधी आहे. तसेच त्वचा विकार आणि रक्तशुद्धीकरणासाठीदेखील गोकर्णाचा वापर केला जातो. थोडक्यात काय, कोणताही रोग असला तरी गोकर्णाचा औषधी म्हणून वापर करायचा विचार करा; गोकर्ण कधीच पराजित होणार नाही, म्हणजे हरणार नाही. म्हणूनच की काय, गोकर्णाला ‘अपराजिता’ असेही सुंदर नाव आहे.

गोकर्णाची लागवड बियांपासून केली जाते. शेंगा पक्व झाल्या की त्यांचा रंग बदलतो आणि त्या तडकतात. त्यातून साधारण आठ-दहा बिया मिळतात. याच बिया रुजवून गोकर्णाची नवीन रोपे तयार करता येतात. पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही मातीत या बिया अगदी सहज रुजतात. फार मेहनत करावी लागत नाही.

घराची गॅलरी, कमान, शाळेच्या गेटची कमान, मंदिराचे प्रवेशद्वार अगदी कुठेही गोकर्णाच्या वेलीची लागवड करून तो परिसर सुशोभित करता येऊ शकतो.

गोकर्णीचे पान

चित्रदालन[संपादन]