गिरीश जोशी (संगीतकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

गिरीश जोशी हे एक मराठी संगीतकार आहेत. दीर्घकाळ मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसमधली नोकरी करून ते ३७ वर्षांनंतर डेप्युटी कमांडर (वर्क्स) म्हणून निवृत्त झाले.[ संदर्भ हवा ]

गिरीश जोशी यांनि संगीताचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील दादर भागातील व्यास संगीत विद्यालयातून घेतले. नंतर ते त्यांचे ज्येष्ठ बंधू शरद यांच्याकडून शिक्षण घेत राहिले. गिरीश जोशींचा कल पहिल्यापासून सुगम संगीताकडे होता. त्यासाठी अनेक स्पर्धांत भाग घेऊन त्यांनी पारितोषिके मिळवली. मुंबईला मराठा मंदिराच्या स्पर्धेत त्यांना रौप्यपदक मिळाले तर कोल्हापूर शुगर मिल्सच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळाला.[ संदर्भ हवा ]

गायक[संपादन]

इ.स. १९६७मध्ये ’यज्ञ’ कादंबरीच्या निमित्ताने ’सावरकर जयंती’ला पुण्यात झालेल्या ’मृत्युंजय वंदना’ या कार्यक्रमात गिरीश जोशींना अरविद गजेंद्रगडकर यांच्या दिग्दर्शनाखाली गाण्याची संधी मिळाली.[ संदर्भ हवा ]

याच काळात ते पुण्याच्या स्वरानंद प्रतिष्ठानमध्ये दाखल झाले, आणि इ.स. १९७०पासून त्या संस्थेच्या ’आपली आवड’, ’मंतरलेल्या वैत्रबनात’ अशा कार्यक्रमांमधून सुधीर फडके, रामदास कामत, कुमार गंधर्व आदी सुप्रसिद्ध गायकांची गाणी स्वतःच्या वैशिष्ट्यांसह गाणारे गायक म्हणून सुपरिचित झाले.[ संदर्भ हवा ]

संगीतकार[संपादन]

पुढे आकाशवाणीच्या पुणे, नागपूर, मुंबई या केंद्रांवरून ते स्वरचित गाणी स्वतःच स्वरबद्ध करून गाऊ लागले. अशा रीतीने ते संगीतकार झाले. १९८०मध्ये ’पॉलिडॉर’ कंपनीने शोभा जोशी यांच्या आवाजात चार कोळीगीते ध्वनिमुद्रित करून प्रकाशित केली होती, या गीतांना गिरीश जोशी यांनीच संगीत दिले होते.[ संदर्भ हवा ]

स्वरानंद प्रतिष्ठानने १९८३मध्ये सावरकरांच्या स्मरणार्थ जयंत भिडे यांच्या गीतांचा ’नमन मृत्युंजयवीरा’ हा रंगमंचीय कार्यक्रम केला. या कार्यक्रमातील गीतांना गिरीश जोशी यांनी स्वरबद्ध केले होते. या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याही काही रचना होत्या. हाच कार्यक्रम नंतर अंदमान येथेही झाला.[ संदर्भ हवा ]

१९८५ साली मुंबई आकाशवाणीवर कवयित्री इंदिरा संत यांच्या मुलाखतीदरम्यान त्यांची पाच गीते सादर झाली. या गीतांना संगीत देण्याचे काम स्टेशन डायरेक्टर अरुण काकतकर यांनी गिरीश जोशींवर सोपवले होते. या पाच गाण्यांमुळे गिरीश जोशींचे नाव सर्वत्र झाले.[ संदर्भ हवा ]

पुढच्या काही वर्षात गिरीश जोशींनी गायिका पद्मजा फेणाणी यांनी गायिलेल्या कुसुमाग्रज आणि इंदिरा संत यांच्या कवितांना चाली दिल्या. संगीतकार यशवंत देव यांच्या षष्ठ्यब्दी निमित्त १९८६ साली झालेल्या ’तुझे गीत गाण्यासाठी’ या स्वरानंदच्या रंगमंचीय कार्यक्रमाचे संपूर्ण संगीत नियोजन गिरीश जोशी यांचे होते.[ संदर्भ हवा ]

१९९८साली झालेल्या कवी हिमांशू कुलकर्णी यांच्या ’गझलांच्या व्यथा चंदेरी’ या कार्यक्रमाला गिरीश जोशी यांनी संगीत दिले होते.[ संदर्भ हवा ]

अखिल भारतीय संगीतकार[संपादन]

गिरीश जोशी यांनी आकाशवाणी गोहत्तीवरून गझलांचा कार्यक्रम सादर केला आहे. पद्मजा फेणाणीं-जोगळेकरांचा कार्यक्रम झाला तेव्हा गिरीश जोशी नोकरीनिमित्त राजस्थानमध्ये होते. त्यांचा परिचय राजस्थानचे संगीतकार असा करून देण्यात आला होता.[ संदर्भ हवा ]

स्पंदन[संपादन]

निवृत्तीनंतर गिरीश जोशींनी ’स्पंदन’ नावाचा कार्यक्रम करायला आरंभ केला आहे. यात ते स्वतःच्या आणि अन्य कवींच्या कविता स्वरबद्ध करून स्वतःच्या व अन्य गायकांच्या आवाजात सादर करतात. यांतली अनेक गाणी सावरकर, सुरेश भट, सुधीर मोघे यांसारख्या प्रसिद्ध कवींनी रचलेली असतात.[ संदर्भ हवा ]

गिरीश जोशी यांचे संगीत असलेली काही मराठी गीते[संपादन]

  • आला किनारा आला किनारा (कवी कुसुमाग्रज, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर)
  • उंच उंच माझा झोका (कवी इंदिरा संत, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर)
  • दारा बांधता तोरण (कवी इंदिरा संत, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर)
  • पुस्तकातली खूण कराया (कवी इंदिरा संत, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर)
  • बाळ उतरे अंगणी (कवी इंदिरा संत, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर)
  • माझिया दारात चिमण्या (कवी शंकर रामाणी, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर)
  • युगामागुनी चालली रे (कवी कुसुमाग्रज, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर)
  • रक्तामध्ये ओढ मातिची (कवी इंदिरा संत, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर)
  • हासरा नाचरा जरासा (कवी कुसुमाग्रज, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर)[ संदर्भ हवा ]