गजल सादरीकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


'यात काय काय आहे'
Wikipedia-logo-mr.pngArrowrotation.gif Wikibooks-logo.svg

एखादी गोष्ट कशी करावी हे मराठी विकिबुक्स बंधू प्रकल्पाच्या परिघात मोडते, म्हणून या लेख/विभागाच्या काही किंवा सर्व मजकुर मराठी विकिबुक्स बंधू प्रकल्पात स्थानांतरीत करण्याची गरज प्रतिपादीत केली गेली आहे. विकिपिडिया प्रकल्पाचा मूख्य् उद्देश ज्ञानकोश निर्मिती व्हावी असा मर्यादीत आहे. एखादी गोष्ट कशी असते ते ज्ञानकोशाच्या परिघात येऊ शकते पण एखादी गोष्ट कशी करावी हे विकिपीडिया परिघात बसत नाही.
कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा/करा.गजल सादरीकरण : जनार्दन केशव म्हात्रे 12

भाव सादरीकरण : कोणतीही कला उत्तम रीतीने सादर झाली तर ती अधिक भावते. तूर्तास इथे आपण, कविता / गजल याविषयीच बोलू. गजलचा शेर, त्याचा काव्यार्थ, अन्वयार्थ आणि कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ हा उत्तम रीतीने रसिकांपर्यंत पोहचला पाहिजे, ही सादरीकरणाची महत्त्वाची मागणी असते. कवीला एखादे काव्य तेव्हाच सुचते, जेव्हा त्याने अनुभवाच्या पातळीवर जाऊन त्या भावनेचे अवलोकन केलेले असते. त्याचे हे अवलोकन रसिकांपर्यंत पोहचवण्याची, रसिकांना त्या अनुभवात सामील करून घेण्याची महत्त्वाची भूमिका सादरीकरणातून पार पडते. यासाठीच काव्याच्या शब्दांइतकाच गुणात्मक दर्जा हा सादरीकरणाचा असला पाहिजे.

सादरीकरण आणि त्याच्या मर्यादा : आपण लिहिलेले काव्य आपण सादर करत असताना त्याचा भाव रसिकांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, ही जाणीव आधी जन्माला येणे गरजेचे असते. आपण काव्य लिहिले आहे आणि ते आता लोकांना ऐकवायचे आहे... ही आनंदाच्या, उत्साहाच्या भरातील भावना अनेकदा सादारीकरणाच्या आड येते. आणि आपण काव्याऐवजी स्वतःच्या प्रेमात अडकतो. आणि काव्य सादर होण्यापेक्षा आपण स्वतःला किती सादर करतो आहोत, असा उलटा विचार सुरू होतो. यावेळी उत्तम काव्य आणि उत्तम सादरीकरण हेच आपल्याला उत्तम रीतीने लोकांच्या मनापर्यंत पोहचवत असते. आपण महत्त्वाचे होण्यापेक्षा आपले काव्य महत्त्वाचे झाले पाहिजे. आपण आपल्या काव्याच्या, काव्यप्रकाराच्या, शब्दाच्या, आकृतीबंधाच्या, यमकाच्या अशा काव्यांगांच्या प्रेमात पडण्यापेक्षा त्या काव्यातील भावार्थाच्या प्रेमात पडलो, तर सादरीकरणाची पहिली पायरी आपण यशस्वी रीत्या सर करतो.

सादरीकरण आणि त्याचे प्रकार : प्रत्येक कलेच्या सादरीकरणाचासुद्धा निश्चित एक अभ्यास असतो. कलेइतकाच सादरीकरणाचा सुद्धा अभ्यास पक्का असलाच पाहिजे. आपले काव्य आपण जेव्हा सादर करतो त्यावेळी आपण आपल्याला ते काव्य सुचण्याच्या वेळेशी जोडले पाहिजे. तरच त्या काव्यार्थाच्या जाणीवेला पुन्हा ओलावा मिळेल, आणि सादरीकरणात पुख्तेपणा येईल. तेव्हाच आपण भाव जसाच्या तसा सादर करू शकू. आपल्याला सुचताना जसे काव्य संवादते, ते जसेच्या तसे प्रत्येक सादरीकरणातसुद्धा संवादले पाहिजे.

काव्य जर इतर कुणी सादर करणार असेल तर ... काव्य जर इतर कुणी सादर करणार असेल तर त्या सादरकर्त्याने ते काव्य त्यातील भाव समजून घेऊनच ते सादर केले पाहिजे. आणि हे करीत असताना त्याला कवितेचा आणि तो सादर करीत असलेल्या काव्यप्रकाराचा पूर्ण अभ्यास असणेही तितकेच गरजेचे आहे. उदा. अभंग सादर करण्यासाठी त्याच्या ६ ! ६ ! ६ ! ४ या वजनाचा अभ्यास आणि अभंगात विषद केलेला मतितार्थ यांचे सखोल ज्ञान असलेच पाहिजे. गजल जर एखादा गजलकार सादर करत असेल तर तो त्यातील भावार्थाच्या अधिक जवळ जातो. पण तेच इतर कुणी सादर करीत असेल तर मात्र ना तो काव्यप्रकार नीट सादर होत, ना काव्य, ना काव्यार्थ, ना भावार्थ... हेच इतर काव्य प्रकाराच्या बाबतीत लागू होते.

गजल आणि गजलगायक : गजल गायकाला शास्त्रीय संगीताच्या संपूर्ण आकलनासोबतच गजलचा आकृतीबंध, काफिया, रदीफ, वृत्त, लगावली, छंदाच्या मात्रा, यती या आणि गजलेसाठी आवश्यक इतर सर्व बाबींचे सखोल ज्ञान असणे गरजेचे नव्हे तर सक्तीचे आहे. तर तर आणि तरच तो गायक / संगीतकार गजलला पूर्ण न्याय देऊ शकतो. गायनासाठी निवडलेल्या गजलचे जे वृत्त आहे, त्याच्या मात्रांना अनुलक्षुनच सुयोग्य अशा तालाची निवड झाली पाहिजे, तरच मात्रांची सांगड घालता येईल. (तालासाठी शब्दांची ओढाताण किंवा शेरातील एखादे अक्षर आवर्तनात बसत नाही म्हणून ते गाळायचे किंवा तालाची मागणी मात्रापूर्तीसाठी भरतीचे अक्षर घुसावायाचे असे प्रकार मी स्वतः पाहिले आहेत.) सांगायचा मुद्दा असा की, स्वरांनी, तालाने शब्दांना सोबत घेऊनच चालले पाहिजे. आणि अलवारते भाव रसिकांच्या हृदयात पोहचला पाहिजे. भावना संवादलीच पाहिजे.

तरन्नूम गजलकाराने आपलीच रचना सुरेल पद्धतीने कोणत्याही संगीतवाद्याच्या साथीशिवाय सादर करणे याला तरन्नूम संबोधले जाते. इथेसुद्धा त्या तरन्नुममधून गजलकाराला किती छान गाता येतेय यापेक्षा त्या गायनातून भाव किती चपखल पोहचतोय, हेच अधिक महत्त्वाचे असते. तरन्नुम सादर करण्यासाठी गजलकाराला संगीताचे जुजबी का होईना ज्ञान असणे गरजेचे आहे. आणि सुरांची जान असण्यासोबत गळ्यात सूर असणे नितांत गरजेचे आहे. असे होत नसेल तर गजलकाराने कोणत्याही मोहाला बळी न पडता, गाण्याच्या फंदात पडूच नये. काव्यार्थ जर सशक्त असेल तर तो पोहचवण्यासाठी गाण्याची गरज पडतेच असे मुळीच नाही. आणि एखादी रचना तशी अपेक्षा करत असेल तर त्यासाठी एखाद्या जाणकार आणि गजलचा अभ्यास असणाऱ्या गायक / संगीतकाराला ती रचना द्यावी. तो नक्कीच त्या रचनेचे सोने करेल.

कवितेसाठी आपण प्रयोजलेले शब्द, काव्यप्रकार, सजावटी, आणि संगीतकाराने निवडलेले सूर, ताल राग, लय यापैकी कुणीही भावार्थाशी तडजोड करत असेल तर मग ती कला नसून कलेचा पुतळा ठरेल. आणि भाव जर १०० टक्के खरा उतरत असेल तर कोणतीही कला संजीवन बनेल.

- जनार्दन केशव म्हात्रे