खासाब
| ह्याचा भाग | मुसामदाम गव्हर्नोरेट |
|---|---|
| अधिकृत नाव | خصب |
| देश | ओमान |
| Capital of | मुसामदाम गव्हर्नोरेट |
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | मुसामदाम गव्हर्नोरेट |
| प्रमाणवेळ | यूटीसी+०४:०० |
| भौगोलिक गुणक | २६°११′०″N ५६°१५′०″E |

खासाब (अरबी:خَصَب) हे ओमानच्या मुसंदम प्रशासकीय विभागाची राजधानी आहे. हे शहर मुसंदम द्वीपकल्पाच्या टोकावर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीपाशी असून ओमानचा हा विलग भाग (एक्स्लेव्ह) संयुक्त अरब अमिरातीला लागून आहे. येथे नॉर्वेतील फ्योर्डसारखी खडकाळ खाडीमुखे आणि ओसाड पर्वतरांगा मोठ्या प्रमाणावर असल्याने खासाबला "अरबस्तानचे नॉर्वे" असे म्हणले जाते.[१][२][३][४]

हे शहर पश्चिम हजर पर्वतरांगांच्या उत्तरेकडील डोंगरांनी वेढलेले आहे.[५] खासाबमध्ये सुसज्ज रुग्णालय आणि अनेक हॉटेल्स, समुद्रकिनारे व उद्याने आहेत. शहराच्या लोकसंख्येत ओमानच्या मुख्य भूभागातून आलेल्या वांशिक ओमानी लोकांचे प्राबल्य आहे. शहरात खासाब किल्ला नावाचा एक ऐतिहासिक किल्ला देखील आहे. खासाबच्या बंदरात पर्यटकांना नैसर्गिक खाडीमुखे आणि पर्वतीय निसर्ग दाखवण्यासाठी नेणाऱ्या धो नावाच्या लाकडी नौका मोठ्या संख्येने दिसतात.
खासाब-तिबात रस्ता (ए१३) अमिरातीतील ई११ महामार्गाला जोडलेला असल्याने संयुक्त अरब अमिरातीमधील रहिवाशांसाठी हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या शहरात सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या आधुनिक फेरी सेवेने देखील पोहोचता येते.[६]
इतिहास
[संपादन]पोर्तुगीजांनी १६ व्या शतकाच्या सुरुवातीला खासाबवर ताबा मिळवला.[७] पुढे १७ व्या शतकाच्या सुरुवातीला या प्रदेशातील त्यांचे नौदल सामर्थ्याच्या शिखरावर असताना त्यांनी शहराच्या संरक्षणासाठी येथे एक किल्ला बांधला. येथील नैसर्गिक बंदरामुळे खवळलेल्या समुद्रापासून जहाजांना संरक्षण मिळत असे. संरक्षणाच्या उद्देशाने उंचावर बांधल्या जाणाऱ्या इतर अनेक किल्ल्यांच्या तुलनेत खासाब किल्ला हा प्रामुख्याने सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या पोर्तुगीज जहाजांना पाणी आणि खजुराचा पुरवठा करण्यासाठी एका केंद्राच्या स्वरूपात तयार करण्यात आला होता. खासाब शहराचे पुरापासून संरक्षण करण्यासाठी विसाव्या शतकात तीन मोठी धरणे बांधण्यात आली आहेत.[८]
अर्थव्यवस्था
[संपादन]विसाव्या शतकात किनारी रस्ता तयार होईपर्यंत या प्रदेशात जमिनीवरून पोहोचणे जवळजवळ अशक्य होते. या रस्त्यामुळे आता संयुक्त अरब अमिरातीतून पोहोचता येते. यामुळे अमिरातीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी खासाब हे वीकांताच्या सुट्टीचे एक लोकप्रिय ठिकाण झाले आहे. या नवीन रस्त्यामुळे तवी गावापर्यंत जाणेही सोपे झाले आहे. येथे खडकांवर असलेली जहाजे, प्राणी आणि योद्ध्यांची प्रागैतिहासिक चित्रे दिसून येतात.[८] खासाबमध्ये इराणी मालाची आणि स्थानिक मातीच्या भांड्यांची अनेक आधुनिक खरेदी केंद्रे आहेत. तसेच खासाब हॉटेल, अताना मुसंदन रिसॉर्ट आणि इराणच्या आखाताभिमुख असलेले आणि एका कड्यावर बांधलेले अताना खासाब हॉटेल यांसारखी काही हॉटेले येथे आहेत.[१]
इराणपासून जवळ असलेल्या खासाबची अर्थव्यवस्था वैशिष्ट्यपूर्ण आहे. इराणी लोक खासाब बंदरात शेळ्या आणि मेंढ्यांची घेउन येतात. तेथून ही जनावरे ट्रकद्वारे संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाला पाठवली जातात. इराणला परतताना हे खलाशी आपल्या बोटींमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अमेरिकी सिगारेट भरतात. ओमानच्या आवासन कायद्यांचे पालन करण्यासाठी ते सूर्योदयानंतर खासाबमध्ये येतात आणि सूर्यास्तापूर्वी निघून जातात. हा व्यापार इराणी कायद्यानुसार बेकायदेशीर असल्याने त्यांना इराणच्या तटरक्षक दलापासून आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील गजबजलेल्या जलमार्गातील इतर जहाजांपासून स्वतःचा बचाव करावा लागतो. पशुधन किंवा खोक्यांनी खच्चून भरलेल्या या लहान बोटींना दररोज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या शेकडो तेलवाहू टँकरचा मार्ग टाळून प्रवास करावा लागतो.[८] अलीकडच्या काळात अमेरिकेने इराणवरील निर्बंध कडक केल्यामुळे खासाबमार्गे होणाऱ्या तस्करीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.[९]
पर्यटन
[संपादन]
खासाबमधील धो नौका पर्यटकांना मुसंदमच्या परिसरातील डॉल्फिन दाखवण्यासाठी, तसेच फ्योर्ड आणि टेलिग्राफ बेटाला भेट देण्यासाठी घेऊन जातात. १८६५ ते १८६८ या काळात टेलिग्राफ बेट हे बहारिन आणि मुंबई दरम्यानच्या तारविभागावरील कर्मचारी नियुक्त असलेले एक रिपीटर स्टेशन होते. सध्या या बेटाचा पुनर्विकास केला जात आहे.

खासाबमध्ये जगातील सर्वात लांब पाण्यावरून जाणारी झिप लाइन आहे. १.८ किमी लांबीच्या या झिप लाइनवर वेग ताशी ८० किमी पर्यंत पोहोचू शकतो.[१०][११]
चित्रदालन
[संपादन]- खासाबचे दृश्य
- खासाब डोंगराळ मार्गावरून दिसणारे पर्शियन आखात
- खासाब ते रस अल खैमा मार्गावरील एक दृश्य
- खासाबमधील एका समुद्रकिनाऱ्याचे दृश्य
- खासाब किनारी रस्त्याचे चित्र
- खासाबचे विहंगम दृश्य
- खासाबच्या समुद्रात आढळणारा इंडो-पॅसिफिक हम्पबॅक्ड डॉल्फिन
- खासाब बंदर; दर्शनी भागात अताना खासाब हॉटेल आणि ओव्हर-वॉटर झिपलाइनचे स्टेशन दिसत आहे
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- 1 2 Karim, Rose Yasmin (February 21, 2009), "Fjords & flippers", The Star, 2009-02-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित, November 11, 2009 रोजी पाहिले
- ↑ Khasab, ओमान एर, 2009-08-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित, नोव्हेंबर ११, २००९ रोजी पाहिले
- ↑ Musandam is a glimpse of the real Arabia, ट्रॅव्हल वीकली, सप्टेंबर २८, २००६, जानेवारी २५, २०१० रोजी मूळ पान पासून संग्रहित, नोव्हेंबर ११, २००९ रोजी पाहिले
- ↑ A Mountain Of Thirst, आउटलुक, फेब्रुवारी २, २००४, 2006-02-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित, नोव्हेंबर ११, २००९ रोजी पाहिले
- ↑ Lancaster, Fidelity; Lancaster, William (2011). Honour is in Contentment: Life Before Oil in Ras Al-Khaimah (UAE) and Some Neighbouring Regions. बर्लिन, न्यू यॉर्क: वॉल्टर डी ग्रुयटर. pp. 3–598. ISBN 978-3-1102-2339-2. 2021-01-04 रोजी मूळ पानापासून संग्रहित. २०१९-०१-२६ रोजी पाहिले.
- ↑ "Fleet". नॅशनल फेरीज कंपनी. ११ जुलै २०१९ रोजी पाहिले.
- ↑ "Portuguese era". 2026-04-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2026-04-09 रोजी पाहिले.
- 1 2 3 Wells, Rhona (फेब्रुवारी १, २००४), The Norway of Arabia, The Middle East, जून २५, २०१६ रोजी मूळ पानापासून संग्रहित, नोव्हेंबर ११, २००९ रोजी पाहिले
- ↑ Al Shaibany, Saleb (November 1, 2009). "US sanctions help Omani fishermen survive as smugglers". The National. June 6, 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. November 11, 2009 रोजी पाहिले.
- ↑ "Longest zip wire over water". Guinness World Records. 17 December 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Khasab: Oman Opens Its Longest Zip Line In Khasab To Public". GulfBuzz. 17 December 2024 रोजी पाहिले.