Jump to content

खाजकुयली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खाजकुयलीचे झाड

तीव्र कंड उत्पन्न करणारी म्हणून सर्वसाधारणपणे परिचित असलेली खाजकुयली/खाजकुयरी वास्तविक खूप उत्तम शक्तिवर्धक वनस्पती आहे. खाजकुयली/खाजकुयरीला कपिकच्छू पण म्हणतात. कपिकच्छू हे नाव अंगाला शेंगेचा स्पर्श झाल्यास मनुष्य माकडाप्रमाणे खाजवत राहतो या अर्थाने आलेले आहे. याखेरीज याला क्रौंच, कवच, आत्मगुप्ता, वानरी, दुःस्पर्शा, स्वयंगुप्ता, गुप्ता, रोमवल्ली, बृंहणी वगैरे पर्यायी नावे आहेत. मराठीत हिला खाजकुयली म्हणतात. हिचे लॅटिन नाव मुकुना प्रूरिएन्स Mucuna pruriens असे आहे.

क्रौंच/कवच बिजांचा वापर वाजीकरण म्हणून केला जाऊ शकतो, तसेच यकृत आणि प्लिहेच्या रोगांवर प्रभावी ठरणारी शरपुंखा हीसुद्धा एक विशेष वनस्पती आहे.

शक्‍तिवर्धक द्रव्यांपैकी एक सहज उपलब्ध द्रव्य म्हणजे कपिकच्छू. हिची वेल असते व पानांवर बारीक लव असते. कपिकच्छूची शेंग ६ ते ७ सेंमी. लांब असून खालच्या टोकाला थोडीशी वाकलेली असते. शेंगेवर बारीक पण दाट कुसळ असते. हे कुसळ अंगाला लागल्यास तीव्र कंड, आग व सूज उत्पन्न होते. प्रत्येक शेंगेत पाच ते सहा चपट्या बिया असतात. कपिकच्छूची वेल पावसाळ्यात उगवते. शरद-हेमंतात फुले-फळे येतात. कपिकच्छू संपूर्ण भारतात, उष्ण प्रदेशात अधिक होते. औषधात कपिकच्छूच्या बिया, तसेच मूळ वापरले जाते. कपिकच्छूच्या बियांना कवचबीज म्हटले जाते.

कवचबीज चवीला मधुर, थोडेसे कडू, विपाकाने मधुर व गुणाने गुरू असते. तिन्ही दोषांना संतुलित करते. शुक्रधातूची शक्‍ती वाढवते. वाजीकर म्हणून बियांचा वापर केला जातो.

कवचबीज हे एक उत्तम पौष्टिक द्रव्य आहे. विशेषतः मांसधातू, शुक्रधातूची ताकद वाढवण्यासाठी कवचबीजापासून बनविलेला कल्प उपयुक्‍त असतो.

कपिकच्छूच्या मुळाचा काढा वातविकारांसाठी, विशेषतः अर्धांगवात, अर्दित (चेहऱ्यावरचा लकवा) वगैरे व्याधींवर उत्तम उपयुक्‍त असतो.

कपिकच्छूचे मूळ लघवी साफ होण्यासाठी वापरले जाते. शुक्रधातू अशक्‍त झाल्याने डोके दुखणे, डोळे दुखणे, चक्कर येणे, थकवा जाणवणे वगैरे अनेक त्रास होतात. अशा वेळी कवचबीजाचे चूर्ण दूध-साखरेबरोबर घेतल्यास त्याचा चांगला उपयोग होतो.

शुक्रक्षयामुळे शरीर सुकत चालले असेल, तर कवचबीजसिद्ध धृत घेण्याचा उपयोग होतो.

कवचबीजामुळे स्तन्यवर्धन होण्यासही मदत मिळते.

कपिकच्छूच्या मुळाच्या काढ्याने योनिधावन केले असता, तसेच काढ्यात भिजवलेला पिचू योनिमार्गात ठेवला असता योनीचे शिथिलत्व कमी व्हायला मदत होते.

शेंगेवरील कुसळ जंतावरचे उत्तम औषध समजले जाते.

"गोक्षुरादि चूर्ण', "संतुलन चूर्ण', "चैतन्य कल्प' वगैरे औषधांमध्ये कवचबीजाचा समावेश असतो.

पर्यावरणातील स्थान:

ही वनस्पती कॉमन सेलर किंवा भटक्या तांडेल (Neptis hylas) ह्या फुलपाखरांची भक्ष्य वनस्पती आहे.[१]

  1. ^ "Mucuna pruriens | Butterfly". www.ifoundbutterflies.org. 2022-12-11 रोजी पाहिले.