खंडेराव भिकाजी बेलसरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खंडेराव भिकाजी बेलसरे तथा खं.भि. बेलसरे (इ.स. १८६२ - इ.स. १९१४; पुणे, ब्रिटिश भारत) हे विल्यम शेक्सपियरच्या नाटकांचे अभ्यासक व भाषांतरकर्ते, लेखक आणि संपादक होते. त्यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत झाले होते. मुंबईतील प्रभाकर या वर्तमानपत्राचे आणि त्याच नावाच्या छापखान्याचे ते मालक होते. याशिवाय, काही काळ ते इंदुप्रकाश या वृत्तपत्राच्या संपादक मंडळावरही होते.

शेक्सपियरकृत नाट्यमाला या संकल्पित संकल्पाद्वारे विल्यम शेक्सपियरची सर्व नाटके, सुनिते व अन्यकाव्ये, त्याचे चरित्र व आख्यायिका आणि नाटककार या नात्याने केलेल्या शेक्सपियरच्या कामगिरीचे विवेचन इत्यादी माहितीचे चाळीस खंड प्रकाशित करण्याचा त्यांचा इरादा होता, पण तो त्यांच्या मृत्यूमुळे अपुरा राहिला. तरी त्यांची शेक्सपियरच्या सहा नाटकांची मराठी रूपांतरे, मूळ कथानकासह व त्यावरील गुणदोषविवेचक टीकेसकट प्रसिद्ध झाली आहेत.

लेखन[संपादन]

तीन गोष्टी (इ.स.१८९०) या त्यांच्या पहिल्या पुस्तकात काही कौटुंबिक आणि बोधरंजनात्मक लघुकथा आहेत. निबंधकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या चरित्राचे व लेखांचे साधारण स्वरूप (इ.स.१८९१) हे त्यांचे स्वतंत्र पुस्तक आहे. शालापत्रक या मासिकातून आणि केसरी या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या चिपळूणकरांचे लेखसंग्रह असलेल्या एका पुस्तकाचे दोन भाग बेलसरे यांनी संपादित केले आहेत.

प्रकाशित ग्रंथ[संपादन]

  • उद्यावरची गोष्ट (इ.स. १८९८) - एका इंग्रजी ग्रंथाचे मराठी भाषांतर
  • चिकित्साब्धी (इ.स. १९०२) - मणिशंकर गोविंदजींच्या आयुर्वेदावरील एका गुजराती ग्रंथाचे मराठी भाषांतर
  • ज्युलियस सीझर (इ.स. १९१३) - शेक्सपियरच्या ज्युलियस सीझर या नाटकाचे मराठी रूपांतर
  • तुफान (इ.स. १९०४) - शेक्सपियरच्या टेंपेस्ट या नाटकाचे मराठी रूपांतर
  • तीन गोष्टी (इ.स. १८९०) - कथासंग्रह
  • निबंधकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या चरित्राचे व लेखांचे साधारण स्वरूप (इ.स. १८९१) - निबंधात्मक
  • पंचम हेनरी चरित (इ.स. १९११) - शेक्सपियरच्या हेन्‍री फिफ्थ या नाटकाचे मराठी रूपांतर
  • प्रेमाचा कळस (इ.स. १९०८) - शेक्सपियरच्या रोमियो ज्युलिएट या नाटकाचे मराठी रूपांतर
  • मधुयामिनी स्वप्नदर्शन (इ.स. १९१३) - शेक्सपियरच्या मिडसमर नाइट्‌स या नाटकाचे मराठी रूपांतर
  • मुक्ता (इ.स. १८९७) - मणिशंकर गोविंदजी यांच्या एका गुजराती अद्‌भुत्‌कथेचे मराठी भाषांतर
  • व्हेनिसनगरचा व्यापारी (इ.स. १९१०) - शेक्सपियरच्या मर्चंट ऑफ व्हेनिस या नाटकाचे मराठी रूपांतर
  • शालोपयोगी इंग्रजी-मराठी शब्दकोश (इ.स. १९०४).