कन्फ्यूशियस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कॉन्फ्युशिअस या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
कॉन्फुशियसचे चित्र

कॉन्फ्युशिअस (चीनी: 孔子; पिन्यिन: Kǒng zǐ; Wade-Giles: K'ung-tzu, or Chinese: 孔夫子; पिन्यिन: Kǒng Fūzǐ; Wade-Giles: K'ung-fu-tzu), अर्थ. "गुरू कॉंग,"(परंपरागत जन्मदिन :सप्टेंबर २८,५५१ इ.स.पुर्व मृत्यु -४७९ इ.स.पुर्व. ) हे एक प्राचीन चिनी विचारवंत आणि सामाजिक तत्त्ववेत्ते होते. चीनी, जपानी, कोरियनव्हिएतनामी लोकांच्या विचारसरणीवर व जीवनावर त्यांच्या शिकवणीचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रभाव दिसुन येतो.

कन्फ्युशियस हा चिनी विचारवंत होता. जगातील थोर विचारवंतांत गणना होणारा हा इ.स.पूर्व पाचव्या शतकात झाल्याचा अंदाज आहे. हा आपल्या वडिलांचे बारावे अपत्य होता. वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यावर कन्फ्युशियस गरिबीत वाढला. त्याला व्यायामाची तशीच तेवढीच काव्य अन्‌ संगीताची आवड होती. त्याने वेगाने पुष्कळ ज्ञान मिळवले. तो पंधरा वर्षांचा असतानाच त्याचे गुरुजन सांगू लागले, की आता याला देण्यासारखे आमच्याकडे काही उरलेले नाही.

पुढे दोन वर्षांनी त्याने शिक्षण थांबवून आईला घर चालविण्यासाठी मदत केली. तो आपल्या राज्यातील शेती खात्यात कारकून झाला. एकोणीस वर्षांचा असताना त्याचे लग्न झाले आणि एक वर्षानंतर त्यास मुलगा झाला. चोविसाव्या वर्षी आईचा मृत्यू झाल्यावर चीनमधील त्याकाळच्या प्रथेप्रमाणे त्याने मातृशोक म्हणून अडीच वर्षे नोकरी सोडली.

तोपर्यंत त्याची कीर्ती अतिबुद्धिमान म्हणून सर्वत्र झाली होती. मित्रांच्या आग्रहाने तो फिरता आचार्य झाला. त्याचे विचार ऐकायला लोक जमत. प्रश्नोत्तरे चालत. या ज्ञानदानाबद्दल तो श्रीमंतांकडून गुरुदक्षिणा घेत असे तसेच गरिबांनी दिलेली किरकोळ दक्षिणाही स्वीकारीत असे.

कन्फ्युशियस हा धर्म चीनमधील ताओ धर्माच्या समकालीन. त्याला मानणारा वर्ग आजही मोठ्या संख्येने आहे. त्याचे संस्थापक कुंग फू सू होते. त्यांना कन्फ्युशियस नावाने ओळखले जात होते. त्यांचा जन्म 551 इ.स. पूर्व चीनमध्ये झाला होता. लहानपणापासूनच त्यांना ज्ञानाची लालसा होती. ताओवादाचे संस्थापक लाओत्से यांना भेटल्यानंतर ते धर्माकडे ओढले गेले. ते आपल्या मेहनतीने राज्याच्या मॅजिस्ट्रेट पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या शासनप्रणालीबद्दल ईर्षा असणा-या अन्य लोकांनी त्यांना षड्यंत्र रचून इ.स. पूर्व 496मध्ये काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांची अवस्था फारच दयनीय झाली आणि इ.स. पूर्व 478 मध्ये मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचे महत्त्व पटले आणि त्यांना देवतासमान मानू लागले. त्यांची उपदेशात्मक सूची संग्रहित करण्यात आली. खरे म्हणजे कन्फ्युशियसने कोणताच धर्म स्थापन केला नाही, तर मानव जीवनाला सदाचार आणि नीतिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या उपदेशात दर्शन, समाज आणि राजकीय सर्वकल्याणकारी भावना आहेत.