कै. ज्ञा.म. नारकर वाचनालय
कै.ज्ञा.म.नारकर वाचनालय हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पाचल गावी आहे.
संकल्पना
[संपादन]सन १९४२ च्या आसपास अनेक स्वातंत्र्य सैनिक पाचल पंचक्रोशीत होते. महात्मा गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील स्वातंत्र्य सैनिक गोपाळआबा नारकर ह्यांनी पाचल विकास आराखडा तयार केला. प्रत्येक भागात बालवाडी, शाळा,आणि प्रत्येक गावात हायस्कूल, सेवा सोसायटी व वाचनालय निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठरवले. त्यावेळचे पाचल गावाचे सरपंच रघुनाथ रेडीज ह्यांनी गावातील लोकांच्या मदतीने ग्राम वाचनालय चालू केले.१४ एप्रिल १९७६ रोजी ज्ञा.म.नारकर वाचनालय म्हणून त्याची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केली गेली.
प्रगती
[संपादन]पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर येथे शिक्षक म्हणून रुजू झालेले आणि त्याच शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेल्या मोहन साखळकर ह्यांनी हे वाचनालय पाच दशके व्यवस्थित सांभाळले व त्याचा फायदा गावातील विद्यार्थी, शिक्षक, सर्वसामान्य नागरिकांना भरपूर झाला. त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फार उपयोग झाला आणि अनेक विद्यार्थी पुढे चांगले शिक्षण घेऊन चागल्या व्यवसायात स्थिर झाले. महाराष्ट्र सरकारचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट वाचनालय पुरस्कार ह्या वाचनालयाला मिळाला.रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचा उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार ग्रंथपाल विठोबा चव्हाण ह्यांना मिळाला.
सुवर्ण महोत्सव
[संपादन]ह्यावर्षी वाचनालय पन्नासाव्या वर्षात पदार्पण करीत आहे.अशी फारच कमी वाचनालये असतील की ती आपला सुवर्णमहोत्सव साजरा करीत असतील. गावातील नागरिकांचा सक्रीय सहभाग असणे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.येथील लोक शेती, बागायती तसेच व्यापार ह्या व्यवसायात व्यग्र असतानासुद्धा सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहेत. इथे नाटक, लोककला,कुस्तीफड इत्यादी अनेक कार्यक्रम आयोजित होत असतात. इथल्या वाचन संस्कृतीची जोपासना येथील कै.ज्ञा.म.नारकर वाचनालय गेली पन्नास वर्षे करीत आहे.[१]
- ^ महाराष्ट्र टाईम्स, मंगळवार १८ मार्च २०२५