कॅथरीन दे मेदिची
कॅथरीन दे मेदिची (इटालियन: कॅतेरिना दे मेदिची; फ्रेंच: कॅथरीन दि मेदिसिस; १३ एप्रिल, १५१९ - ५ जानेवारी, १५८९) ही फ्रांसचा राजा दुसऱ्या हेन्रीची पत्नी आणि त्याद्वारे १५४७ ते १५५९ दरम्यान फ्रांसची राणी होती. ही फिरेंझेच्या मेदिचे घराण्यातील [a] असून तिची तीन मुले फ्रांसचे राजे झाले. कॅथरीन दुसरा फ्रांस्वा, नववा शार्ल, आणि तिसरा हेन्री यांची आई तसेच आणि पोप क्लेमेंट सातवा यांची चुलतबहीण होती. तिच्या मुलांच्या सत्ताकालाला कॅथरीन दे मेदिचीचा काळ म्हटले जाते कारण तिचा फ्रांसच्या राजकीय जीवनावर व्यापक प्रभाव होता.
कॅथरीनचा जन्म फिरेंझेमध्ये उर्बिनोचा ड्यूक लॉरेंझो दि पिएरो दे मेदिचीआणि मॅडेलीन दि ला तूर दॉव्हर्न्ये यांच्या पोटी झाला. १५५३ साली वयाच्या १४ व्या वर्षी कॅथरीनचे लग्न फ्रांसचा राजा पहिल्या फ्रांस्वाचा दुसरा मुलगा हेन्रीशी झाले. कॅथरीनचे लग्न तिच्या चुलतभाऊ असलेल्या पोप क्लेमेंटने ठरवले होते. पुढे जाता हेन्री राजा झाल्यावर त्याने कॅथरीनला राज्य कारभारातून लांब ठेवले. हेन्रीची उपपत्नी डायेन दि प्वॉतियेशी तो मसलत करीत असे. १५५९ मध्ये झालेल्या हेन्रीच्या अचानक अपघाती मृत्यूमुळे कॅथरीन १५ वर्षांच्या नाजुक तब्येतीच्या दुसऱ्या फ्रांस्वाची आई म्हणून राजकारणात आली. दोन वर्षांत फ्रांस्वाचा मृत्यू झाल्यावर तिचा १० वर्षांचा दुसरा मुलगा नववा चार्ल्स नावाने राजा झाला व कॅथरीन मुलाच्या वतीने कारभार चालवू लागली. यानंतर कॅथरीनने दरबाराव पकड मिळवली. पुढे १५७४ मध्ये चार्ल्सच्या मृत्यूनंतर कॅथरीनचा तिचा तिसरा मुलगा हेन्री तिसरा राजा झाला. याच्या कारकिर्दीत कॅथरीनला मोठे महत्त्व होते. त्याने तिच्या आयुष्याच्या शेवटच्या काही महिन्यांतच तिचा सल्ला नाकारला पण कॅथरीन नंतर सातच महिन्यांत त्याचाही मृत्यू झाला.
अनेक इतिहासकार कॅथरीनला १६ व्या शतकातील युरोपमधील सर्वात महत्वाची महिला समजतात.
जन्म आणि बालपण
[संपादन]
कॅथरीनचा जन्म कॅतेरिना मरिया रोमुला दे मेदिची म्हणून १३ एप्रिल १५१९ रोजी फिरेंझे येथे झाला. ही आपल्या आईवडिलांचे एकुलती एक अपत्य होती. फ्रान्सचा राजा फ्रांस्वा पहिला आणि पवित्र रोमन सम्राट मॅक्सिमिलियन विरुद्ध लोरेन्झोचे काका पोप लिओ दहावे यांच्यातील युतीचा भाग म्हणून तिच्या आईवडिलांचे लग्न एका वर्षापूर्वी अँबोइस येथे झाले होते. कॅथरीनचा जन्म झाल्यावर तिच्या आई वडिलांना मुलगा झाल्याइतका आनंद झाला होता.
कॅथरीनच्या जन्माच्या एका महिन्याच्या आतचे तिचे आई-वडील दोन्ही पालक मरण पावले. आई मॅडेलिन २८ एप्रिल रोजी प्रसूती तापाने मरण पावली आणि लोरेन्झो ४ मे रोजी मरण पावला. फ्रांस्वाने कॅथरीनला फ्रेंच दरबारात मोठे करायचे होते परंतु पोप लिओ दहाव्याने याला नकार दिला, लिओला कॅथरीनचे लग्न इप्पोलितो दे मेदिचीशी करून द्यायचे होते. लिओने कॅथरीनला उर्बिनोची डचेस बनवले परंतु उर्बिनोच्या डचीचा बहुतेक भाग पोपच्या राज्यांना जोडून घेतला आणि फिरेंझेला फक्त सान लिओचा किल्ला ठेवण्याची परवानगी दिली. १५२१ मध्ये लिओच्या मृत्यूनंतर त्याच्या उत्तराधिकारी एड्रियन सहाव्याने उर्बिनोची डचीला फ्रांसिस्को मरिया पहिला देल्ला रोव्हेरे याला परत केली.
सुरुवातीला कॅथरीनचे संगोपन तिच्या आजी आल्फोन्सिना ओर्सिनीने केले. १५२० मध्ये आल्फोन्सिनाच्या मृत्यूनंतर कॅथरीनला तिची आत्या क्लॅरिचे दे मेदिचीने आपल्या मुलांबरोबर सांभाळले.. १५२१ मध्ये पोप लिओच्या मृत्यूनंतर १५२३ मध्ये कार्डिनल जुलियो दे मेदिची पोप क्लेमेंट सातवा म्हणून निवडून येईपर्यंत मेदिचींच्या सत्तेत काही काळासाठी खंड पडला तेव्हा क्लेमेंटने कॅथरीनला फिरेंझेमधील पालाझ्झो मेदिची रिकार्दीमध्ये ठेवले. तिच्या वतीने केलेल्या उर्बिनोच्या डचीवरील दाव्यामुळे फिरेंझेमध्ये तिला डचेसिना ("छोटी डचेस") म्हणत.
फिरेंझेवर यावेळी सिल्व्हियो पासेरिनी पोप क्लेमेंटच्या नावाने राजवट चालवित होता. तेथील एका गटाने १५२७मध्ये ही सत्ता उलथवून टाकली आणि अनेक मेदिचींबरोबर कॅथरीनलाही ओलीस धरण्यात आले. पालाझ्झो रिकार्दीमधून तिला एकामागोमाग अनेक कॉन्व्हेंट हलविण्यात आले. यांमध्ये सांतिस्सिमा आनुंझियाता देलेल मुराते येथे ही शेवटी तीन वर्षे होती. हा काळ तिच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात आनंदी काळ असल्याचे मानले जाते. ऑस्ट्रियाच्या चार्ल्सने पोप क्लेमेंटला पुन्हा फिरेंझेवर सत्ता काबीज करण्यास मदत करण्याची खात्री दिल्याबद्दल क्लेमेंटने चार्ल्सचा पवित्र रोमन सम्राट म्हणून राज्याभिषेक केला. ऑक्टोबर १५२९ मध्ये, चार्ल्सच्या सैन्याने फिरेंझेला वेढा घातला. या दरम्यान वेढा न उठवल्यास १० वर्षांच्या कॅथरीनला मारण्याची, नग्न करून शहराच्या भिंतींना साखळदंडाने बांधण्याची धमकी घातली गेली. फिरेंझेच्या सत्ताधाऱ्यांपैकी काहींनी तर तिला बलात्कार करण्यासाठी सैन्याच्या स्वाधीन करण्याची सूचनाही केली. अखेर १२ ऑगस्ट १५३० रोजी फिरेंझेने चार्ल्ससमोर शरणागती पत्करली. क्लेमेंटने कॅथरीनला तिच्या प्रिय कॉन्व्हेंटमधून रोममध्ये बोलावून घेतले आणि तिचे डोळ्यात अश्रूंसह स्वागत केले. मग लगेचच तो तिचे लग्न ठरविण्याच्या कामाला लागला.
लग्न
[संपादन]रोममध्ये आलेल्या व्हेनिसच्या राजदूताने कॅथरीनचे वर्णन उंचीने लहान, पातळ आणि नाजूक नसलेली आणि मेडिसी कुटुंबाची खूण असलेले डोळे असलेली असे केले होते. जरी कॅथरीन आपल्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध नसली तरीही तिच्या हातासाठी अनेक दावेदार रांगेत उभे होते. यांत स्कॉटलंडचा जेम्स पाचव्याने एप्रिल आणि नोव्हेंबर १५३० मध्ये आपले लग्न ठरविण्यासाठी आल्बनीच्या ड्यूकला क्लेमेंटकडे लग्न करण्यासाठी पाठवले होते १५३३ च्या सुरुवातीला फ्रांसच्या पहिला फ्रांस्वाने दुसरा मुलगा हेन्रीसाठी कॅथरीनला मागणी घातल्यावर क्लेमेंटने हा प्रस्ताव स्वीकारला. कॅथरीन आणि हेन्री अनेक प्रकारे दूरचे नातेवाईक होते. हा संबंध कॅथरीनसाठी भाग्याचा होता कारण जरी तिचे मेदिची कुटुंब गडगंड श्रीमंत असले तरीही ते शाही कुटुंब समजले जात नव्हते.
हेन्रीने कॅथरीनला बायको म्हणून फारसे महत्व दिले नाही. त्याने उघडपणे अनेक उपपत्नी ठेवल्या. लग्नाच्या पहिल्या दहा वर्षांत या जोडप्याला एकत्र मुले झाली नाहीत. १५३७ मध्ये हेन्रीने फिलिप्पा डुसीशी संबंध ठेवून एका मुलीला जन्म दिला. याने तो प्रजननक्षम होता हे सिद्ध झाले आणि कॅथरीनवर मूल जन्माला घालण्याचा दबाव वाढला.
युवराज्ञी असल्याने कॅथरीनकडून फ्रांसच्या सिंहासनाचा भावी वारस मिळण्याची अपेक्षा होती. दरबारी इतिहासकार ब्रँटोम यांच्या मते फ्रांसची वंशावळ चालू ठेवणे आवश्यक असल्याने अनेक लोकांनी राजा फ्रांस्वा आणि युवराज हेन्रीला सल्ला दिला की कॅथरीनला घटस्फोट देउन हेन्रीने दुसरे लग्न करावे. घटस्फोटाची चर्चा झाली. कॅथरीनने गर्भवती राहण्यासाठी अनेक उपाय करून पाहिले आणि शेवटी १९ जानेवारी १५४४ रोजी तिने एका मुलाला जन्म दिला. याला हेन्रीचे वडील फ्रांस्वाचेच नाव दिले गेले.
पहिल्यांदा गर्भवती झाल्यानंतरकॅथरीनला पुन्हा मूल होण्यास अडचण आली नाही. यासाठी कदाचित डॉक्टर ज्याँ फर्नेल यांचा लैंगिक सल्ला कारणीभूत होता. फर्नेलने शेवटपर्यंत याचा इन्कार केला होता. कॅथरीन लवकरच पुन्हा गर्भवती झाली आणि २ एप्रिल १५४५ रोजी तिला एलिसेबेथ नावाची मुलगी झाली. तिने हेन्री बरोबर आणखी आठ मुले जन्माला घातली. यांपैकी पाच मुले मोठी झाली. भावी चार्ल्स नववा (जन्म २७ जून १५५०); भावी हेन्री तिसरा (जन्म: १९ सप्टेंबर १५५१); आणि अँजूचा फ्रांस्वा (जन्म: १८ मार्च १५५५), क्लॉड (जन्म: १२ नोव्हेंबर १५४७) आणि मार्गारेट (जन्म: १४ मे १५५३). इतकी मुले झाल्यावर १४ व्या शतकापासून फ्रांसवर राज्य करणाऱ्या व्हाल्वाच्या राजघराण्याचे दीर्घकालीन भविष्य निश्चित दिसत होते.
कॅथरीनने इतकी मुले जन्माला घातली तरीही तिच्या वैवाहिक जीवनात काहीही सुधारणा झाली नाही. १५३८ च्या सुमारास वयाच्या १९ व्या वर्षी हेन्रीने ३८ वर्षीय डायेन दि प्वातियेशी संबंध ठेवले आणि हे त्याने आयुष्यभर ठेवले. असे असूनही त्याने कॅथरीनच्या पत्नी म्हणून आदर ठेवला. पहिल्या फ्रांस्वाच्या ३१ मार्च १५४७ रोजी झालेल्या मृत्यूनंतर हेन्री राजा झाला व कॅथरीन फ्रांसची राणी झाली. १० जून १५४९ रोजी सेंट-डेनिसच्या बॅसिलिकामध्ये तिचा राज्याभिषेक झाला.
फ्रांसची राणी
[संपादन]
३-४ एप्रिल १५५९ रोजी हेन्रीने पवित्र रोमन साम्राज्य आणि इंग्लंडसोबत कॅतू-कॅम्ब्रेसिसच्या शांतताकरारावर स्वाक्षरी करून लांबण लागलेली इटालियन युद्धे संपवली. याच्यावर अधिक शिक्कामोर्तब करण्यासाठी कॅथरीनची १३ वर्षांची मुलगी एलिसाबेथ हिचे लग्न स्पेनच्या दुसऱ्या फिलिपशी ठरवण्यात आले. त्यांचा दूरस्थ विवाह २२ जून १५५९ रोजी पॅरिसमध्ये साजरा करण्यात आला. या उत्सवाचा भाग म्हणून, ३० जून १५५९ रोजी एक जाउस्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती [२]
खुद्द राजा हेन्रीने या स्पर्धेत भाग घेतला. आपली प्रियकर डायेनच्या काळ्या-पांढऱ्या रंगात द्वंद्व खेळत त्याने गुईस आणि नेमूर्सच्या ड्यूकचा पराभव केला, परंतु माँटगोमेरीच्या काउंट गॅब्रिएलने त्याला खोगीरातून खाली ढकलून दिले. हेन्रीने पुन्हा मॉन्टगोमेरीविरुद्ध लढण्याचा आग्रह धरला. यावेळी मॉन्टगोमेरीचा भाला राजाच्या चेहऱ्यावर तुटला. हेन्रीने माघार घेतली परंतु त्याच्या चेहऱ्यातून रक्त येत होते आणि त्याच्या डोळ्यात आणि डोक्यात भलेमोठे लाकडाचे तुकडे अडकलेले होते. हे पाहून हेन्रीची बायको कॅथरीन, प्रियकर डायन आणि मोठा मुलगा फ्रांस्वा यांची शुद्ध हरपली. हेन्रीला शॅटू दि तूर्नेल्समध्ये नेउन त्याच्या डोक्यातून लाकडाचे पाच तुकडे काढण्यात आले. यांपैकी एकाने त्याचा डोळा आणि मेंदू छेदला होता. कॅथरीन सतत त्याच्या शेजारी बसून होती. डायेन राणी हाकलून देईल या भीतीने दूर राहिली. पुढील दहा दिवस हेन्रीची प्रकृतीत चढ-उतार येत राहिले. या दरम्यान तो कधीकधी पत्रे लिहिण्यास आणि संगीत ऐकण्या इतका बरा होता परंतु हळूहळू त्यांची दृष्टी, बोलणे आणि बुद्धिमत्ता कमी झाली आणि १० जुलै १५५९ रोजी ४०व्या वर्षी तो मृत्यू पावला. त्या दिवसापासून, कॅथरीनने एक तुटलेला भाला हे स्वतःचे प्रतीक म्हणून घेतला. त्यावर लॅक्रिमा हिंक, हिंक डोलोर (माझे अश्रू आणि माझे दुःख यातून येते) असे लिहिले होते.
राणी आई
[संपादन]दुसऱ्या फ्रांस्वाचा राज्यकाल
[संपादन]दुसरा फ्रांस्वा वयाच्या पंधराव्या वर्षी फ्रांसचा राजा झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यात लॉरेनचा कार्डिनल आणि फ्रांस्वाचा चुलतसासरा ग्विसचा ड्यूक यांनी रक्तहीन क्रांती करीत सत्ता काबीज केली. दोघांनीही फ्रांस्वा आणि कॅथरीनबरोबर लूव्रच्या महालात ठाण मांडले. काही दिवसांनी इंग्लिश राजदूताने अहवाल दिला की फ्रांसचे राज्य ग्विसच चालवत आहे. त्यावेळी कॅथरीनने गरजेपोटी ग्विसला सहकार्य केले. फ्रांस्वा वयानुसार स्वतःच कारभार करण्यास समर्थ मानला जात असल्याने त्याच्या सरकारमध्ये कॅथरीनला कोणतीही भूमिका नव्हती. तरीसुद्धा फ्रांस्वा आपल्या सर्व अधिकृत फर्मान या शब्दांनी सुरू करीत असे -- (फ्रांसची) राणी, माझ्या आईला समाधान देणारी आणि माझेही जे मत आहे अशी मी ही आज्ञा देतो की .... कॅथरीनने तिच्या नवीन अधिकाराचा फायदा घेण्यास मागेपुढे पाहिले नाही. तिच्या पहिल्या कृतींपैकी दोन म्हणजे डायेन दि प्वातियेकडून शाही रत्ने काढून घेणे आणि शॅटू दि चेनोन्सो पुन्हा आपल्या ताब्यात घेणे राजघराण्याला परत करण्यास भाग पाडणे. नंतर तिने त्या इमारतीत डायेन करूनघेतलेले बांधकाम पाडून टाकले किंवा त्यावर कुरघोडी करण्याचे अनेक प्रयत्न केले.
१५६०मध्ये कानात जंतूसंसर्ग होउन फ्रांस्वा खूप आजारी पडला. फ्रांस्वाचा मृत्यू जवळ आहे हे कळल्यावर कॅथरीनने आँत्वान दि बूर्बोनशी संधान साधले. आंत्वानच्या भावाला अटकेतून सोडून दिल्यास आँत्वानने सिंहासनावरील आपला हक्क सोडून द्यावा आणि भावी राजा नवव्या शार्लला पाठिंबा द्यावा असे ठरले. परिणामी, ५ डिसेंबर १५६० रोजी फ्रांस्वाच्या मृत्यूनंतर प्रिव्ही काउन्सिलने कॅथरीनला फ्रान्सची राज्यपाल (गव्हर्नांते दि फ्रांस) म्हणून नियुक्त केले. या पदाला सर्वदूर अधिकार होते. तिने तिची मुलगी एलिसाबेथला लिहिले: माझे मुख्य ध्येय म्हणजे सर्व गोष्टींमध्ये देवाचा सन्मान सतत माझ्या डोळ्यांसमोर ठेवणे आणि माझा अधिकार माझ्यासाठी नाही तर या राज्याच्या संवर्धनासाठी आणि तुमच्या सर्व भावांच्या भल्यासाठी राखणे असेच आहे.
नवव्या चार्ल्सचा सत्ताकाल
[संपादन]नववा शार्ल त्याच्या राज्याभिषेकाच्या वेळी दहा वर्षांचा होता (या समारंभादरम्यान तो रडलाही होता). सुरुवातीला कॅथरीन सतत त्याच्या अवतीभोवती राहत असे आणि त्याच्या खोलीत झोपतही असे. तिने त्याच्या सत्तापरिषदेचे अध्यक्षपद स्वतःकडे घेतले आणि त्याद्वारे ती धोरण ठरवत असे आणि राज्याचे कामकाज आणि संरक्षण नियंत्रित करत असे. तथापि तिला संपूर्ण देशावर नियंत्रण ठेवता आले नाही. फ्रांस या वेळी यादवीच्या उंबरठ्यावर होता. देशांच्या अनेक भागांमध्ये राजघराण्यापेक्षा स्थानिक जहागिरदारांचाच अंमल होता. कॅथरीन फ्रांसमध्ये वाढलेली नसल्याने तेथील गुंतागुंतीची प्रकरणे तिला समजणे कठीण होते.
कॅथरीनने युरोपमधील मोठ्या राजघराण्यांबरोबर आपल्या मुलांची लग्ने लावून व्हाल्वाचे हितसंबंध पुढे करण्याचा प्रयत्न केला. १५७० मध्ये नवव्या शार्लने पवित्र रोमन सम्राट मॅक्सिमिलियन दुसरा याची मुलगी ऑस्ट्रियाची एलिझाबेथ हिच्याशी लग्न केले. कॅथरीन तिच्या दोन सर्वात धाकट्या मुलांपैकी एक आणि इंग्लंडची एलिझाबेथ पहिली यांच्यातील लग्नासाठी देखील उत्सुक होती. १५६८ मध्ये कॅथरीनची मुलगी एलिसाबेथ हिचा बाळंतपणात मृत्यू झाल्यानंतर, तिने तिच्या सर्वात धाकटी मुलगी मार्गारेट साठी स्पेनच्या दुसऱ्या फिलिप कडे मागणी घातली होती. ती नकारली गेल्यावर तिने मार्गारेट साठी नव्हारच्या तिसऱ्या हेन्रीला मागणी घातली. इकडे मार्गारेटचे गुप्त प्रेमसंबंध गुईसच्या दिवंगत ड्यूकचा मुलगा हेन्री गुईसशी जुळलेले होते होती. कॅथरीनला हे कळल्यावर तिने तिच्या मुलीला तिच्या पलंगावरून खेचून आणले. कॅथरीन आणि राजाने तिला मारहाण केली, तिचे रात्रीचे कपडे फाडले आणि तिच्या झिंज्याही उपटल्या. शेवटी मार्गारेटचे लग्न नव्हारच्या हेन्रीशीशी लावून दिले गेले. हेन्री हुगेनॉ या प्रॉटेस्टंट पंथाचा होता.
तिसऱ्या हेन्रीचा सत्ताकाल
[संपादन]यानंतर दोनच वर्षांत नवव्या शार्लचा वयाच्या तेविसाव्या वर्षी मृत्यू झाला आणि कॅथरीनसमोर एक नवीन संकट उभे राहिले. शार्लचे शेवटचे शब्द होते अग..माझे आई. हेन्रीने त्याच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी कॅथरीनच्या हातात सत्ता दिले. फ्रांसचा आणि वारस असलेला हेन्री त्यावेळी पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाचा आदल्याच वर्षी राजा म्हणून निवडला गेला होता. वावेल कॅथेड्रलमध्ये त्याच्या राज्याभिषेकानंतर तीन महिन्यांनी हेन्रीने ते सिंहासन सोडले आणि तो फ्रांसचा राजा होण्यासाठी पॅरिसला परतला.
हेन्री कॅथरीनचा लाडका मुलगा होता. सिंहासनस्थ होताना तो वयात आलेला होता. जरी त्याची फुफ्फुसे कमकुवत असली आणि त्याला सतत थकवा जाणवत असला तरी बाकी दृष्टीने तो निरोगीह होता. सरकारी कामांची त्याला आवड होती. तो कॅथरीन आणि तिच्या सचिवांवर तिच्या आयुष्याच्या शेवटच्या काही आठवड्यांपर्यंत अवलंबून होता. त्यांचा आधार घेत तो अनेकदा राज्यकारभारापासून दूर जात आणि तीर्थयात्रा आणि ध्वजारोहण यासारख्या धार्मिक कृत्यांमध्ये स्वतःला मग्न करत असे.
हेन्रीला मुले होण्याचे शक्य नाही असे दिसल्यावर त्याचा सगळ्यात लहान भाऊ आलेन्सोनच्या फ्रांस्वाने उचापती सुरू केल्या. कॅथरीनने त्याला समज देण्याचा प्रयत्नही केला.[३] फ्रांस्वाने प्रॉटेस्टंटांशी हातमिळवणी करीत राजाविरुद्ध कारस्थाने सुरू केली[४] आणि त्यांच्यात एक करार घडवून आणला ज्यात कॅथरीन आणि हेन्रीने प्रॉटेस्टंटांच्या जवळजवळ सगळ्या मागण्या मान्य केल्या.[५] त्यानंतर नेदरलँड्स आणि बेल्जियमच्या प्रदेशांवर केलेल्या स्वारीत केल्यावर फ्रांस्वाचा मृत्यू झाला.[६] कॅथरीन ने दुसऱ्या दिवशी लिहिले -- माझ्या आधी इतक्या लोकांचे मृत्यू झालेले पाहणारी मी अभागी आहे, परंतु देवाच्या इच्छेचा मान ठेवलाच पाहिजे. तो सर्वांचा मालक आहे आणि तो आपल्याला आवडणारी लोक फक्त उसनी देतो.
आपल्या सगळ्यात लहान मुलाचा मृत्यू आणि उरलेल्या एका मुलाला मूल न होणे याने व्हालवा निर्वंश होण्याची शक्यता दाट होऊ लागली. कॅथरीनने आपला राजवंश पुढे नेण्यासाठी अनेक दशके चालविलेल्या मोहीमेचा हा नायनाटच होता. त्याहूनही अधिक अपमानास्पद म्हणजे त्यावेळच्या फ्रांसमधील उत्तराधिकारी कायद्यानुसार नव्हारचा हेन्री प्रॉटस्टंट असून सुद्धा फ्रांसच्या सिंहासनावर बसणार होता.[७]
कॅथरीनला फ्रांस्वा आणि शार्लप्रमाणे हेन्रीवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याच्या सरकारमध्ये तिची भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी आणि फिरत्या राजदूताची होती. तिने देशभर अनेकदा प्रवास केला आणि हेन्रीची सत्ता गाजवण्याचा आणि यादवी युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला. १५७८ मध्ये तिने फ्रांसच्या दक्षिणेला शांत करण्याचे काम हाती घेतले. वयाच्या ५९ व्या वर्षी, तिने हुगेनॉ नेत्यांशी समोरासमोर भेटण्यासाठी दक्षिणेकडे अठरा महिन्यांचा प्रवास सुरू केला. या तिच्या प्रयत्नांमुळे कॅथरीनला फ्रेंच लोकांकडून नव्याने आदर मिळाला. १५७९ मध्ये पॅरिसला परतल्यावर तिचे शहराबाहेर संसद आणि गर्दीने भव्य स्वागत केले. व्हेनिसचा राजदूत गेरोलामो लिपोमानो याने लिहिले: कॅथरीन एक अथक राजकन्या आहे. फ्रेंचांसारख्या अनियंत्रित लोकांना वश करण्यासाठी आणि शासन करण्यासाठी जणू काही तिचा जन्म झाला आहे: ते आता तिच्या गुणवत्तेची कदर करतात. तिच्या फ्रेंचांच्या एकजुटीसाठी वाहिलेल्या काळजीची दखल घेतात आणि तिच्या कामाची लवकर दखल न घेतल्याबद्दल त्यांना वाईट वाटते. कॅथरीनला मात्र देशाची परिस्थिती बरोबर माहित होती. २५ नोव्हेंबर १५७९ रोजी तिने हेन्रीला लिहिले, तुम्ही एका सर्वगामी बंडाच्या पूर्वसंध्येला आहात. जो कोणी तुम्हाला वेगळे सांगतो तो खोटारडा आहे.
शेवटचे महिने आणि मृत्यू
[संपादन]५ जानेवारी १५८९ रोजी कॅथरीन वयाच्या एकोणसाठव्या वर्षी (बहुधा प्लुरसीमुळे) मृत्यू पावली. लास्त्वालच्या मते तिला मृत्युपश्चात मेलेल्या बकरी इतकाच सन्मान मिळाला. पॅरिस व्हालवांच्या शत्रूंनी ताब्यात घेतल्यामुळे कॅथरीनला ब्लॉइस येथे तात्पुरते दफन करावे लागले. तिच्या मृत्यूनंतर आठ महिन्यांत नव्हारच्या हेन्री बरोबर वेढा घालणाऱ्या तिसऱ्या हेन्रीची जाक क्लेमेंटने चाकूने भोसकून हत्या केली. नव्हारचा हेन्री यानंतर फ्रांसचा चौथा हेन्री म्हणून सिंहासनावर बसला. तिसऱ्या हेन्रीच्या हत्येने जवळजवळ तीन शतकांचे व्हाल्वा राजवट संपुष्टात आली आणि बर्बन राजवंश सत्तेत आला. काही वर्षांनंतर, हेन्रीची मुलगी डयेन आणि फिलिपा डुसी यांनी कॅथरीनचे अवशेष पॅरिसमधील सें-देनिस बॅसिलिकामध्ये पुन्हा दफन केले. १७९३ मध्ये एका क्रांतिकारी जमावाने तिच्या अस्थी इतर राजे आणि राण्यांच्या अस्थींसह एका सामूहिक कबरीत फेकल्या.
अपत्ये
[संपादन]कॅथरीनला दहा मुले झाली.
- दुसरा फ्रांस्वा, फ्रान्सचा राजा (१९ जानेवारी १५४४) - ५ डिसेंबर १५६०). १५५८ मध्ये स्कॉट्सची राणी मेरीशी लग्न केले.
- एलिसाबेथ (२ एप्रिल १५४५ - ३ ऑक्टोबर १५६८). १५५९ मध्ये स्पेनचा राजा फिलिप दुसरा याच्याशी लग्न केले.
- क्लॉड (१२ नोव्हेंबर १५४७ - २१ फेब्रुवारी १५७५). १५५९ मध्ये लॉरेनचे ड्यूक चार्ल्स तिसरा यांच्याशी लग्न केले.
- लुई, ड्यूक ऑफ ऑर्लियन्स (३ फेब्रुवारी १५४९ - २४ ऑक्टोबर १५५०). बालपणीच निधन झाले.
- नववा शार्ल, फ्रांसचा राजा (२७ जून १५५०) - ३० मे १५७४). १५७० मध्ये ऑस्ट्रियाच्या एलिझाबेथशी लग्न केले.
- तिसा हेन्री, फ्रांसचा राजा (१९ सप्टेंबर १५५१) - २ ऑगस्ट १५८९). १५७५ मध्ये लोरेनच्या लुईसशी लग्न केले.
- मार्गारेट (१४ मे १५५३) - २७ मार्च १६१५). १५७२ मध्ये फ्रांसचा भावी राजा हेन्री चौथा, नव्हारचा राजा हेन्रीशी लग्न केले.
- फ्रांस्वा, अँजूचा ड्यूक (१८ मार्च १५५५) – १९ जून १५८४)
- व्हिक्वा (२४ जून १५५६) - १७ ऑगस्ट १५५६). बालपणीच निधन झाले.
- जीन (२४ जून १५५६). मृत बाळ
संदर्भ
[संपादन]- ^ Pliny the Elder, Letters 9.23.
- ^ Thomson, 98; Sutherland, Ancien Régime, 3; Neale, The Age of Catherine de Medici.
- ^ Lindberg, Carter (March 15, 2021). The European Reformations (Third ed.). Wiley-Blackwell. p. 229. ISBN 978-1119640813.
- ^ Lindberg, Carter (March 15, 2021). The European Reformations (Third ed.). Wiley-Blackwell. p. 229. ISBN 978-1119640813.
- ^ Lindberg, Carter (March 15, 2021). The European Reformations (Third ed.). Wiley-Blackwell. p. 229. ISBN 978-1119640813.
- ^ Lindberg, Carter (March 15, 2021). The European Reformations (Third ed.). Wiley-Blackwell. p. 229. ISBN 978-1119640813.
- ^ Pettegree, 154.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.