किसन महाराज साखरे
किसन महाराज साखरे
[संपादन]किसन महाराज साखरे (१९३८ – २०२५) हे मराठी वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी वारकरी परंपरेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयुष्य समर्पित केले होते.
प्रारंभिक जीवन
[संपादन]किसन महाराज साखरे यांचा जन्म १९३८ मध्ये लातूर जिल्ह्यातील पान चिंचोली येथे झाला. त्यांचे वडील परमगुरू दादा महाराज साखरे आणि आजोबा नाना महाराज साखरे हे संत साहित्याचे अभ्यासक होते. कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे सखोल अध्ययन बालवयातच केले. पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र आळंदी येथील साधकाश्रमात गुरू-शिष्य परंपरेचा स्वीकार करून त्यांनी संत साहित्य, तत्त्वज्ञान आणि व्याकरणशास्त्राचे शिक्षण घेतले.
कार्य आणि योगदान
[संपादन]१९६० साली साधकाश्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी ज्ञानार्जनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना संत साहित्य, तत्त्वज्ञान आणि वेदान्ताचे शिक्षण दिले. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातून त्यांनी कीर्तन आणि प्रवचनाद्वारे आध्यात्मिक जागृती केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कीर्तनकार आणि प्रवचनकार घडले.
ते विविध विद्यापीठांशी जोडले गेले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ येथे त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. तसेच विविध विद्यापीठांमध्ये पीएच.डी आणि डी.लिट परीक्षक मंडळावर सदस्य म्हणूनही कार्य केले.
सामाजिक कार्य
[संपादन]किसन महाराजांनी मूल्याधिष्ठित शिक्षण प्रणालीचा प्रसार केला आणि मोफत बालसंस्कार शिबिरांचे आयोजन केले. त्यांनी वाराणसी, वृंदावन आणि रामेश्वर येथे गीता-ज्ञानेश्वरी ज्ञानयज्ञाचे आयोजन केले. ते स्वस्तिश्री या मासिकाचे संपादक होते आणि त्यांनी अखिल भारतीय कीर्तनकार संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते.
लेखन आणि ग्रंथसंपदा
[संपादन]किसन महाराजांनी संस्कृत आणि मराठीतून ११५ ग्रंथांची निर्मिती केली. त्यांच्या प्रमुख ग्रंथांमध्ये:
सार्थ ज्ञानेश्वरी
सार्थ एकनाथी भागवत
सार्थ तुकाराम महाराज गाथा
सार्थ भगवद्गीता
सार्थ ब्रह्मसूत्र
सार्थ उपनिषद
सोहम योग
ज्ञानेश्वर महाराज चरित्र यांचा समावेश आहे. तसेच, त्यांनी ५०० ताम्रपटांवर ज्ञानेश्वरी प्रकाशित केली.
पुरस्कार आणि सन्मान
[संपादन]त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, त्यापैकी काही महत्त्वाचे असे:
२०१८ मध्ये महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा डी.लिट सन्मान
जिजामाता गौरव पुरस्कार
वारकरी रत्न आणि मोरया पुरस्कार
निधन
[संपादन]२०२५ मध्ये ९१व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आळंदी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा वारसा त्यांच्या अनुयायांनी पुढे चालवला आहे.
संदर्भ
[संपादन]किसन महाराज साखरे अधिकृत वेबसाइट website - https://www.sakharemaharaj.com Archived 2025-02-06 at the वेबॅक मशीन.
सकाळ वृत्त - किसन महाराज साखरे यांचे निधन https://www.esakal.com/pune/kisan-maharaj-sakhre-scholar-of-saint-literature-passed-away-pune-alandi-cdj98
पुढारी - किसन महाराज साखरे यांचे कीर्तन क्षेत्रातील योगदान https://pudhari.news/maharashtra/pune/kirtankar-kisan-maharaj-sakhre-passes-away
ई-विवेक - किसन महाराज साखरे यांच्या ग्रंथसंपदेविषयी https://www.evivek.com/Encyc/2025/1/31/Kisan-Maharaj-Sakhare.html
इंडिया टाईम्स मराठी - पुणे: प्रसिद्ध कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचे निधन https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/pune-chinchwad-famous-kirtankar-dr-kisan-maharaj-sakhare-death/articleshow/117412476.cms Archived 2025-02-13 at the वेबॅक मशीन.
अन्य विश्वसनीय संदर्भ