कार्ल पीअर्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्ल पीअर्सन

कार्ल पीअर्सन हे ब्रिटिश गणितज्ञ व आधुनिक सांख्यिकीचे (संख्याशास्त्राचे) एक संस्थापक होते. त्यांचा जन्म लंडन येथे झाला आणि शिक्षण लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेज स्कूलमध्ये व केंब्रिज येथील किंग्ज कॉलेजात झाले. १८७९ मध्ये त्यांनी बी. ए. पदवी मिळविली व ते रँग्लरही झाले. त्यानंतर ते जर्मनीला गेले आणि तेथे त्यांनी भौतिकी व तत्त्वमीमांसा या विषयांचा अभ्यास केला. १८८० मध्ये त्यांनी कायद्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली व १८८१ मध्ये केंब्रिज विद्यापीठाची एल्एल्. बी. पदवी संपादन केली. १८८२ मध्ये त्यांनी एम्. ए. पदवीही मिळविली. १८८१–८४ या काळात त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला. १८८४ मध्ये लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये अनुप्रयुक्त (व्यावहारिक) गणित व यामिकी (प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया व त्यांमुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणारे शास्त्र) या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८९१–९४ मध्ये ग्रेशॅम कॉलेजात त्यांनी भूमिती विषयाचे अध्यापनही केले. ते युनिव्हर्सिटी कॉलेजात १९०७ मध्ये अनुप्रयुक्त गणिताच्या विभागाचे प्रमुख व १९११ मध्ये सुप्रजाजननशास्त्राचे (पितरांच्या योग्य निवडीने पुढील पिढीतील गुणलक्षणे सुधारण्यासंबंधीच्या शास्त्राचे) गॉल्टन प्राध्यापक झाले आणि १९३३ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी तेथेच अध्यापन केले.

ग्रेशॅम कॉलेजमध्ये त्यांनी भूमितीवर दिलेली व्याख्याने १८९२ मध्ये द ग्रामर ऑफ सायन्स या ग्रंथात विस्तारित रूपाने प्रसिद्ध केली. हा ग्रंथ पुष्कळ लोकप्रिय झाला आणि विज्ञानाच्या तत्त्वज्ञानावरील एक अभिजात व प्रभावी ग्रंथ म्हणून त्या काळी नावाजला गेला. सुप्रजाजननशास्त्राचे आद्य प्रवर्तक फ्रान्सिस गॉल्टन यांचा नॅचरल इनहेरिटन्स (१८८९) हा ग्रंथ व युनिव्हर्सिटी कॉलेजमधील प्राणिविज्ञानाचे प्राध्यापक डब्लू. एफ्. आर्. वेल्डन यांचा सहवास यांमुळे प्रभावित होऊन पीअर्सन यांनी आनुवंशिकता व क्रमविकास (उत्क्रांती) या जीववैज्ञानिक प्रश्नांमध्ये सांख्यिकीचा उपयोग करण्यासंबंधी संशोधन करण्यास सुरुवात केली. गॉल्टन यांच्या ग्रंथातील सहसंबंध व समाश्रयण [→ सांख्यिकी] या संकल्पनांनी पीअर्सन यांचे लक्ष वेधून घेतले. जीववैज्ञानिक व सामाजिक शास्त्रातील प्रश्नांकरिता सांख्यिकीचा उपयोग करण्यासंबंधी पीअर्सन यांनी केलेल्या कार्यामुळे सांख्यिकीतील अनेक महत्त्वाच्या पद्धती विकसित झालेल्या आहेत. त्यांच्या कार्यातूनच ⇨जीवसांख्यिकी ही सांख्यिकीची महत्त्वाची शाखा उदयास आली आणि या क्षेत्रातील संशोधन कार्य प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने त्यांनी गॉल्टन व वेल्डन यांच्या सहकार्याने बायोमेट्रिका हे नियतकालिक १९०१ मध्ये सुरू केले. या नियतकालिकाचे ते १९०१–३६ या काळात संपादक होते आणि या नियतकालिकात त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. पीअर्सन यांनी १८९३–१९१२ या काळात मॅथेमॅटिकल कॉन्ट्रिब्यूशन्स टू द थिअरी ऑफ इव्होल्यूशन या शीर्षकाखाली १८ निबंध लिहिले. या निबंधांमध्ये त्यांच्या बहुतेक सर्व महत्त्वाच्या कार्याचा समावेश असून त्यात ⇨ सांख्यिकीय अनुमानशास्त्रामध्ये महत्त्वाच्या ठरलेल्या काय-वर्ग (X2) कसोटीचे विवरणही आलेले आहे. पीअर्सन यांनी शोधून काढलेले वारंवारता वक्र सांख्यिकीय सिद्धातांत अतिशय उपयुक्त ठरलेले आहेत. १९२५ मध्ये त्यांनी सुप्रजाजननशास्त्राला वाहिलेले ॲनल्स ऑफ युजेनिक्स हे नियतकालिक स्थापन केले व या नियतकालिकाचे १९०५–३३ या काळात त्यांनी संपादनही केले.

रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १८९६ मध्ये त्यांची निवड झाली व १८९८ मध्ये त्यांना सोसासटीच्या डार्विन पदकाचा बहुमान मिळाला. त्यांनी सुरुवातीला द न्यू वेर्थर (१८८०) व द ट्रिनिटी : ए नाइनटिंथ सेंच्यूरी पॅशन प्ले (१८८२) हे ललित वाङ्‌मयीन ग्रंथ लिहिले. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेली कोष्टके सांख्यिकीविज्ञांना व गणितज्ञांना अतिशय बहुमोल ठरलेली असून ती टेबल्स फॉर स्टॅटिस्टिशियन्स अँड बायोमेट्रिशीयन्स (पहिला भाग १९१४, दुसरा भाग १९३१), टेबल्स ऑफ द इनकंप्लिट गॅमाफंक्शन (१९२२) आणि टेबल्स ऑफ द इंनकंप्लिट बीटाफंक्शन (१९३४) या शीर्षकांखाली प्रसिद्ध झाली. यांखेरीज द एथिक ऑफ फ्री थॉट (१८८८), द चान्सेस ऑफ डेथ अँड अदर स्टडीज इन इव्होल्यूशन (२ खंड, १८९७) आणि द लाइफ, लेटर्स अँड लेबर्स ऑफ फ्रान्सिस गॉल्टन (३ खंड, १९१४-३०) हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.