कातळ खोदशिल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कातळ खोद शिल्प (चित्र) या पानावरून पुनर्निर्देशित)
बारसू कातळशिल्प(३)

प्रागैतिहासिक काळातील सांस्कृृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने दगडात विविध शिल्पे कोरून ठेवलेली आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना राॅक आर्ट (Rock Art) किंवा पेट्रोग्लिफ्स (petroglyphs) या नावाने ओळखले जाते. ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. विविध प्राणी, पक्षी अथवा काही अगम्य नक्षीकाम अशी ती गूढ खोदचित्रे आहेत. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते; परंतु संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेषेकरून कोकणातच पाहण्यास मिळतात. [१]

कोकणातील कातळ खोद शिल्प[संपादन]

बारसू कातळशिल्प(२)

महाराष्ट्र राज्यातील कोकण भागात विशेषतः रत्‍नागिरी जिल्ह्यातील रत्‍नागिरी, लांजा, राजापूर तसेच देवगड आणि सिंधुदुर्ग तालुक्यातील ५० गावांमध्ये अशी शिल्पे आहेत.

  • रत्‍नागिरी जिल्हा-

जयगड, चवे, रामरोड, करबुडे, मासेबाव, निवळी, गोळप, निवळी गावडेवाडी, कापडगाव, उमरे, कुरतडे, कोळंबे, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी, डोर्ले इ.

  • राजापूर तालुका-

देवाचे गोठणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरे कोंब, विखारे गोठणे, बारसू, पन्हाळे ,शेडे, कोतापूर, देवीहसोळ इ.

देवाचे गोठणे येथील कातळशिल्प
  • लांजा तालुका-

भडे, हरचे, रुण, खानावली, रावारी, लावगण इ. देवगड आणि सिंधुदुर्ग येथील शोधमोहीम सुरू असून देवगडमध्ये काही ठिकाणे सापडली आहेत.[२]

  • देवगड तालुका-

वाघोटन ,बापर्डेत इ.

संशोधनाचे भौगोलिक क्षेत्र[संपादन]

कोकणातील प्रामुख्याने कातळ सड्यांवर हे काम सुरू आहे. रत्‍नागिरी,राजापूर,लांजा येथील समुद्र किना-यापासून पूर्व दिशेला २५ किलोमीटर अंतरापर्यंत आणि दक्षिणोत्तर सुमारे १५० किलोमीटरच्या अंतरात ३७०० चौरस किलोमीटर परिसरात समाविष्ट गावांमधील कातळ खोद शिल्पाचे संशोधनकार्य सुरू आहे.[२]

कालनिश्चिती[संपादन]

या शिल्पांचा काळ मध्य अश्मयुगीन म्हणजे सुमारे इसवी सन पूर्व १०००० वर्षे इतका असावा, असे अभ्यासक नोंदवतात.[२]

कोकणातील कातळ खोद शिल्प (चित्र) रचनेतील वैशिष्ट्ये[संपादन]

  • या सर्व रचना या कातळाच्या जमिनीवर पृष्ठभागावर आडव्या पद्धतीने कोरल्या गेल्या आहेत.
  • प्राण्यांच्या खोदलेल्या आकृती या प्रत्यक्षातील प्राण्यांच्या आकाराशी मिळत्या-जुळत्या आहेत.
  • पक्ष्यांच्या कोरलेल्या आकृती या प्रत्यक्षातील पक्ष्यांच्या आकारापेक्षा मोठ्या आकारात कोरलेल्या आहेत.
  • विशेषतः कोकणातील कातळ शिल्पातील प्राणी व पक्षी यांच्या आकृतींचा विचार करता भारतात अन्यत्र आढळून येणाऱ्या अशा शिल्पांच्या तुलनेत हे आकार मोठे आहेत.
  • ज्या प्राण्यांच्या अस्तित्वाचे पुरावे कोकणात आढळून येत नाहीत अशा प्राण्यांच्या आकृतीही यात कोरलेल्या आहेत, उदा. एकशिंगी गेंडा, पाणघोडा, इ.
  • येथील चित्रशैली पोर्तुगाल,ओस्ट्रेलिया येथील शिल्पांशी प्रथमदर्शनी साम्य दाखविते.[२]

स्वरूप[संपादन]

एका प्रकारच्या या शिल्पांसाठी कातळावर ठरावीक अंतराची चौकट खोदून घेतलेली दिसते. त्या चौकटीत ही शिल्पे कोरलेली असतात. त्यांना उठाव काहीसा कमी असतो. अशी शिल्पे कोकणात तुलनेने अत्यल्प आहेत.

दुसऱ्या प्रकारात सरळ रेषेच्या आधारे द्विमितीय चित्रे दिसतात. कोकणातील कातळशिल्पांमध्ये यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या शिल्पांमध्ये मनुष्याकृती, गोपद्मे व मासा, कासव, असे विविध प्राणी, पक्षी यांच्या आकृती, व सांकेतिक खुणा दिसतात. काही ठिकाणी भौमितिक रचनाही आढळतात. देवाचे गोठणे गावातील शिल्पात सड्यावरील दगडात विशिष्ट जागी चुंबकीय बदल दिसून येणारे शिल्प आहे.

  • प्राणी- चिन्ह स्वरूपात प्राण्यांची शिल्पे कोरलेली दिसतात. शिल्परचनेतील प्राणी आणि मूळ प्राणी यांच्या आकारात साम्य आढळते.
  • पक्षी- शिल्परचनेत पक्षी असण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. मूळ पक्ष्यांच्या आकारात आणि शिल्पातील पक्ष्यांच्या आकारात फरक दिसून येतो.
  • जलचर आणि उभयचर प्राणी- प्रतिमा व मूळ आकार यांच्यात या शिल्पाकृतीत सारखेपणा दिसून येतो. समुद्री कासव, मगर, विविध प्रकारचे मासे यांची शिल्पे कोरलेली दिसून येतात.
  • मनुष्याकृती- या रचना मानवी शरीराच्या आकाराशी जुळणाऱ्या नसल्या तरी हे चित्रण सादृश्य (?) आहे असे दिसून येते. या प्रतिमा स्त्रीच्या आहेत की पुरुषाच्या आहेत हे कळण्याच्या दृष्टीने त्यावर कोणत्याही खुणा आढळत नाहीत.
  • गोपद्म/भौमितिक रचना- यांच्या आकारात विविधता असून या चिह्नांकित रेखाकृती या स्वरूपात कोरलेल्या दिसतात.
  • मातृदेवता- गुडघ्यापासून खाली मानवी पायाच्या रचनेतून कोरलेली अशा प्रकारची शिल्पे काही चित्रे आहेत. या रचना पाहता त्या मातृदेवता असाव्यात का यावर अभ्यासक संशोधन करीत आहेत.[२]

संशोधन कार्य[संपादन]

राजापूर, रत्‍नागिरी व लांजा तालुक्यात ४२ गावांमधून ८५० कातळशिल्पे सापडली आहेत. राजापूरजवळच्या गोवळ या गावातही मानवी संस्कृतीच्या प्रागेतिहास काळातील कातळशिल्पे आहेत. शोधकर्ते सुरेंद्र ठाकुरदेसाई, धनंजय मराठे आणि सुधीर रिसबूड या शोधकर्त्यांनी चार वर्षापासून ही मोहीम सुरू केली आहे. कातळशिल्पांच्या संरक्षणासाठी शासनाकडून प्रथमच निधी मंजूर झाला आहे. गावामध्ये खोदशिल्पांचा संदर्भ गोळा करणे, चौकशी करून मित्रमंडळी, ज्येष्ठ गावकऱ्यांकडून खात्री करणे व नंतर ती शोधून काढून नोंद करणे, नकाशे तयार करण्याचे काम केले जाते.[३]

पर्यटनस्थळ म्हणून विकास[संपादन]

या शिल्पाकृती समाजाला माहिती व्हाव्यात पण त्याच जोडीने त्यांचे रक्षणही व्हावे यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शाळा, महाविद्यालये यांच्या सहली किंवा विविध दूरचित्रवणी माध्यमातून या ऐतिहासिक वारशाची माहिती पोचविले जात आहे. यासाठी पुरातत्त्व खात्यालाही सहकार्य करण्यात येते आहे.

जागतिक स्तरावर[संपादन]

जगाच्या विविध भागांत आदिमानवाने खोदलेली कातळशिल्पे, दगडावर रेखाटलेली रंगचित्रे आढळून येतात. जगात ‘रॉक आर्ट’ म्हणून ती ओळखली जातात. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भीमबेटका येथील गुहेतील रंगचित्रे हा ‘रॉक आर्ट’चाच प्रकार आहे.[४]

संशोधनाचे महत्त्व[संपादन]

कर्नाटकातील बदामी येथे ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या १७व्या राष्ट्रीय परिषदेत सोसायटीचे सदस्य असलेल्या सतीश लळीत यांनी कुडोपी येथील कातळशिल्पांबाबतचा शोधनिबंध सादर केला. त्यात मालवण तालुक्यातील हिवाळे आणि कुडोपी येथील कातळशिल्पांची सविस्तर माहिती छायाचित्रांसह सादर करण्यात आली. कोकणातील पाषाण प्रस्तरावर निर्माण झालेली चित्र व शिल्प संस्कृती ही वैविध्यपूर्ण असून तिला ऐतिहासिक महत्त्व आहे. या कलात्मक संस्कृतीची निश्चित कालगणनाही अद्याप झालेली नाही. तसेच ही कलानिर्मिती कोणत्या कारणासाठी, कोणत्या हेतूने निर्माण झाली आणि कोणी केली, याबद्दलचे ठोस पुरावे अद्यापपर्यंत उपलब्ध झालेले नाहीत. त्यावर संशोधन सुरू आहे. त्यातून कोकण किनारपट्टीवरील हिवाळे आणि कुडोपीसारख्या पुरातत्त्वीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी या भागातील आदिम मानवी समूहाची वसतिस्थाने यांच्याबद्दल माहिती मिळू शकते, असा संशोधकांचा अंदाज आहे. त्यासाठी या ठिकाणांचे तज्ज्ञांकडून सातत्याने निरीक्षण होणे, हाती येणाऱ्या माहितीचा सयुक्तिक अर्थ लावणे, या कातळशिल्पांचा कालावधी निश्चित करणे इत्यादी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.[५] कातळशिल्पांचा अभ्यास हा ऐतिहासिक दृष्टिकोनातून करणे पुरेसे नसते. त्या संशोधनासाठी पूरक म्हणून भौगोलिक बदल, पर्यावरणीय बदल, जैवविविधता यांचाही अभ्यास करणे आवश्यक असते.

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "कोकणातील कातळशिल्पे | थिंक महाराष्ट्र!". www.thinkmaharashtra.com (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-09-19. 2018-03-16 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d e रिसबुड, ठाकुरदेसाई, मराठे, अश्मयुगीन मानवी अस्तित्वाच्या पाऊलखुणांचा शोध, कातळ-खोद-शिल्प
  3. ^ "बारसू, रावारीत आढळली 67 कातळशिल्पे". सकाळ. 2018-03-16 रोजी पाहिले.
  4. ^ Rock Art of Madhya Pradesh (इंग्रजी भाषेत). Goodearth Publications. ISBN 9789380262505.
  5. ^ "कोकणातील गूढ कातळ-शिल्पे | Maayboli". www.maayboli.com. 2018-03-18 रोजी पाहिले.