कांताबाई सातारकर
कांताबाई सातारकर (जन्म : १९३९) या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वगसम्राज्ञी व तमाशा रंगभूमीवरील अग्रगण्य कलाकार होत्या. पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या तमाशा क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांसारख्या पुरुषी भूमिका प्रभावीपणे साकारून कांताबाईंनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.[१]
| कांताबाई सातारकर | |
|---|---|
|
| |
| जन्म | बडोदा, गुजरात, भारत |
| मृत्यू |
२५ मे, २०२१ कोरोना संगमनेर |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | तमाशा कलावंत |
| कारकीर्दीचा काळ | १९४८ ते २०२१ |
| पुरस्कार | विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार |
| पती | तुकाराम खेडकर |
| अपत्ये | अनिता, अलका, रघुवीर, मंदाराणी |
प्रारंभीचे जीवन
[संपादन]सातारकरांचा जन्म गुजरात राज्यातील वडोदरा जिल्ह्यातील संखेडा तालुक्यातील टिंबा या गावात झाला. त्यांच्या कुटुंबात तमाशाचा कोणताही वारसा नव्हता. त्याकाळी गुजरात मध्ये दगडाच्या खाणी जास्त असल्याने उदरनिर्वाहासाठी कांताबाईंचे वडील साहेबराव व आई चंद्राबाई दगडखाणीत काम करत होते. कालांतराने त्यांचे कुटुंब काही दिवस पुण्यातील येरवडा या भागात राहायला आले व पुढे काही दिवसांनी ते आपल्या मूळगावी सातारा येथे स्थायिक झाले.[१]
सातारकर दोन-चार दिवस शाळेत गेल्या मात्र आपल्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. बालपणी उत्सवप्रसंगी होणाऱ्या मेळ्यांतील नृत्य पाहून त्या प्रभावित झाल्या. कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नसताना त्यांनी स्वतः नृत्याची सुरुवात केली. वयाच्या नवव्या वर्षी साताऱ्यातील नवझंकार मेळा येथे त्यांना प्रथम नृत्याची संधी मिळाली.[२]
तमाशा कारकीर्द
[संपादन]त्याकाळी सर्जेराव व बाबुराव अहिरवाडीकर हा तमाशाचा फड सगळीकडे प्रसिद्ध होता. या तमाशा फडात कांताबाईंनी काम करण्यास सुरुवात केली. पुढे शिवराम व भिवराम बाबर (शिवा-भिवाचा तमाशा) तसेच बाबुराव पुणेकर यांच्या फडांमध्येही त्यांनी काम केले. त्याकाळी पुण्या-मुंबईत बंदिस्त थिएटरमध्ये बाबुराव पुणेकर यांच्या तमाशाचे खेळ होत असे. तमाशा म्हणजे नुसतं नाचगाणं नाही, वग म्हणजे तमाशाचा आत्मा आणि या वगातूनच लोकांचे प्रबोधन करायचे असते हे बाबुराव पुणेकरांनी कांताबाईंना समजावून सांगितले. पुढे जाऊन याच कांताबाई वगसम्राज्ञी कांताबाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. [३]
बाबुराव पुणेकरांचा तमाशा फड सोडल्यांनंतर कांताबाईंनी सातारा सोडून थेट मुंबई गाठली. लालबागचे न्यू हनुमान थिएटर म्हणजे तमासगीरांचे हक्काचे ठिकाण.[४] येथे त्यांनी दादू इंदुरीकर यांच्या फडात प्रवेश केला. काही दिवस काम केल्यांनतर दादोबांच्या तमाशाचा बाज वेगळा असल्याचे कांताबाईंना जाणवले. दादोबांनी दिलेल्या संधीबद्दल आभार मानून त्यांनी त्यांचा फड सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच काळात तुकाराम खेडकर यांचा फडही तेथे कार्यरत होता. खेडकर यांच्या तमाशा शैलीने प्रभावित होऊन त्या त्यांच्या फडात दाखल झाल्या. तुकाराम खेडकर मूळचे कोकणातले होते आणि त्यांचे आडनाव इंदुलकर होते.[५]
वैवाहिक जीवन
[संपादन]तुकाराम खेडकर आणि कांताबाई सातारकर या जोडीला मोठी लोकप्रियता मिळाली आणि त्यांनी प्रेमविवाह केला.[६] पुढे जाऊन त्यांना अनिता, अलका, रघुवीर, मंदाराणी ही चार अपत्ये झाली.[७][८] १९६४ मध्ये येवला तालुक्यातील एका गावात तमाशा सुरू असताना तुकाराम खेडकर यांची तब्येत बिघडली. उपचारार्थ पुण्याला घेऊन जात असतानाच त्यांचे निधन झाले.[९]
संघर्षकाळ
[संपादन]पतीचे अकाली निधन झाल्यानंतर कांताबाईंना त्यांच्या पतीच्या फडातून बाहेर पडावे लागले. त्यांनी काही काळ खानदेशातील आनंदराव महाजन यांच्या फडात काम केले. पुढे त्यांनी स्वतःचा तमाशा फड सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जुने स्टेज साहित्य विकत घेऊन १९६९ साली "कांताबाई सातारकर सह मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ" या नावाने स्वतंत्र फडाची स्थापना केली.[६]
सुमारे दहा वर्षे तमाशा फड चालवल्यावर कांताबाईंसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या. तमाशा फड बंद पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. कांताबाईंनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना आपली अडचण सांगण्याचे ठरवले. सोबत दोन तीन कलाकार घेऊन त्या मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटल्या. आपली अडचण सांगितली. मुख्यमंत्री पवारांनी व्यक्तिगत पातळीवर पंधरा हजार रुपये मदत केली.[१०] संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी व पुढे सिक्कीमचे राज्यपाल झालेले श्रीनिवास पाटील यांनी एका राष्ट्रीयीकृत बँकेद्वारा त्यांना कर्ज मिळवून द्यायला मदत केली. पुनश्च हरिओम म्हणत कांताबाईंनी तमाशाला सुरुवात केली. तमाशा नव्याने सुरू झाला. मुलगा रघुवीर सोंगाड्या म्हणून तमाशा रंगभूमीवर कार्यरत झाला आणि तेव्हापासून महाराष्ट्रातील अग्रगण्य तमाशा फड म्हणून या तमाशाची ओळख आहे. पुढे संगमनेर येथेच त्या कायमस्वरूपी स्थायिक झाल्या. भालजी पेंढारकर यांनी कांताबाईंना चित्रपटाचा प्रस्ताव दिला होता मात्र तमाशा या लोककलेवर असलेल्या प्रेमामुळे त्यांनी तो प्रस्ताव नाकारला.[१०]
वैशिष्ट्यपूर्ण भूमिका
[संपादन]सातारकरांनी अभिनेत्री, गायिका, वगनाट्य दिग्दर्शिका, व्यवस्थापक अशा अनेक गोष्टी सांभाळल्या. मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत मात्र स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे खूप कमी आहेत. कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या.[११]
इतर वगनाट्ये
[संपादन]- गोविंदा गोपाळा
- १८५७ चा दरोडा
- तडा गेलेला घडा
- अधुरे माझे स्वप्न राहिले
- कलंकिता मी धन्य झाले
- असे पुढारी आमचे वैरी
- डोम्या नाग अर्थात सख्खा भाऊ पक्का वैरी
- कोंढाण्यावर स्वारी
पुरस्कार व गौरव
[संपादन]पुस्तक प्रकाशन
[संपादन]संगमनेर येथील लेखक तसेच इतिहास संशोधक डॉ. संतोष खेडलेकर यांनी कांताबाईंच्या जीवनावर वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर हे पुस्तक लिहून यातून त्यांचा संपूर्ण जीवनपट मांडला आहे.[११]
सामाजिक कार्य
[संपादन]सातारकर यांनी राज्यातील अनेक ठिकाणी शाळा, मंदिरे तसेच गरजू व्यक्तींना शस्त्रक्रियेसाठी मदत केली.[१०]
मृत्यू
[संपादन]कांताबाई सातारकर यांचे २५ मे २०२१ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता कोरोना संसर्गाने संगमनेर येथे निधन झाले. मृत्यू समयी त्या ८२ वर्षांच्या होत्या.[१६]
संदर्भ
[संपादन]- 1 2 "Kantabai Satarkar: ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे करोनाने निधन". Maharashtra Times. 2026-02-15 रोजी पाहिले.
- ↑ author/lokmat-news-network (2021-05-26). "ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन". Lokmat. 2026-02-15 रोजी पाहिले.
- ↑ Bharat, E. T. V. (2021-06-02). "खेडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर; मुलीनंतर कांताबाई सातारकर यांच्या नातुचंही निधन". ETV Bharat News. 2026-02-15 रोजी पाहिले.
- ↑ माझा, नितीन ओझा, एबीपी (2021-05-25). "Kantabai Satarkar | ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांची कारकीर्द फोटोच्या माध्यमातून". ABP Majha. 2026-02-15 रोजी पाहिले.
- ↑ खेडलेकर, संतोष (2020-08-25). "तुकाराम खेडकर (Tukaram Khedkar)". मराठी विश्वकोश (इंग्रजी भाषेत). 2026-02-19 रोजी पाहिले.
- 1 2 निंबाळकर, अशोक (2021-05-25). "तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन". Marathi News Esakal. 2026-02-15 रोजी पाहिले.
- ↑ मुंबई, राजू सोनावणे, सामटीव्ही (2021-05-25). "महाराष्ट्राची सुप्रसिद्ध वगसम्राज्ञी हरपली". Marathi News | Saam TV. 2026-02-19 रोजी पाहिले.
- ↑ author/online-lokmat (2021-06-02). "लोककलावंत कांताबाई सातारकरांपाठोपाठ कन्या अनिता आणि नातवाचंही कोरोनानं निधन". Lokmat. 2026-02-19 रोजी पाहिले.
- 1 2 Marathi, TV9 (2021-06-02). "तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकरांच्या कुटुंबाला आणखी दोन धक्के, मुलीपाठोपाठ नातवाचेही निधन". TV9 Marathi. 2026-02-15 रोजी पाहिले.
- 1 2 3 author/online-lokmat (2021-05-29). "Kantabai Satarkar: 'लक्ष घालून बसा, सख्या मी आहे तुमची कांता'". Lokmat. 2026-02-15 रोजी पाहिले.
- 1 2 टीम, एबीपी माझा वेब (2017-07-29). "मर्दानी पोवाडा गाणारी तमाशा सम्राज्ञी : कांताबाई सातारकर". ABP Majha. 2026-02-15 रोजी पाहिले.
- ↑ माझा, नितीन ओझा, एबीपी (2021-05-25). "तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ लोककलावंत कांताबाई सातारकर यांचं निधन". ABP Majha. 2026-02-15 रोजी पाहिले.
- ↑ News, Lokshahi (2021-05-25). "तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे कोरोनामुळे निधन". Lokshahi Marathi News. 2026-02-19 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ↑ Prabhat, Dainik. "तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ लोककलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन". Dainik Prabhat. 2026-02-19 रोजी पाहिले.
- ↑ author/online-lokmat (2021-05-25). "रायगडाची राणी, कोंढाण्यावर स्वारी फेम प्रसिद्ध वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन". Lokmat. 2026-02-15 रोजी पाहिले.
- ↑ "ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन". Zee 24 taas. 2021-05-26. 2026-02-15 रोजी पाहिले.