Jump to content

कलावती देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कलावती देवी
जन्म १९६५
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा गवंडीकाम
प्रसिद्ध कामे ४००० शौचालय निर्मिती
पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार (२०२०)

कलावती देवी (जन्म c. १९६५) ह्या एक भारतीय महिला गवंडी आहेत. यांनी कानपूरमध्ये शौचालय बांधणीचा आगळावेगळा ध्यास घेतला. कलावतीने एक ५० आसनांचे शौचालय बसवून स्वतःच्या समुदायात परिवर्तन घडवून आणले, ज्याचा नंतर इतर समुदायांमध्ये देखील फायदा झाला. पुढे कलावती यांनी विशेषतः महिला आणि मुलांसाठी ४,००० शौचालये बांधण्यास मदत केली आहे. या कामासाठी २०१९ मध्ये कलावती देवी यांना नारी शक्ती पुरस्कार; भारतातील महिलांसाठीचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला.

जीवन

[संपादन]

कलावती देवीचा जन्म १९६० च्या दशकात झाला असून त्याचे संगोपन सीतापूर येथे झाले आहे.[] वयाच्या १४व्या वर्षी कलावती देवीचे १८ वर्षांच्या जयराज सिंहशी कानपूर येथील राजा पुर्वा येथे लग्न झाले. जयराज सिंह यांनी श्रमिक भारती नावाच्या एका ना-नफा गटासाठी फ्लोअर कटर म्हणून काम केले होते.[]

हे जोडपे राजा पूर्वा कानपूरमध्ये राहत होते. त्यावेळी रस्त्यावर शौचास जाणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त होते, ज्याचा कलावती देवी यांना तिटकारा वाटत होता. त्यांच्या दृष्टीने हे एक "जिवंत नरक" होते, ज्यात त्यांना बदल करावा वाटत होते.[] त्यांच्या पतीने यासाठी त्यांना पाठिंबा दिला आणि हे दोघे श्रमिक भारतीला भेटायला गेले. त्यांना १०-२० आसनांचे शौचालय बांधायचे होते. यासाठी स्थानिक कंपन्यांशी संपर्क साधण्यात आला. एका कंपनीने जर त्यांनी १,००,००० रुपये उभारले तर २,००,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले. तिने प्रयत्न केला आणि एक मोठी रक्कम जमा झाली. अखेर ५० आसनांचे शौचालय उभारण्यात आले.[]

राष्ट्रपती रामनाथ कोविंद कलावती देवी यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करताना

कलावती देवीला आता एक ध्येय प्राप्त झाले होते. आता त्यांना निधी उभारणी आणि आयोजन करण्यापेक्षा काही वेगळे करायचे होते म्हणून त्यांनी गवंडीकाम करण्याचा निर्णय घेतला आणि श्रमिक भारतीने या प्रशिक्षणासाठी त्यांना निधी दिला.[]

कालांतराने कलावती देवीचा नवरा आणि जावई दोघेही वारले आणि त्यामुळे कलावती देवीवर मुलीचा आणि दोन नातवंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी देखील येऊन पडली.[] २०१५ मध्ये त्यांना राखी मंडी नावाच्या झोपडपट्टीत काम करत असताना असे दिसून आले की तिथे ७०० कुटुंबे शौचालयाविना राहत होती. देवीने त्यांना शौचालय उभारणीत मदत करण्याची तयारी दर्शवली आणि वॉटरएडला यासाठी निधी देण्यास राजी केले. स्थानिक समुदाय जमीन किंवा वित्त देण्यास तयार नव्हता कारण ते त्यांच्या खुल्यावरील शौच करण्यात खूश होते. तसेच त्यांना एक भीती अशी देखील होती की मदत देण्यामागे कलावती यांचा काही गुप्त स्वार्थ असावा.[] लहान मुलांना आणि प्रौढांना रस्त्यावर शौचास जावे लागत असताना तिथे हल्ले आणि बलात्काराच्या घटना सर्वसामान्य होत्या.[] शेवटी त्या स्वतः शौचालये बांधण्यासाठी घराबाहेर बाहेर पडल्या. पुढील काही दिवस त्यांना मुसळधार पावसात, बसने प्रवास करून पुढे ५ किमी पायपीट करत जावे लागले.[]

पुरस्कार

[संपादन]
२०२० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी

२०२० मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी भारतीय पंतप्रधानांचे ट्विटर अकाउंट वापरण्याची संधी त्यांना मिळाली. त्या दिवशी पंतप्रधानांनी स्वतः ट्विट केलेल्या "भव्य सात" नावाच्या व्यक्तींपैकी ती एक होती.[] ट्विट करण्यासाठी एकूण सात जणांची निवड करण्यात आली होती. त्यादिवशी पदला भुदेवी, बीना देवी, आरिफा जान, चामी मुर्मू, निलझा वांगमो, रश्मी उर्ध्वरेषे, मान कौर, कौशिकी चक्रवर्ती, अवनी चतुर्वेदी, भावना कंठ, मोहना सिंग, भागीरथी अम्मा कार्त्यायनी अम्मा आणि कलावती देवी, अशा एकूण चौदा महिलांना हा पुरस्कार देण्यात आला.[]

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कलावती देवी सह एकूण चौदा महिलांना त्यादिवशी नारी शक्ती पुरस्कार प्रदान केला. हे पुरस्कार नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनी देण्यात आले.[]

कलावती देवी यांना शौचालय बांधणाऱ्या महिला गवंडी म्हणून हा पुरस्कार मिळाला. झारखंडमध्ये केलेल्या कामासाठी सुनीता देवी नावाच्या आणखी एका महिलेला आदल्या वर्षी अशाच प्रकारच्या कामासाठी हा पुरस्कार मिळाला होता.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c d e f "Meet Kalavati, The Mason With A Mission To Build Toilets In Her Village". The Better India (इंग्रजी भाषेत). 17 March 2015. 5 April 2020 रोजी पाहिले.
  2. ^ a b c d "Meet the 7 women achievers who took over PM Modi's social media accounts on Women's Day: PM Modi's 'magnificent seven'". The Economic Times. 5 April 2020 रोजी पाहिले.
  3. ^ Indian, The Logical (26 October 2018). "True Hero: Meet The Lady Mason Who Built 4000+ Toilets In Unsanitary Slums & Villages Of UP". thelogicalindian.com (इंग्रजी भाषेत). 2020-04-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 April 2020 रोजी पाहिले.
  4. ^ ANI (8 March 2020). "President to present 'Nari Shakti Puraskar' to inspirational women". Business Standard India. 5 April 2020 रोजी पाहिले.
  5. ^ "Award for woman who took up a trowel to turn mason". www.telegraphindia.com (इंग्रजी भाषेत). 26 April 2020 रोजी पाहिले.