Jump to content

कर्बभार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्बभार किंवा कार्बन फूटप्रिंट हे जागतिक हवामान बदल किंवा जागतिक तापमान वाढ यामधील योगदान मोजण्याचे एकक आहे.

व्याख्या[संपादन]

कर्बभार किंवा कार्बन फूटप्रिंट म्हणजे एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा घटनेमध्ये, किंवा दर वर्षी एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा इमारतीद्वारे होणारे एकूण हरितगृह वायूंचे उत्सर्जन.  

अतिशीत प्रदेशांत हिवाळ्यातही काचेच्या बनवलेल्या हरितगृहांमध्ये वातावरण उबदार रहात असल्याने शेती करणे शक्य होते. काचेतून प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश आरपार जाऊ शकतो, पण हरितगृहात तयार झालेली उष्णता आरपार जाऊ शकत नाही. यामुळे आतली हवा उबदार रहाते, व वनस्पती वाढू शकतात. पृथ्वीच्या वातावरणात कार्बन डायॉक्साइड व इतर काही वायू हीच भूमिका बजावतात. त्यामुळे पृथ्वी उबदार आहे, आणि तिच्यावर जीवसृष्टी अस्तित्वात आली आहे. मात्र गेल्या काही शतकांत मुख्यतः खनिज इंधनांच्या वापरामुळे व इतर काही औद्योगिक प्रक्रियांमुळे वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान वाढले आहे, आणि परिणामस्वरूप आपल्याला जागतिक हवामान बदलाला तोंड द्यावे लागते आहे.

आपण जी गोष्ट मोजू शकतो, तीच नियंत्रित करू शकतो, या तत्त्वानुसार जागतिक हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांतून कर्बभार ही संकल्पना व तो मोजण्याच्या पद्धती पुढे आल्या.

कर्बभार मोजण्यामागील सैद्धांतिक संकल्पना[संपादन]

जागतिक हवामान बदलाला वेगवेगळे हरितगृह वायू कारणीभूत आहेत, आणि त्या सर्वांची जागतिक तापमानवाढ करण्याची क्षमता वेगवेगळी आहे. उदा. मिथेन हा हरितगृह वायू कार्बन डायॉक्साइडच्या तुलनेने २१ पट अधिक धोकादायक आहे. [१]म्हणजेच एखाद्या प्रक्रियेतून जर १ टन मिथेन वायू वातावरणात जात असेल, तर त्याचा परिणाम २१ टन कार्बन डायॉक्साइडच्या समकक्ष आहे. याच धर्तीवर वेगवेगळ्या हरितगृह वायूंची कार्बन डायॉक्साइडशी असलेली समकक्षा वैज्ञानिकांनी संशोधनातून मिळवली आहे. याचा वापर करून, एखाद्या प्रक्रियेत जरी वेगवेगळे हरितगृह वायू बाहेर पडत असले, तरी कार्बन डायॉक्साइड समकक्ष एकूण किती वायू बाहेर पडला हे काढता येते. हाच त्या प्रक्रियेचा कर्बभार असतो. उदा. एखाद्या प्रक्रियेत २ टन कार्बन डायॉक्साइड व १ टन मिथेन बाहेर पडत असतील, तर त्या प्रक्रियेचा कर्बभार २ अधिक (१ गुणिले २१) म्हणजेच २३ टन कार्बन डायॉक्साइड समकक्ष अाहे असे म्हटता येते.

कर्बभार मोजण्याची व्यावहारिक पद्धत[संपादन]

कोणत्याही प्रक्रियेचा कर्बभार जर सैद्धांतिक व्याख्येत अध्याहृत पद्धतीने काढायचा असेल, तर प्रत्येक वेळी विविध निर्देशक उपकरणे वापरून त्या प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या सर्व हरितगृह वायूंची मोजदाद ठेवावी लागेल. हे व्यावहारिक दृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे वैज्ञानिकांनी वेगवेगळ्या स्वरूपातील ऊर्जावापरातून एकक ऊर्जामागे किती कर्बभार असतो, याचे ठोकताळे प्रयोगांमधून बनवलेले आहेत. उदा. १ लीटर पेट्रोल वापरले असता, त्याचा कर्बभार २.२२ कि.ग्रॅ. कार्बन डायॉक्साइड समकक्ष इतका असतो. त्यामुळे कोणत्याही प्रक्रियेत कोणत्या स्वरूपाची व किती ऊर्जा वापरली गेली, यावरून त्या प्रक्रियेचा कर्बभार काढला जातो.

सर्व खनिज इंधनांसाठी हे अचूक ठोकताळे उपलब्ध आहेत. १ युनिट वीज वापरली असता कर्बभार किती होईल, याचा ठोकताळा मात्र प्रत्येक देशासाठी वेगळा आहे. याचे कारण म्हणजे वीज वेगवेगळ्या मार्गांनी तयार केली जाते. एखाद्या देशातील एकूण वीजनिर्मिती खनिज इंधने जाळून तयार केलेल्या विजेचा वाटा किती, यावरून त्या देशातल्या वीजवापराचा कर्बभार किती हे ठरते. म्हणजेच एखाद्या देशाच्या वीजनिर्मितीत नवीकरणीय ऊर्जास्रोतांचा वाटा वाढला, तर त्या देशातील वीजवापराचा कर्बभारही कमी होतो.

नवीन संशोधनातून ठोकताळे अधिक अचूक होत जातात. ऊर्जावापर व कर्बभाराच्या ठोकताळ्यांबाबतची अधिकृत व अद्ययावत माहिती इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी)च्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. [२]

कर्बभार संकल्पनेची उपयुक्तता[संपादन]

कर्बभार या संकल्पनेद्वारे वेगवेगळ्या देशांतील ऊर्जावापराचा त्यांच्या हवामानबदलातील योगदानाशी थेट संबंध जोडता येतो. हा संबंध आकड्याच्या स्वरूपात मांडला गेल्यामुळे देशांची तुलना करणे शक्य होते. त्याहीपुढे जाऊन प्रत्येक देशाचा दरडोई दरसाल कर्बभार काढता येतो, व ऊर्जावापर व नागरिकांची जीवनशैली यांचाही संबंध त्यातून अधोरेखित होतो. उदा. सध्याच्या आकडेवारीनुसार [३]संपूर्ण जगाचा दरडोई दरसाल सरासरी कर्बभार ५ टन कार्बन डायॉक्साइड समकक्ष आहे. या शतकातील जागतिक हवामान बदल काबूत ठेवायचा असेल, तर ही सरासरी २ टन कार्बन डायॉक्साइड समकक्ष पेक्षा जास्त असता कामा नये. भारतीयांचा सरासरी व्यक्तिगत कर्बभार १.७ टन कार्बन डायॉक्साइड समकक्ष इतका आहे.

अशा आकडेवारीचा वापर नागरिकांना स्वतःचा कर्बभार कमी करून जागतिक हवामान बदलावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठीही होऊ शकतो.

कार्बन क्रेडिटचे गणितही कर्बभाराच्या मोजणीशी जोडलेले आहे.

अलिकडे बऱ्याच संस्था आपल्या वार्षिक कारभाराचा कर्बभार मोजून सार्वजनिक रित्या जाहीर करतात. यातून त्या स्वतःवरच आपला कर्बभार कमी ठेवण्याचा सामाजिक दबाव निर्माण करत असतात.

  1. ^ http://unfccc.int/ghg_data/items/3825.php
  2. ^ http://www.ipcc-nggip.iges.or.jp/EFDB/main.php
  3. ^ https://data.worldbank.org/indicator/EN.ATM.CO2E.PC/