करूळचा मुलगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

करूळचा मुलगा हे, मराठी लेखक मधु मंगेश कर्णिक यांचे आत्मचरित्र आहे. दारिद्ऱ्याशी झगडत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आशावादी वृत्तीने केवळ लेखनगुणांच्या बळावर जिद्दीने स्वतःचे जीवन यशस्वी करणाऱ्या लेखकाने सांगितलेली ही जीवनकथा आहे.

या पुस्तकात कर्णिक यांनी आपले बालपण, आईवडिलांचे प्रेम, पूर्वजांच्या पुण्याईबद्दलचा अभिमान आणि करूळ गावातील माणसे व त्यांचे जीवनव्यवहार यांविषयी वाटणारी अतीव आत्मीयता यांवर लिहिले आहे.

आत्मचरित्राचा उत्तरार्ध लेखकाच्या साहित्यसेवेचा, समाजसेवेचा व संस्थात्मक कार्याचा तपशील सांगणारा आहे. त्यांनी काढलेला काचेचा कारखाना, करूळच्या शाळेचा आणि वनराईचा त्यांचा उपक्रम, आमराईचा अनुभव, जमीनदारीचे प्रकरण, रत्‍नागिरीत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, कोमसापची उभारणी, केशवसुतांच्या स्मारकाची निर्मिती इत्यादी प्रकरणांच्या रंजक व उद्‌बोधक हकिकती त्यांनी कथन केल्या आहेत.

कळत नकळत होणारे मनोव्यापार, मुखवट्यामागचे चेहरे, मानवी वर्तमानामागील अहंता व स्वार्थभावना, माणसांच्या आचारविचारांतील विसंगती या सर्वांचे भेदक दर्शन करूळचा मुलगा या आत्मचरित्रातून घडते. हे आत्मचरित्र सर्वार्थाने सांस्कृतिक स्वरूपाचा दस्तऐवज झाले आहे.

पहा : मधु मंगेश कर्णिक