Jump to content

करम सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
करम सिंग
जन्म करम सिंह
सेहना, बरनाला जिल्हा, पंजाब
मृत्यू २० जानेवारी, १९९३
सेहना, बरनाला जिल्हा, पंजाब
मूळ गाव सेहना, बरनाला जिल्हा, पंजाब
पदवी हुद्दा सुबेदार, मानद कॅप्टन
कार्यकाळ १९४१-१९६९
धर्म शीख
वडील उत्तम सिंह
आई सांती कौर
पुरस्कार परमवीर चक्र (१९५०)


सुबेदार मेजर व मानद कॅप्टन करम सिंग (१५ सप्टेंबर, १९१५:सेहना, बरनाला जिल्हा, पंजाब - २० जानेवारी, १९९३:सेहना, बरनाला जिल्हा, पंजाब) हे ब्रिटिश भारतीय लष्कर व भारतीय सेनेतील सैनिक होते. यांना १९४७ च्या भारत-पाकिस्तान युद्धात अतुलनीय शौर्य दाखविल्याबद्दल परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च सैनिकी पुरस्कार देण्यात आला होता. हे जिवंतपणी परमवीरचक्र मिळविणारे हे पहिलेच सैनिक होते.

पूर्वजीवन

[संपादन]

करम सिंह यांचे वडील उत्तम सिंह हे शेतकरी होते व करम सिंह हे सुद्धा शेतकरी होण्याच्या मार्गावर होते. लहानपणी पहिल्या महायुद्धात लढलेल्या सेहना गावातील सैनिकांच्या शौर्यगाथा एकून त्यांनी सैनिक होण्याचे ठरविले.[] १९४१मध्ये ते ब्रिटिश भारतीय लष्करात दाखल झाले.[]

सैनिकी कारकीर्द

[संपादन]

१५ सप्टेंबर १९४१ मध्ये करम सिंह शीख रेजिमेंटच्या पहिल्या बटालियनमध्ये दाखल झाले. दुसरे महायुद्ध त्यावेळी भारताच्या पूर्व सीमेवर पोचलेले होते. अ‍ॅडमिन बॉक्सच्या लढाईत त्यांनी दाखविलेल्या कामगिरीबद्दल त्यांना सेना पदक देण्यात आले.[] तरुणपणी शौर्यपदक मिळविल्याने त्यांना त्यांच्या तुकडीत मोठा मान होता.[] १९४७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिल्यांदा राष्ट्रध्वज फडकविणाऱ्या पाच सैनिकांपैकी करमसिंह एक होते.[]

१९४७ चे युद्ध

[संपादन]

१९४७ च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानने जम्मू काश्मीर हे तेव्हाचे स्वतंत्र संस्थान गिळंकृत करण्यासाठी चढाई केली व मोठा प्रदेश काबीज केला.[] त्यात तिथवाल गावाचा समावेश होता. काश्मीरच्या राजा हरि सिंह यांनी आपले राज्य भारतात शामिल केल्यावर भारताने पाकिस्तानचे प्रतिकार केला. त्यानंतर २३ मे १९४८ रोजी भारतीय सेनेने नियंत्रण रेषेवर असलेले आणि व्यूहात्मक दृष्टिने महत्त्वाचे तिथवाल गाव परत मिळविले.[] पाकिस्तानी सैन्याने लगेचच प्रतिहल्ला चढवला. यासमोर हतबल असलेल्या भारतीय सैन्याने काही ठिकाणे ठेवून माघार घेतली.[] त्यावेळी करम सिंह व त्यांचा तुकडीला तिथवालचे रक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली.

१३ ऑक्टेबर, १९४८ रोजी पाकिस्तानी सेनेने तिथवालच्या आसपासच्या भारतीय ठाण्यांवर कडाडून हल्ला केला. त्यात तिथवालच्या दक्षिणेकडील रीछमार गली आणि पूर्वेच्या नास्ताचुर घाटातील भारतीय ठाणी जिंकण्याचा बेत होता.[] यावेळी लान्स नाईक करम सिंह सरहद्दीवरील ठाण्याचे नेतृत्व करीत होते.[] शीख रेजिमेंटच्या तुकड्यांनी दहापट संख्येने चालून आलेल्या शत्रूचा सामना केला व अनेक हल्ले परतवून लावले. करम सिंहच्या तुकडीकडील दारुगोळा संपत आला होता व पाकिस्तान्यांच्या अविरत हल्ल्यांमध्ये रसद मिळणे अशक्य होते. यावेळी करम सिंहांनीआपल्या सैनिकांना मुख्य कंपनीकडी कूच करण्याचे हुकुम दिले. स्वतः जखमी असतानाही जखमी झालेल्या दोन शिपायांना त्यांनी व इतर एक सैनिकाने पाठीवर उचलून नेले. त्यानंतर चाललेल्या धुमश्चक्रीत ते सतत सैनिकांमधून फिरत होते व त्यांना धीर देत आणि उत्साह संचारत ते हातगोळे शत्रूवर फेकत होते. यात पुन्हा एकदा जखमी झाल्यावरही त्यांनी मागे जाणे नाकारले आणि प्रत्यक्ष लढाईत उतरले.[]

शत्रूचा पुढचा हल्ला करम सिंहांच्या ठाण्यानजीक आल्यावर त्यांनी खंदकातून बाहेर उडी टाकली व पाकिस्तान्यांना आपल्या संगीनीने कंठस्नान घातले. हे पाहून भेदरलेल्या पाकिस्तान्यांनी लगेचच पळ काढला. त्यानंतर झालेले तीन हल्ले परतविल्यावर शत्रूने करम सिंहांच्या ठाण्याचा नाद सोडला व कायमचा पळ काढला. [] या अतुलनीय शौर्याबद्दल करम सिंह यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले.

युद्धोत्तर कारकीर्द

[संपादन]

१९५७मध्ये हवालदारपदावर असलेल्या करम सिंहांना नायब सुबेदार पदावर बढती दिली गेली. त्यानंतर कालांतराने ते सुबेदार मेजर पदावर गेले व सैन्यातून निवृत्त होण्याआधी त्यांना मानद कॅप्टन पदावर नियुक्त केले गेले.[]

इतर बहुमान

[संपादन]

१९८० च्या दशकात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या १५ खनिज तेलवाहू जहाजांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली होती. त्यांपैकी एमटी लान्स नाईक करम सिंह हे जहाज ३० जुलै, १९८४ रोजी सेवादाखल झाले व २५ वर्षांनी निवृत्त केले गेले.[] पंजाबमधील संगरुर येथील जिल्हा मुख्यालयात करम सिंहांचे स्मृतिस्थान आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b Cardozo 2003, पाने. 44–45.
  2. ^ a b "Death anniversary of Hony Capt Karam Singh today". The Tribune India. 17 April 2017 रोजी पाहिले.
  3. ^ The London Gazette. 16 May 1944. Supplement: 36518. p. 2271
  4. ^ "Family of second Param Vir Chakra recipient to auction medal". The Hindu. 17 April 2017 रोजी पाहिले.
  5. ^ Mikaberidze 2011, पाने. 393–395.
  6. ^ Mihir Srivastava (31 July 2014). "In the Line of Fire". Open Magazine. Open Media Network Pvt. Ltd. 11 October 2017 रोजी पाहिले.
  7. ^ a b Chakravorty 1995, पान. 60.
  8. ^ a b c Chakravorty 1995, पान. 61.
  9. ^ Raj 2009, पान. 179.