Jump to content

कग्गनपल्ली राधा देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कग्गनपल्ली राधा देवी
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख20. शतक संपादन
व्यवसायन्हावी संपादन
निवासस्थानआंध्र प्रदेश संपादन
पुरस्कारनारी शक्ती पुरस्कार संपादन

कग्गनपल्ली राधा देवी या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आहेत. देवी यांनी फक्त पुरुष न्हावींना कामावर ठेवणाऱ्या हिंदू मंदिराविरुद्ध यशस्वीरित्या लढा दिला. देवी यांच्या मागणीला मान्यता देत तिरुमला येथील वेंकटेश्वर मंदिराने मुंडन विधी पार पाडण्यासाठी महिला न्हावींना देखील कामावर ठेवण्यास सुरुवात केली. देवीला त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकार तर्फे नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जीवन

[संपादन]

राधा देवी आंध्र प्रदेश महिला न्हावी संघटनेच्या अध्यक्षा होत्या.[] याशिवाय त्या तिरुमला तिरुपती देवस्थानम महिला न्हावींच्या अध्यक्षा देखील होत्या. या महिला न्हावींना स्त्री असल्या कारणाने हिंदू मंदिरात केस कापण्यास मज्जाव केला जात होता. शेवटी राधा देवींनी यावर खटला लढवला आणि यात त्यांना यश मिळाले.[]

वेंकटेश्वर मंदिरातील ९७ आणि ९९ क्रमांकाच्या बूथवर महिलांकडून महिलांचे मुंडण केले जात आहे.

तिरुमला येथील वेंकटेश्वर मंदिरात दररोज हजारो हिंदू भक्त देवाला अर्पण म्हणून आपले मुंडन करतात.[] या कापलेल्या केसांचे अंदाजे वजन प्रतिदिन एक टनांपर्यंत भरते.[] हे केस मोठ्या गोदामांमध्ये गोळा करून साठवले जातात आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावर विकले जातात. यातून या मंदिराला मोठा नफा मिळतो. हे केस उच्च दर्जाचे असून त्यांची किंमत $१६६/किलो इतकी आहे. विशेष म्हणजे भारताबाहेर विग बनवण्यासाठी हे केस खासकरून वापरले जातात.[]

केस कापण्याची परंपरा एका पारंपारिक कथेतून येते ज्यामध्ये एका गोपालकाच्या हातून वेंकटेश्वराच्या डोक्याला दुखापत झाली. ज्यामुळे वेंकटेश्वरच्या डोक्यावर टक्कल पडले. हे गंधर्व राजकुमारी नीला देवी हिच्या लक्षात आले आणि तिने तिच्या केसांचा एक भाग कापला आणि ते त्याच्या डोक्यात प्रत्यारोपित केले. त्यानंतर वेंकटेश्वराने घोषणा केली की जिथे हे घडले तिथे त्याच्या अनुयायांनी त्यांचे केस कापून ते अर्पण करावे.[]

पारंपारिकपणे मुंडन करण्यासाठी नियुक्त केलेले न्हावी हे नायी जातीचे पुरुष सदस्य होते. दरम्यान काही कारणांनी महिला भाविकांनी स्त्री न्हावीला प्राधान्य देण्याची विनंती केली.[] राधा देवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाने तिरुमला देवस्थानने स्त्री न्हावी ठेवण्यास सुरुवात केली. आता स्त्री आणि पुरुष न्हावी येथे नियमित स्वरूपात कामावर आहेत.[] या चळवळीमुळे देवी यांना भारताचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[] २०१९ च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी नवी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.[] त्यावेळी देवी यांनी मंत्री मनेका गांधी यांची आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 3 P, Ambika (March 8, 2019). "From masons, barbers to creators of forests and sustainable homes, nari shakti takes charge | India News - टाइम्स ऑफ इंडिया". The Times of India (इंग्रजी भाषेत). 7 January 2021 रोजी पाहिले.
  2. 1 2 3 "Ms. Kagganapalli Radha Devi - #NariShakti Puraskar 2018 Awardee in Individual category". Ministry of WCD (India). 8 March 2019. 8 March 2019 रोजी पाहिले.
  3. 1 2 Saritha Rai (14 July 2004). "A Religious Tangle Over the Hair of Pious Hindus". The New York Times. 10 January 2021 रोजी पाहिले.
  4. Tarlo, Emma (6 October 2016). Entanglement: The Secret Lives of Hair (इंग्रजी भाषेत). Simon and Schuster. p. 66. ISBN 978-1-78074-993-8.
  5. "Tirumala Brahmotsavams: 1,189 barbers to be roped in for tonsure services". deccanchronicle.com (इंग्लिश भाषेत). २० ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. Mohammed, Irfan (20 March 2019). "India president confers Manju with Nari Shakti Puraskar award". Saudigazette (English भाषेत). 9 January 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)