एस.एस. तारापोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सावक सोहराब तारापोर ( १३ सप्टेंबर, इ.स. १९३६ - २ फेब्रुवारी, इ.स. २०१६) हे एक भारतीय-पारसी अर्थशास्त्रज्ञ होते. भारताच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास नियंत्रित अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत असताना ते सरकारचे सल्लागार होते.

तारापोर इंग्लंडहून अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी घेऊन रिझव्‍‌र्ह बँकेत १९६१ मध्ये संशोधन अधिकारी म्हणून दाखल झाले व डेप्युटी गव्हर्नर म्हणून सेवानिवृत्त झाले. रिझव्‍‌र्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर चक्रवर्ती रंगराजन यांनी तारापोर यांना धोरणे आखण्यात व राबविण्यात मुक्त वाव दिला. रुपया परिवर्तनीय करण्याचा काळ अजून लांब आहे, असे तारापोर यांचे मत होते.

शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकीर्द[संपादन]

  • १९५८ : बी.ए (इकॉनॉमिक्स) - शेफील्ड युनिव्हर्सिटी
  • १९६० : एम.ए. (इकॉनॉमिक्स) - लंडन युनिव्हर्सिटी
  • १९६१ : भारतीय रिझर्व बँकेत संशोधन अधिकारी म्हणून दाखल
  • १९७१-७९ : आंतरराष्ट्रीय मॉनेटरी फंड कार्यालयात प्रतिनियुक्ती
  • १९७९-८८ : रिझर्व बँकेत निर्देशक पदावर परत. देशाच्या अर्थव्यवस्थेचे विश्लेषण आणि देशाची आर्थिक धोरणे ठरवण्यार्‍या शाखेत सल्लागाराचे काम
  • १९८८-९२ : रिझर्व बँकेचे कार्यकारी निर्देशक म्हणून कारभार
  • १९९२-९६ : रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नरपद

निवृत्तीनंतर[संपादन]

रिझव्‍‌र्ह बँकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर १९९७ मध्ये रुपया परिवर्तनाची वाटचाल कशी असावी याची शिफारस करण्यासाठी तारापोर यांच्या अध्यक्षतेखाली एक चार सदस्यांची समिती नेमण्यात आली. पुन्हा २००७ मध्ये याच विषयावर तारापोर यांची एकसदस्य समिती रिझव्‍‌र्ह बँकेने नेमली.

पतविषयक धोरणे[संपादन]

तारापोर यांच्या सेवानिवृत्तीनंतरही पतविषयक धोरणे ठरविताना आपण त्यांचा सल्ला घेत होतो, असे रिझव्‍‌र्ह बँकेच्या चार माजी गव्हर्नरांनी नमूद केले आहे.

स्वायत्तता[संपादन]

रिझव्‍‌र्ह बँकेला असलेली स्वायत्तता कायम ठेवणे देशाच्या हिताचे आहे, अशी ठाम भूमिका तारापोरांनी आयुष्यभर घेतली होती.