एकनाथ वसंत चिटणीस
एकनाथराव चिटणीस हे एक शास्त्रज्ञ होते. ते ज्येष्ठ वैज्ञानिक विक्रम साराभाई ह्यांच्या सांगण्यावरून अमेरिकेतील मँसच्यूटस तंत्रज्ञान संस्था सोडून अवकाश संशोधन व क्ष किरण संशोधन करण्यासाठी भारतात परतले.
| एकनाथ वसंतराव चिटणीस | |
| पूर्ण नाव | एकनाथ वसंत चिटणीस |
| जन्म | २५ जुलै, १९२५ कोल्हापूर |
| मृत्यू | २२ ऑक्टोबर, २०२५ (वय १००) पुणे |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अवकाश संशोधन व क्ष किरण |
| कार्यसंस्था | इस्त्रो. |
| प्रशिक्षण | भौतिकी संशोधन कार्यशाळा |
| डॉक्टरेटचे मार्गदर्शक | १.रामनाथन.२.सी.व्ही. रामन. |
| पुरस्कार | पद्मभूषण. फाय फाऊंडेशन. |
| वडील | वसंत चिटणीस |
२५ जुलै २०२५ रोजी त्यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली.
बालपण
[संपादन]एकनाथ वसंत चिटणीस ह्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला.
शिक्षण
[संपादन]एकनाथ वसंत चिटणीस ह्यांचे शालेय शिक्षण पुणे येथे झाले. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र ह्या विषयात त्यांनी पुणे येथील महाविद्यालयातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केल्या. नंतर त्यांनी रेडिओ संपर्क शास्त्र विषयात पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली.तदनंतर ते युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. भौतिकी संशोधन कार्यशाळेत डॉ के.आर. रामनाथन आणि डॉ. सी.व्ही. रामन हे काम करीत होते. डॉ. रामनाथन आणि डॉ.सी.व्ही. रामन ह्यांच्याकडे चिटणीस ह्यांनी पीएचडी केली.
नोकरी व कार्य
[संपादन]त्यांना ऑल इंडिया रेडिओ ची दर महिना पाचशे रुपये वेतनाची क्लास वन वर्गातील नोकरी मिळत होती परंतु त्यांनी ती नाकारली आणि दरमहा १०० रूपये स्कॉलरशिप असलेल्या भौतिक संशोधन कार्यशाळेत कारकिर्दीला सुरुवात केली. भौतिक संशोधन कार्यशाळा ही ज्येष्ठ वैज्ञानिक विक्रम साराभाई ह्यांनी स्थापन केली होती. त्यावेळी त्यांना विक्रम साराभाई ह्यांनी वेड्यात काढले होते. त्यांना दरमहा शंभर रुपये वेळेवर मिळत नसत.म्हणून ते पेटलाद येथे महाविद्यालयात नोकरी करीत असत.डॉ. रामनाथन व डॉ. सी.व्ही. रामन ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नंतर पीएचडी केली. नंतर त्यांनी अमेरिकेत मँसच्यूसेटस तंत्रज्ञान संस्था येथे संशोधन केले व तिथे तीन वर्षे काम केले. त्यांना विक्रम साराभाई ह्यांचा भारतात आकाश संशोधन करण्यासाठी भारतात येण्यासाठी निरोप आला. तेथील लोक भारतात परत जाऊ नको म्हणत असताना सुद्धा ते भारतात परत आले.
अवकाश संशोधन
[संपादन]इसवी सन १९६० ते १९७० च्या दशकात त्यांनी क्ष किरण व अवकाश संशोधन विषयांवर संशोधन केले. भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमात त्यांनी विक्रम साराभाई सोबत इसवी सन १९६१ पासून काम केले. विक्रम साराभाईसोबत त्यांनी अनुक्रमे थुंबा आणि श्रीहरीकोटा ह्या जागा रॉकेट लॉंचिग आणि उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी निवडल्या.रशिया देशाने ४ ऑक्टोबर १९५७ रोजी अवकाशात स्पुटनिक पाठविल्यानंतर त्यावेळच्या पंतप्रधान असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी तेव्हाच्या अणुशक्ती आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या डॉ.होमी भाभा ह्यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली.त्यानुसार डॉ.होमी भाभा ह्यांनी विक्रम साराभाई ह्यांना अध्यक्ष आणि एकनाथ चिटणीस ह्यांना सचिव करून इन्कॉस्पार समिती स्थापन केली. इंडियन नेशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च म्हणजेच इन्कॉस्पार ह्या संस्थेचे सचिव म्हणून एकनाथ चिटणीस ह्यांचा संयुक्त राष्ट्रसंघाबरोबर तसेच तत्सम आंतरराष्ट्रीय संघटनांबरोबर संबंध आला. चिटणीस ह्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय अंतराळ विषयावर असलेल्या परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. इसवी सन १९८१ ते इसवी सन १९८५ पर्यंत चिटणीस हे अवकाश उपयोजन केंद्र, अहमदाबाद येथे संचालक होते. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी त्याच संस्थेचे सल्लागार म्हणून काम केले. चिटणीस ह्यांचा भारताच्या अंतराळ क्षेत्रातील इन्सँट मालिकेतील उपग्रहांच्या आखणीत महत्त्वाचा भाग होता. अंतराळ तंत्रज्ञानाचा शैक्षणिक व इतर क्षेत्रात वापर करण्यासाठी त्यांनी भरपूर काम केले. इसवी सन १९६३ मध्ये नाईके अपोची हे रॉकेट प्रक्षेपित करून वातावरणाचा अभ्यास करून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज देण्यासाठी मदत झाली. इसवी सन १९७० च्या दशकात शेती, हवामान, आरोग्य, शिक्षण, दूरसंपर्क, मनोरंजन इत्यादी क्षेत्रात अंतराळ संशोधन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी नासाच्या सहकार्याने सँटेलाईट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एज्युकेशनचा प्रकल्प अंमलबजावणी करण्यात प्रा.यशपाल ह्यांच्या सोबत प्रा.चिटणीस ह्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता.दूरदर्शनवर देशभर शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात चिटणीस ह्यांनी सहभाग घेतला. प्रा.चिटणीस ह्यांनी नासाच्या अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ए.पी.जे.अब्दुल कलाम ह्यांच्या गुणवत्तेनुसार निवडीसाठी नेमणूक पत्रावर सही केली.
विविध संस्था
[संपादन]खालील संस्थेच्या कामात चिटणीस ह्यांचा सहभाग होता.
- प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया इसवी सन १९८६ पासून संचालक समितीवर.इसवी सन २००८-०९ संस्थेचे अध्यक्ष.
- राष्ट्रीय भौतिक शास्त्र प्रयोगशाळा.
- राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था.
- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ.
- भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी.
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ.
- पुणे विद्यापीठ -मार्गदर्शन व अध्यापन.
पुरस्कार
[संपादन]एकनाथ चिटणीस ह्यांना खालील पुरस्कार मिळाले.
- भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार -इसवी सन १९८५.विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कार्य.
- फाय फाऊंडेशन पुरस्कार.- इसवी सन १९९५.
- विद्यापीठ अनुदान आयोग विशेष पारितोषिक.-विज्ञान आणि समाज संबंधाबद्दल.
- अँस्ट्रानॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया -आर्यभट्ट पारितोषिक.
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था -पदक. दूरसंपर्क क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल.
वर्तमान
[संपादन]इसवी सन १९८७ मध्ये प्रा.चिटणीस निवृत्त झाले. हल्ली ते पुण्यात स्थायिक झाले आहेत.शुक्रवार दिनांक २५ जुलै २०२५ रोजी त्यांना शंभर वर्षे पूर्ण झाली.ह्या वयातही त्यांचा उत्साह आणि स्मरणशक्ती दांडगी आहे. [१]
संदर्भ
[संपादन]- ^ महाराष्ट्र टाईम्स, शुक्रवार,२५ जुलै २०२५ लेखक-अ.पां.देशपांडे.- मराठी विज्ञान परिषद कार्यवाह.