उपग्रह भू कक्षा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उपग्रह भू कक्षा

जमिनीपासून उंचीनुसार तीन प्रकारच्या कक्षा ठरवण्यात आल्या आहेत.

कक्षा वर्गीकरण[संपादन]

  • १० कि.मी.पासून २ हजार कि.मी.पर्यंतच्या कक्षांना ‘निम्म भू-कक्षा’ (लो-अर्थ ऑर्बिट) असं म्हणतात.
  • २००० कि.मी.पासून ३५,७८६ कि.मी.पर्यंतच्या कक्षांना ‘मध्यम भू-कक्षा’ (मीडियम अर्थ ऑर्बिट) असं म्हणतात.
  • ३५,७८६ कि.मी.च्या वरील कक्षांना ‘उच्च भू-कक्षा’ (हाय अर्थ ऑर्बिट) म्हणतात.

निम्न भू कक्षा[संपादन]

१० कि.मी.पासून २००० कि.मी. उंचीपर्यंतचे निम्म भू-कक्षा (लो-अर्थ ऑर्बिट)मधले उपग्रह संख्येने सर्वांत अधिक आहेत. या उंचीवर नकाशे, खनिजांचं मापन, लोकसंख्या, जंगल, शेती यांचं मापन व नियोजन करणारे अशा अनेक प्रकारच्या उपग्रहांची दाटी आहे. विज्ञानासाठी वापरले जाणारे सर्व उपग्रहही याच कक्षेमध्ये फिरत असतात. हबल अवकाश दुर्बीण, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, भारताचे इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट (आयआरएस) सीरिजमध्ये असलेले उपग्रह यांसारखे शेकडो उपग्रह लो-अर्थ ऑर्बिटमध्ये फिरत आहेत. या कक्षांमधील अनेक उपग्रह ध्रुवीय कक्षेत म्हणजे पृथ्वीच्या उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव अशा कक्षेत फिरत असतात. हे उपग्रह सतत सूर्याकडे ‘तोंड’ करून असतात, जेणेकरून त्यांना सौरऊर्जा वापरता येईल. उपग्रहाला जोडलेल्या सौरपट्टय़ांचा सौरऊर्जेसाठी वापर करून उपग्रहातील उपकरणांना वीज पुरवतात.

मध्यम भू कक्षा[संपादन]

२००० कि.मी. ते ३५,७८६ कि.मी. मधल्या कक्षेत फिरणारे मध्यम भू कक्षा (मीडियम अर्थ ऑर्बिट) मधले उपग्रह रेडियो संदेशांचं वहन करण्यासाठी प्रामुख्यानं वापरले जातात. विमानं, जहाजं तसंच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) यांच्यामधील रेडियो संदेश वहन या उपग्रहांमुळे शक्य होतं.

उच्च भू कक्षा[संपादन]

३५,७८६ कि.मी.च्या वरील कक्षांना उच्च भू-कक्षा (हाय अर्थ ऑर्बिट) म्हणतात. ३५,७८६ कि.मी.च्या वरील कक्षेतले उपग्रह ज्या वेगानं पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याच वेगानं पृथ्वीभोवती फिरत असतात. यामुळे पृथ्वीवरून पाहिलं असता हे उपग्रह स्थिर भासतात. अशा उपग्रहांना ‘भू-स्थिर उपग्रह असंही म्हणतात. सर्वसाधारणपणे या उंचीवर दळणवळण क्षेत्रातले व हवामान उपग्रह भू-स्थिर केलेले असतात. भारतानं पाठवलेले ‘इन्सॅट’चे सर्व उपग्रह याच भू-स्थिर कक्षेतले आहेत. या उंचीवरून पृथ्वीवरील जवळजवळ अर्धा भूभाग नजरेस पडत असतो. त्यामुळे इतर देशांतील दूरचित्रवाणी संदेश, दूरध्वनी संदेश वहन यांची देवाणघेवाण सोपी जाते. हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी या उंचीवरील उपग्रहांचा फायदा होतो. हवामानातील सातत्यानं होणारे बदल, ढगांचं आवरण, वाऱ्याचा वेग यासारखी माहिती हे उपग्रह अविरतपणे पृथ्वीवर पाठवत असतात.