उदार पिंटो
उदार पिंटो - (जन्म - २६ एप्रिल १९०७ हुबळी, कर्नाटक, मृत्यू - ०७ डिसेंबर २००१, वय - ९५ वर्षे)[१] मूळ नाव - लॉरेन्स मार्शल पिंटो. [१] हे व्यावसायिक होते. त्यांनी पाँडिचेरी येथे 'हार्पेगाॅन ॲटेलिअर' नावाचा फर्निचर आणि स्टेनलेस स्टीलच्या वस्तूंचा कारखाना काढला होता. तो आजही चालू आहे. श्रीमाताजींचे ते खाजगी सचिव होते.[२]
जीवन
[संपादन]उदार पिंटो यांचे वडील हुबळीमधील मोठे व्यावसायिक होते. त्यांचे वडील मुळात गोव्यातील होते आणि त्यांनी पोर्तुगीज पद्धतीचे पिंटो नाव धारण केले होते. उदार यांचे शिक्षण गोव्यातच झाले होते. ते कँथोलिक होते. हुबळीमध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते पुढील शिक्षणासाठी मसुरी येथे गेले. तेथून बेळगाव, मग मुंबई येथे गेले. तेथून पुढे त्यांनी १९२९ साली लंडनला गेले. त्यांनी लंडन युनिव्हर्सिटीतून एरोनॉटिकल अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. पुढे ते व्यवसायात शिरले. १९३५ साली व्यवसायच्या निमित्ताने पाँडिचेरीमध्ये गेले.तेथे दोन वर्षे उत्तम व्यवसाय केला. पण त्या काळात ते श्रीअरविंद आश्रमाशी संबंधित नव्हते.[२]
उदार पिंटो हे पाँडिचेरी येथे श्रीअरविंद आश्रमाशी संबंधित असलेल्या गोळकोंड गेस्ट हाऊस मध्ये राहत असत. १९३७ साली इंग्लंडवासी असणाऱ्या मोनाशी त्यांचा प्रेमविवाह झाला. त्यांची पत्नी मोना पिंटो ह्या गेस्ट हाउसच्या व्यवस्थापिका म्हणून काम सांभाळत असत. त्यांची कन्या गौरी पिंटो या आश्रमाच्या शाळेमध्ये अध्यापन करत असत.
ऑगस्ट १९३७ मध्ये उदार आणि मोना यांना श्रीअरविंदांचे दर्शन लाभले. २६ एप्रिल १९३८ रोजी लॉरेन्स यांना श्रीअरविंद यांनीउदार हे टोपण नाव दिले होते.[२]
दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास भारत सरकारने नागरी विमान वाहतूक विभागाची स्थापना केली होती, त्यामध्ये उदार यांना बोलाविण्यात आले. श्रीअरविंद यांच्या आज्ञेनुसार उदार दिल्ली येथे रुजू झाले. साधारण एक वर्षभर तेथे काम केल्यानंतर श्रीअरविंद यांच्या आदेशांनुसार ते पाँडिचेरी येथे परतले.
अनेक वर्षे ते रोज सायंकाळी ५ वाजता श्रीअरविंद लिखित सावित्री महाकाव्याचे अभिवाचन करत असत. आणि त्या अभिवाचनासाठी अनेक मंडळी नियमितपणे उपस्थित असत.[२]
कार्य
[संपादन]उदार पिंटो हे श्रीमाताजींचे ते खाजगी सचिव होते. श्रीअरविंद यांच्या महासमाधीप्रसंगी श्रीमाताजी यांनी त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती. ऑरोविलच्या उद्घाटन समारंभात उदार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. १९७२ साली श्रीअरविंद जन्मशताब्दीच्या निमित्ताने भारत सरकारने परदेशात श्रीअरविंद यांचा परिचय करून देण्यासाठी दोन व्यक्ती नियुक्त करण्याचे ठरविले होते, तेव्हा श्रीमाताजी यांनी अमेरिकेत जाण्यासाठी उदार यांची निवड केली.[२]
प्रकाशित लेखन
[संपादन]उदार पिंटो यांनी एक पुस्तक लिहिले आहे. त्याचे नाव 'वन ऑफ मदर्स चिल्ड्रेन' असे आहे.[१]
