असुरबनिपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शेवटचा ॲसिरियन राजा. इ.स.पू. ६६९ ते ६३० च्या दरम्यान निनेव्हच्या गादीवर होता. त्याच्या नेतृत्वाखाली ॲसिरिया जगातील एक मोठी सत्ता बनली. त्याच्या साम्राज्यात बॅबिलोनिया, इराण, सिरिया आणि ईजिप्त एवढ्या देशांचा समावेश होता. त्याने ईजिप्तवर संपूर्ण स्वामित्व टिकविले. ईलमाईटच्या ट्यूमनचा पराभव केला व इ.स.पू. ६४८त शमश्शुमुकिन ह्या आपल्या भावाचे बॅबिलोनियातील बंड मोडून तो प्रदेश आपल्या साम्राज्यात समाविष्ट केला.

असुरबनिपाल हा कला आणि वाङ्मय यांचाही मोठा भोक्ता होता. त्याने सुमेरिया, बॅबिलोनिया आणि ॲसिरिया येथील साहित्य फार प्रयासाने आणि चिकाटीने जमवून आपल्या निनेव्ह येथील राजवाड्यात संग्रहित केले आणि त्याचे सुव्यवस्थित ग्रंथालयात रूपांतर केले. त्याने पुस्तकांचे वर्गीकरण व सूचीही तयार केली होती. त्याच्या ग्रंथालयात क्यूनिफॉर्म लिपीत कोरलेल्या सु. २२,००० मातीच्या विटा होत्या. त्याने संग्रहित केलेले हे विटांवरील क्यूनिफॉर्म लिपीतील ग्रंथालय शक्य तेवढे ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात हलविण्यात आले आहे. असुरबनिपालनंतर ॲसिरियन साम्राज्य नष्ट झाले.