अशफाक उल्ला खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अशफ़ाक उल्ला खान
Ashfaqulla Khan 2619.JPG
अशफ़ाक उल्ला खान वारसी 'हसरत'याचे चित्र
जन्म: २२ ऑक्टोबर १९००
मृत्यू: १९२७
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: नौजवान भारत सभा
कीर्ती किसान पार्टी
हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन


अशफ़ाक उल्ला खान, (उर्दू: اشفاق اُللہ خان, इंग्रजी :Ashfaq Ulla Khan, जन्म: २२ ऑक्टोबर १९००, मृत्यू:१९२७) भारतीय स्वातंत्र्य संग्रांमातील एक प्रमुख क्रांतिकारक. त्यांनी काकोरी कांड या नावाने प्रसिद्ध असलेल्या घटनेमध्ये महत्त्वाची होती. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला चालवला आणि १९ डिसेंबर सन १९२७ला त्यांना फैजाबाद जेलमध्ये फासावर लटकावण्यात आले. राम प्रसाद बिस्मिल प्रमाणेच अशफ़ाक उल्ला खान हे उर्दू भाषेचे चांगले कवी होते. त्यांचे उर्दू मध्ये तखल्लुस,(टोपण नाव) हसरत हे होते . उर्दू व्यतिरिक्त ते हिंदीत व इंग्रजीतसुद्धा कविता लिहीत असत .त्यांचे पूर्ण नाव अशफ़ाक उल्ला खान वारसी हसरत असे होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामच्या इतिहासामध्ये बिस्मिल आणि अशफाक यांची भूमिका निर्विवादपणे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक अनुपम उदाहरण आहे.

संक्षिप्त जीवन गाथा[संपादन]

अशफाक उल्ला खान यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील शहीदगढ शाहजहानपूर मध्ये रेल्वेस्टेशनजवळ असलेल्या कदनखैल जलालनगर मोहल्ल्यात २२ ऑक्टोबर १९००ला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद शफीक उल्ला खान होते. त्यांची आई मजहूरुन्निशॉं बेगम हीलाच्या सुंदर स्त्रियांमध्ये गणली जात असे. अशफाक यांनी स्वतः आपल्या डायरी मध्ये लिहिले आहे की, ’जेथे एकीकडे त्यांच्या वडिलांच्या खानदानात एकही जण पदवीधर होईपर्यंतचे शिक्षण प्राप्त करू शकला नाही आणि दुसरीकडे त्यांच्या आजोळी सर्व उच्चशिक्षित होते. त्यांतील काही तर डेप्युटी कलेक्टर व एस० जे० एम० (सब ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट) पदावरही काम करत होते. १८५७ च्या गदरयुद्धात त्या लोकांनी (त्यांच्या आजोळच्यांनी ) जेव्हा भारताची साथ नाही दिली, तेव्हा इतर जनतेने रागाच्या भरात त्यांचा आलिशान बंगला आगीत भस्म करून टाकला. तो बंगला त्या शहरात आजही जली कोठी (जळालेला बंगला) या नावाने प्रसिद्ध आहे. अशफाक यांनी आपले बलिदान देऊन त्यांच्या आजोळच्यांच्या नावावरील कुरूप डाग कायमचा धुऊन टाकला .

बिस्मिल यांच्याशी भेट[संपादन]

अशफाक आपल्या भावंडांत सर्वात लहान होते. सर्व प्रेमाने त्यांना "अच्छू " म्हणत असत. एके दिवशी त्यांचे मोठे भाऊ रियासत उल्ला यांनी अशफाक यांना बिस्मिल यांच्याबद्दल सांगितले की,"ते एक समर्थ व्यक्ती आणि उत्तम दर्जाचे कवीही आहेत. मात्र हल्ली मैनपुरी कांडामध्ये अटकसत्र चालू असल्याने शहाजहानपूरमध्ये दिसत नाहीत. देव जाणे कुठे आणि कोणत्या स्थितीत रहात असतील. बिस्मिल त्यांचा सर्वात उमदा क्लासफेलो आहे". अशफाक तेव्हापासूनच बिस्मिल यांच्या भेटीसाठी उतावळे झाले.

काळ पुढे लोटला. १९२०मध्ये सार्वत्रिक माफीनंतर राम प्रसाद बिस्मिल आपल्या गावी शाहजहानपूरला आले आणि घराच्या कारभारात मग्न झाले. अशफाक यांनी कित्येकदा बिस्मिल यांची भेट घेऊन त्यांचा विश्वास मिळविण्याचा प्रयत्न केला, पण ते असफल राहिले. एके दिवशी रात्री खन्नौत नदीच्या किनारी एका सुनसान जागेवर मीटिंग चालू होती तिथे अशफाक पोहोचले. बिस्मिल यांच्या एका चारोळी (शेर) वर जेव्हा अशफाक यांनी "आमीन" म्हटले तेव्हा बिस्मिल यांनी त्यांना जवळ बोलावून त्यांचा परिचय करून घेतला. बिस्मिल यांना समजले की, अशफाक हे त्यांचे क्लासफेलो रियासत उल्ला यांचे सख्खे लहान भाऊ आहेत, तसेच उर्दू भाषेचे शायर (कवी) आहेत, आणि बिस्मिल यांनी त्यांना आर्य समाज मंदिरात येऊन वैयक्तिक भेटीसाठी बोलाविले.

घरच्यांचा विरोध असून देखील अशफाक आर्य समाजात पोहोचले आणि राम प्रसाद बिस्मिल यांच्याशी खूप वेळच्या चर्चेनंतर त्यांच्या पार्टीचे(मातृवेदी चे) ॲक्टिव्ह मेंबर(सक्रिय सदस्य)ही झाले. येथूनच त्यांच्या जीवनाची नवी कहाणी सुरू झाली. ते कवी तर होतेच, त्या बरोबरच ते देशभक्तही बनले .