Jump to content

अल कोसाई आणि त्याची शिकार (लोककथा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अति घाई संकटात जाई अशा अर्थाची एक म्हण आहे, त्याचा प्रत्यय या लोककथेतून येतो.

कथेचा आशय

[संपादन]

एक सुप्रसिद्ध अरबी कवी अल कोसाई वाळवंटात राहत होता. एके दिवशी त्याला नबाचे एक सुंदर झाड दिसले. त्याने मोठ्या मेहनतीने त्या झाडाच्या फांद्यांपासून एक धनुष्य आणि काही बाण बनवले.

रात्री तो जंगली गाढवांची शिकार करण्यासाठी निघाला. लवकरच त्याला एका कळपाच्या टापांचा आवाज ऐकू आला. म्हणून त्याने त्याचा पहिला बाण मारला. अल कोसाई आवाजाचा वेध घेऊ लागला तेव्हा त्याच्या लक्षात आले की, बाण दगडावर जाऊन आदळला आहे. आपला नेम चुकला असे त्याला वाटले.  ''अरेरे, एक बाण वाया गेला. पण ठीक आहे, आपण पुन्हा प्रयत्न करू.'' तो मनाशीच पुटपुटला.   

त्याने त्याचा दुसरा बाण मारला आणि पुन्हा एकदा बाण एका खडकाला लागला. पुन्हा अल कोसाईला वाटले की त्याचा नेम चुकला आहे. आता हा बाण तरी वाया जाऊ नये असे त्याला वाटत होते. त्याने मोठ्या उमेदीने बाण मारला. पण पुन्हा एकदा त्याला जाणवले की हा बाणदेखील दगडावरच आपटला आहे. आता तो इरेस पेटला. काही झाले तरी आज एक तरी शिकार करायचीच, असा त्याने चंग बांधला.

''आता काही झाले तरी या बाणाने लक्ष्यवेध झालाच पाहिजे,'' असे म्हणून त्याने परत एकदा मोठ्या आशेने प्रत्यंचा ताणली. त्याला गाढवाची चाहूल लागली आणि त्या दिशेने त्याने नेम धरला. बाण मारला आणि कानाने वेध घेऊ लागला. आताही पुन्हा एकदा तेच झाले होते. बाण दगडावर आपटल्याचा आवाज आला.

''आता एकदा शेवटचा प्रयत्न करून पाहू या,'' असा विचार करून त्याने उरलेला शेवटचा बाण मारला. पण पुन्हा तेच घडले होते. दगडावर बाण आपटल्याचा आवाज आला. आता मात्र तो प्रचंड संतापला. आपली एवढी मेहनत वाया गेली हे पाहून त्याचा राग अनावर झाला आणि  रागाच्या भरात त्याने आपले धनुष्य मोडून टाकले. आणि तो तसाच उपाशी पोटी झोपी गेला.

सकाळी जाग येताच त्याने समोर पाहिले तर त्याला काय दिसले? त्याच्या समोर पाच गाढवे मरण पावली होती. त्याच्या बाणाने आपले काम चोख केले होते. झाले होते असे की, अल कोसाई जेव्हा जेव्हा बाण मारत होता तेव्हा तो प्रत्यंचा एवढ्या जोराने ताणत होता की प्रत्येक वेळी तो बाण एका जनावराच्या शरीरातून सरळ आरपार जात होता आणि पलीकडे असलेल्या एका खडकावर आपटत होता. पण त्याला फक्त बाण दगडावर आपटत आहे असेच वाटत होते.

तात्पर्य

[संपादन]

अल कोसाईने जरा संयम बाळगला असता, धीर धरला असता तर त्याची मनःशांतीही ढळली नसती आणि त्याचे धनुष्यही मोडले नसते. आपण केलेल्या कृतीचे परिणाम पाहण्यासाठी थोडा धीर बाळगला पाहिजे, हे यातून लक्षात येते.[१]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.