अर्जुन एरिगाईसी
| अर्जुन एरिगाईसी | ||
|---|---|---|
| २०२५ मध्ये एरिगाईसी | ||
| देश | ||
| जन्म | ३ सप्टेंबर, २००३ वारंगळ, तेलंगण, भारत | |
| पद | ग्रॅंडमास्टर | |
| फिडे गुणांकन | "२७७५". (क्र. ५) (डिसेंबर २०२५) | |
| सर्वोच्च गुणांकन | २८०१ (डिसेंबर २०२४) | |
अर्जुन कुमार एरिगाईसी (जन्म: ३ सप्टेंबर २००३) हा एक भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. बुद्धिबळातील एक प्रतिभावान खेळाडू म्हणून त्याने १४ वर्षे, ११ महिने, १३ दिवस वयाच्या ग्रँडमास्टरची पदवी मिळवली. सप्टेंबर २०२४ मध्ये तो भारताचा सर्वोत्तम मानांकित खेळाडू बनला आणि डिसेंबर २०२४ मध्ये त्याने २८०१ चे सर्वोच्च गुणांकन मिळवले ज्यामुळे तो इतिहासातील पंधरावा सर्वोच्च मानांकित खेळाडू आणि विश्वनाथन आनंद नंतर २८०० चा उंबरठा ओलांडणारा दुसरा भारतीय बनला. त्याच्या धाडसी आणि अप्रत्याशित शैलीसाठी त्याला कधीकधी पटावर 'मॅड मॅन' म्हणून वर्णन केले जाते.
जानेवारी २०२२ मध्ये, अर्जुनने टाटा स्टील बुद्धिबळ चॅलेंजर्स गट जिंकले, ज्यामुळे तो पुढील टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत मास्टर्स विभागात खेळण्यासाठी पात्र ठरला. त्याचे अंतिम गुण १०½/१३ होता. जुलै ते ऑगस्ट २०२२ दरम्यान, अर्जुनने चेन्नई बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भाग घेऊन भारत-१ संघासाठी पट ३ वर खेळला. त्याने ८½/११ (+६ −० =५) गुणांसह पूर्ण केले, आणि संघ एकूण चौथ्या स्थानावर राहिला. या कामगिरीमुळे त्याने पट ३ वरती वैयक्तिक रौप्य पदक जिंकले.[१]
सप्टेंबर २०२४ मध्ये, अर्जुनने भारतीय संघाचा भाग म्हणून बुडापेस्ट येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये भाग घेतला. पहिल्या सहा फेऱ्यांमध्ये सलग सहा विजय मिळवणारा तो ओपन विभागात एकमेव खेळाडू होता. त्याने ११ फेऱ्यांमध्ये १० गुणांसह (+९ −० =२) स्पर्धा पूर्ण केली. त्याच्या २९६८ च्या कामगिरी गुणांकनामुळे त्याला पट ३ वरती वैयक्तिक सुवर्णपदक मिळाले आणि भारताला ऑलिम्पियाडमध्ये त्यांचे पहिले सांघिक सुवर्णपदक जिंकण्यास मदत झाली.[२]
जुलै २०२५ मध्ये, त्याने ईस्पोर्ट्स संघटना जेनजीचे प्रतिनिधित्व करत ईस्पोर्ट्स विश्वचषकमध्ये भाग घेतला. तो उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आणि त्याने इयान नेपोम्नियाच्चीचा पराभव केला, परंतु उपांत्यफेरीमध्ये त्याला अलिरेझा फिरूझाने पराभूत केले आणि त्यांतर हिकारू नाकामुराकडून पराभव पत्करावा लागला ज्यामुळे तो एकूण चौथ्या स्थानावर राहिला.[३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "44th Chess Olympiad : खुल्या गटात भारत 'ब' संघाला कांस्य, तर महिला गटात 'अ' संघ तिसऱ्या स्थानी". etvbharat. २०२२-०८-०९.
- ↑ "बुद्धिबळ ऑलिंपियाड २०२४ राउंड ११ लाईव्ह अपडेट्स: अर्जुन आणि गुकेश यांच्या विजयामुळे भारताने ऐतिहासिक ओपन गोल्ड जिंकला; दिव्याने भारताला अझरबैजान विरुद्ध महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली". indianexpress.com. २०२४-०९-२२.
- ↑ श्रीराम, सिध्दार्थ (२०२५-०८-०१). "Arjun Erigaisi Secures Rs 1.2Cr Payday With Fourth Place Finish At Esports World Cup". News18.