Jump to content

अपघर्षण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पृष्ठभागाची मुख्यत: घर्षणाद्वारे झीज घडवून आणणाऱ्या क्रियेला अपघर्षण म्हणतात. वाळू, रेती, खडकाचा चुरा किंवा इतर डबरयुक्त जलप्रवाह, हिमनदी, वारा, सागरी लाटा यांच्यामुळे अशी झीज होते. वाऱ्यातील रेती, वाळू तसेच हिमनदी व हिमस्तर यांतील गोठलेली डबर यांच्याद्वारे अपघर्षण होते. बर्फाच्या तळातील गोठलेला डबर किंवा बर्फ वितळून बनलेल्या उच्च दाबाच्या पाण्यातील डबर आधारशिलेवरून किंवा अन्य पृष्ठभागावरून झपाट्याने वाहत गेल्याने त्याची घर्षणाने झीज व संनिघर्षण (घासले, तासले व खरवडले जाण्याची क्रिया) होते. यामुळे त्या पृष्ठभागावर सूक्ष्म चरे (ओरखडे) व रेखांकने निर्माण होतात. अगदी गुळगुळीत पृष्ठभाग हा जलदपणे झालेल्या झिजेचा पुरावा आहे. डबरातील दगडगोटेही झिजून सपाट व रेखांकित होतात. सूक्ष्म डबर घासकागदाप्रमाणे कार्य करते.

त्यामुळे खडकाचा पृष्ठभाग गुळगुळीत व झिलईदार होतो. रांजण खळगे किंवा कुंभगर्त हे अपघर्षणाचे एक रूप आहे. अपघर्षण प्रभावी होण्यासाठी बर्फाच्या तळात डबर चांगला एकत्रित झालेला असावा लागतो किंवा बर्फ वितळून बनलेल्या उच्च दाबाच्या पाण्यात डबराचे प्रमाण जास्त असावे लागते. तसेच त्यासाठी तीक्ष्ण कडा असलेला अणकुचीदार व पृष्ठभागातील खडकांपेक्षा अधिक कठीण डबर, तसेच तळातील बर्फाचा उच्च दाब आणि अपघर्षणाने निर्माण झालेला डबर हलविला जाण्याचा प्रभावी मार्ग असावा लागतो. या सर्व घटकांमुळे अपघर्षणाची क्रिया अखंडपणे चालू राहते. असा अपघर्षणजन्य डबर हिमनदीच्या दुधी प्रवाहाच्या अनस्रोते (खालच्या दिशेतील) भागात प्रचंड प्रमाणात निर्माण होतो. हा प्रवाह मोठ्या प्रमाणातील सूक्ष्म डबरामुळे निळसर किंवा निळसर हिरवा दिसतो. या सूक्ष्म डबराला ‘हिमनदीय दूध’ वा ‘खडकाचे पीठ’ (चूर्ण) म्हणतात.