अनातोलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनातोलियाचा उपग्रहीय चित्रांद्वारे साकारलेला व्यामिश्र नकाशा: तुर्कस्तानाच्या आशियातील भूभागाचा पश्चिमेकडील दोन तृतीयांश हिस्सा अनातोलियाने व्यापला आहे.

अनातोलिया (तुर्की: Anadolu ; ग्रीक: Ἀνατολή, आनातोली, अर्थ: सूर्योदय; इंग्रजी: Asia Minor, एशिया मायनर, अर्थ: छोटा आशिया ;) ही आशियाच्या सर्वाधिक पश्चिमेकडील भूप्रदेशासाठी वापरली जाणारी भौगोलिक व ऐतिहासिक संज्ञा आहे. अनातोलियाने तुर्कस्तानाच्या प्रजासत्ताकाचा मोठा हिस्सा व्यापला आहे. याच्या उत्तरेस काळा समुद्र, ईशान्येस जॉर्जिया, पूर्वेस आर्मेनियाचा डोंगराळ प्रदेश, आग्नेयेस मेसापोटेमिया, दक्षिणेस भूमध्य समुद्र, तर पश्चिमेस एजियन समुद्र आहेत. ऐतिहासिक काळापासून हिटाइट, ग्रीक, पर्शियन, असीरियन, आर्मेनियन, रोमन, बायझंटाइन, अनातोलियन सेल्जुक, ओस्मानी संस्कृती अनातोलियाच्या परिसरात नांदल्यामुळे अनातोलिया पुरातत्त्वशास्त्राच्या दृष्टीने जगातील सर्वांत संपन्न वारसा असणाऱ्या प्रदेशांपैकी एक आहे.