Jump to content

अति-संयमी ओत्मान (लोककथा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'अति तेथे माती' अशा अर्थाची मराठीमध्ये एक म्हण आहे, त्याचा प्रत्यय देणारी ही लोककथा.

कथेचा आशय

[संपादन]

इराणमधील ही कथा आहे. ओत्मान त्याच्या अतिसंयमासाठी प्रसिद्ध होता. एके दिवशी त्याला एका मेजवानीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. तो आल्यावर यजमानाने त्याला सांगितले: "तुम्ही मला माफ करा, पण काही कारणाने मी तुमचे आदरातिथ्य आज करू शकत नाही.  म्हणून कृपया घरी परत जा.’ ओत्मान घरी परतला.

तो तिथे पोहोचताच त्याचा आणखी एक मित्र आला आणि आता त्याने त्याला आमंत्रित केले. ओत्मान त्याच्या मित्राच्या मागे त्याच्या दारापर्यंत गेला, पण तिथे तो मित्र थांबला आणि ओत्मानची माफी मागितली. अबू ओत्मान कुरकुर न करता निघून गेला.

तिसऱ्यांदा आणि चौथ्यांदाही त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली. आधी जेव्हा असे झाले होते तेव्हा अबूची त्याच्या संयमी स्वभावाबद्दल तारीफ झाली होती. पण पुन्हा पुन्हा असे होऊ लागल्यावर लोक त्याच्या त्या स्वभावाची खिल्ली उडवायला लागले. तो त्याचा संयम नसून त्याची लाचारी आहे, असे लोक आता त्याच्याकडे पाहू लागले.

पुन्हा पुढच्या वेळीदेखील त्याला त्याच्या मित्राने निमंत्रण दिले. आता पुन्हा एकदा ओत्मानची फजिती पाहायला मिळणार म्हणून लोकं जमा झाले. पण आज मात्र काही वेगळेच घडले. त्याच्या मित्राने त्याचे दिलखुलासपणे स्वागत केले आणि संपूर्ण जनसमुदायासमोर त्याला म्हणले: "ओत्मान, मी तुमच्या सुस्वभावाची परीक्षा घेत होतो. तुम्ही त्या परीक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहात. मी तुमच्या संयमाची आणि सहनशीलतेची प्रशंसा करतो."

"माझी प्रशंसा करू नका," ओत्मानने खजील होऊन उत्तर दिले, "मी प्रशंसेस पात्र नाही. ही माझी कमकुवतता आहे, मी त्यावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करत आहे, पण मी अजूनपर्यंत त्यावर मात करू शकलेलो नाही. तेव्हा माझी प्रशंसा करू नका.''

पण पुढे प्रयत्नांती एक दिवस ओत्मान त्यांच्या या कमकुवतपणावर विजय मिळविण्यात यशस्वी झाले.

तात्पर्य

[संपादन]

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट हेच या कथेमधून लक्षात येते. संयम ही वास्तविक चांगली गोष्ट आहे, पण त्याचा अतिरेक झाला तर काय होते हे या कथेमधून समजते. अति सर्वत्र वर्ज्ययेत हेच या कथेचे सार आहे. स्वतःमधील दुर्बलतेची जाणीव असणे ही त्या दुर्बलतेवर मात करण्याची पहिली पायरी असते. हे देखील या कथेमधून लक्षात येते. [१]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ The Mother (2004). Words of Long Ago. COLLECTED WORKS OF THE MOTHER. 02 (2nd ed.). Pondicherry: Sri Aurobindo Ashram. ISBN 81-7058-670-4.